Breaking News

पॅलेस्टाईनमधल्या समस्येवर चर्चेसाठी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये १९ देशांची बैठक

वॉशिंग्टन – इस्रायलबरोबरील शांतीचर्चेत सहभागी होण्यास नकार देणार्‍या पॅलेस्टाईनला मानवी सहाय्य पुरविण्यास अमेरिकेने नकार दिला होता. यामुळे पॅलेस्टाईनच्या गाझापट्टीत फार मोठे मानवी संकट कोसळल्याचे समोर आले आहे. या संकटाच्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेच्या ‘व्हाईट हाऊस’मध्ये विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत इतर अरब देशांसह इस्रायलनेही सहभाग घेतला. पण पॅलेस्टाईनच्या राष्ट्राध्यक्षांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. अमेरिकेने जेरूसलेमला इस्रायलची राजधानी घोषित केल्यानंतर, पॅलेस्टाईनने अमेरिकेबरोबरील सर्वच पातळ्यांवरील संबंध तोडले आहेत.

ट्रम्प प्रशासनाने इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील शांतीचर्चेसाठी नवा प्रस्ताव तयार केला आहे. पुढच्या काही आठवड्यांमध्ये अमेरिका हा प्रस्ताव जाहीर करणार असल्याचा दावा केला जातो. पण हा प्रस्ताव जाहीर करण्याआधी पॅलेस्टाईनच्या गाझापट्टीतील संकटावर चर्चा करण्याची आवश्यकता असल्याचे ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे, अशी माहिती या बैठकीशी संबंधित अमेरिकन अधिकार्‍याने दिली. या पार्श्‍वभूमीवर गाझापट्टीतील संकटावर चर्चा करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने मंगळवारी बहुराष्ट्रीय बैठकीचे आयोजन केले होते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वरिष्ठ सल्लागार ‘जॅरेड कश्‍नर’ तसेच इस्रायल-पॅलेस्टाईनसाठी नियुक्त केलेले ‘जेसन ग्रीनब्लॅट’ यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीसाठी इस्रायल तसेच सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात (युएई), इजिप्त, जॉर्डन, कतार, बाहरिन आणि ओमान या अरब देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. तर ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, कॅनडा, जपान, स्वित्झर्लंड, नॉर्वे, नेदरलँड, स्वीडन आणि सायप्रस हे पाश्‍चिमात्य मित्रदेश देखील या बैठकीसाठी उपस्थित होते. पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्या फताह पक्षालाही सदर बैठकीचे आमंत्रण होते. पण त्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकल्याने पॅलेस्टिनी प्रतिनिधींच्या सहभागाखेरीज ही बैठक पार पडली.

अमेरिकन अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास सहा तास ही बैठक सुरू होती. यातील दोन तास कश्‍नर यांनी गाझातील मानवी सहाय्याविषयी आपली योजना मांडली. यामध्ये वीज व पाणी पुरवठा तसेच आरोग्य सुविधा या गोष्टींचा समावेश होता. पॅलेस्टिनी नेत्यांच्या अनुपस्थितीतही यातील बरेचशा योजनांना मंजुरी मिळाली आहे. या योजनांमुळे गाझातील मानवी सहाय्याचा ओघ पुन्हा सुरू होईल, असा दावा केला जातो.

या सहा तासांच्या बैठकीत इस्रायल-पॅलेस्टाईन? शांतीप्रस्तावावर चर्चा झाली नाही, अशी माहिती अमेरिकन अधिकार्‍यांनी दिली. तसेच या बैठकीच्या निमित्ताने इस्रायल आणि अरब नेते पहिल्यांदाच समोरासमोर आले असले तरी यावेळी इतर कोणत्याही मुद्यावर चर्चा झाली नसल्याचे अमेरिकेच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

गेल्या वर्षी ६ डिसेंबर रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जेरूसलेमला इस्रायलची राजधानी घोषित केली होती. या घोषणेचा निषेध करून पॅलेस्टाईनने यापुढे अमेरिकेच्या मध्यस्थीने होणार्‍या शांतीचर्चेत सहभागी होणार नसल्याचे म्हटले होते. पण ट्रम्प यांच्या प्रस्तावाप्रमाणे पॅलेस्टाईनने शांतीचर्चा सुरू करावी, यासाठी अरब देशांकडून पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष अब्बास यांच्यावर दडपण टाकले जात असल्याचा दावा केला जातो.