अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रीपदावरील पॉम्पिओ यांच्या नियुक्तीचे जगभरात पडसाद – पाकिस्तानचे धाबे दणाणले

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रीपदावरील पॉम्पिओ यांच्या नियुक्तीचे जगभरात पडसाद – पाकिस्तानचे धाबे दणाणले

वॉशिंग्टन – अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री म्हणून माईक पॉम्पिओ यांच्या नियुक्तीची घोषणा करून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेसहीत सार्‍या जगाला धक्का दिला. यामुळे केवळ अमेरिकेतूनच नाही तर जगभरातून याचे पडसाद उमटत आहेत. ‘सीआयएस’च्या प्रमुखपदावर असलेल्या पॉम्पिओ यांच्याकडे परराष्ट्रमंत्रीपदाची सूत्रे देऊन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आक्रमक धोरणांचे संकेत दिले आहेत, असे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. चीन, इराण व तुर्की या देशांमधून माईक पॉम्पिओ यांच्या नियुक्तीवर नाराजी व्यक्त केली जात आहे. तर पॉम्पिओ यांच्या नियुक्तीमुळे पाकिस्तानची धडगत नसल्याची चिंता या देेशातील विश्‍लेषक करू लागले आहेत.

‘रेक्स टिलरसन’ संयमी व परराष्ट्र मंत्रालयाचा पुरेसा अनुभव असलेले नेते होते. इराण व उत्तर कोरियाच्या प्रश्‍नावर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी त्यांचे गंभीर मतभेद होते. यामुळेच टिलरसन यांना आपले पद गमवावे लागल्याचे उघड झाले. मात्र माईक पॉम्पिओ यांची व आपले विचार एकसमान असल्याचे सांगून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पुढच्या काळात अमेरिकेच्या धोरणात अधिक सुसूत्रता असेल, असा विश्‍वास व्यक्त केला होता. विशेषतः इराणचा अणुकार्यक्रम आणि पाकिस्तानचे दहशतवादधार्जिणे धोरण याला राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याप्रमाणेच माईक पॉम्पिओ देखील कडाडून विरोध करीत आले आहेत. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ अमेरिकेचे धोरण अधिकच तीव्रतेने पुढे नेतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

या पार्श्‍वभूमीवर पॉम्पिओ यांच्या नियुक्तीवर जगभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’ने पॉम्पिओ यांची नियुक्ती चिंताजनक असल्याचा दावा केला. पॉम्पिओ अतिशय उग्रप्रवृत्तीचे आहेत, असे सांगून चीनच्या या मुखपत्राने त्यांच्या नियुक्तीवर चिंता व्यक्त केली. टिलरसन यांच्यावर चीन खूश नव्हता, पण ते पॉम्पिओ यांच्यापेक्षा कितीतरी चांगले होते, हे मान्य करावेच लागेल, असा दावा चीनचे विश्‍लेषक ‘फेंग झँग’ यांनी केला आहे. तर इराणने पॉम्पिओ यांची नियुक्ती म्हणजे ट्रम्प प्रशासनाने इराणबरोबरील अणुकरारातून माघार घेण्यासाठी केलेली तयारी, असल्याचे परखड मत व्यक्त केले. टिलरसन यांच्यापेक्षा पॉम्पिओ अणुकराराचे समर्थन करणार्‍या युरोपिय देशांच्या विरोधात अधिक कठोर भूमिका घेतील, असे भाकित इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तुर्कीनेही पॉम्पिओ यांची नियुक्ती अस्वस्थ करणारी असल्याचा दावा केला.

पाकिस्तानच्या विश्‍लेषकांनी यापुढे आपल्या देशाची धडगत नसल्याचे सांगून माईक पॉम्पिओ आता पाकिस्तानला धारेवर धरतील, अशी भीती व्यक्त केली. ‘सीआयए’चे प्रमुख असतानाच पॉम्पिओ यांनी पाकिस्तान दहशतवादधार्जिणी भूमिका घेत असल्याची घणाघाती टीका केली होती. पाकिस्तानात दहशतवाद्यांचे सुरक्षित स्वर्ग असल्यानेच अफगाणिस्तानातील युद्ध जिंकणे अमेरिकेसाठी अवघड बनले आहे’, असा दावा माईक पॉम्पिओ यांनी केला होता. त्यामुळे परराष्ट्रमंत्रीपदावर असताना माईक पॉम्पिओ पाकिस्तानची कोंडी करून अमेरिकेचे पाकिस्तानबाबतचे धोरण अधिकच आक्रमक करतील, असे पाकिस्तानी विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. अगदी आठवडाभरापूर्वीही पॉम्पिओ यांनी पाकिस्तानला खरमरीत इशारा दिला होता, याचा दखला पाकिस्तानचे विश्‍लेषक देत आहेत.

चीन, इराण, तुर्की व पाकिस्तानसारखे अमेरिकेच्या विरोधात खडे ठाकलेले देश पॉम्पिओ यांच्या विरोधात मतप्रदर्शन करीत असताना, ते परराष्ट्रमंत्री म्हणून नक्कीच प्रभावी कामगिरी करतील, असा विश्‍वास अमेरिकेतील माध्यमांच्या एका गटाने व्यक्त केला आहे. किंबहुना चीन, इराण, तुर्की व पाकिस्तान या देशांकडून माईक पॉम्पिओ यांच्या नियुक्तीवर उमटलेली प्रतिक्रिया याचीच साक्ष देत असल्याचे स्पष्ट होत आहे.

(Courtesy: www.newscast-pratyaksha.com)