रशिया व इराणला वेळीच रोखले नाही तर आखातात युद्धाचा भडका उडेल – अमेरिकेच्या माजी वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांचा दावा

रशिया व इराणला वेळीच रोखले नाही तर आखातात युद्धाचा भडका उडेल – अमेरिकेच्या माजी वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांचा दावा

वॉशिंग्टन/लंडन – ‘रशिया आणि इराण, दोघेही आखातात वर्चस्व आणि सत्ता गाजविण्याची अतीव महत्त्वाकांक्षा बाळगून आहेत. या दोन्ही देशांच्या महत्त्वाकांक्षेवर वेळीच नियंत्रण ठेवले नाही तर आखातात युद्धाचा भडका उडू शकतो’, असा दावा अमेरिकेचे माजी उपसंरक्षणदलप्रमुख जनरल ‘जॅक केन’ यांनी केला. सिरियातील अस्साद राजवटीने आपल्याच नागरिकांवर केलेल्या रासायनिक हल्ल्यांमुळे युद्धाची ही शक्यता बळावल्याची चिंता जनरल केन यांनी व्यक्त केली.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या कारकिर्दीत इराक युद्धासाठी सल्लागार म्हणून सेवा बजावणार्‍या जनरल केन यांनी नुकताच ब्रिटनचा दौरा करून पंतप्रधान ‘थेरेसा मे’ यांची भेट घेतली. यानंतर ब्रिटनमधील एका ‘डिजिटल रेडिओ’शी बोलताना जनरल केन यांनी सिरियातील अस्साद राजवटीशी तडजोड होऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले.

‘सिरियातील अस्साद राजवटीने आपल्या जनतेवर सुरू केलेल्या हल्ल्यांना रोखण्यासाठी वाटाघाटी शक्य नाहीत. कारण रशिया आणि इराणने अस्साद राजवटीला अशा वाटाघाटींसाठी चांगलेच तयार केले आहे’, असे सांगून जनरल केन यांनी अस्साद राजवटीबरोबर चर्चा करण्याची रशियाने मांडलेली योजना मान्य करता येणार नसल्याचा दावा केला. या व्यतिरिक्त सिरियातील अस्साद राजवटीला जेरीस आणायचे असल्यास सिरियन वायुसेनेच्या ठिकाणांवर नेमके हल्ले चढविण्याची गरज असल्याचे जनरल केन म्हणाले.

गेल्या काही आठवड्यांमध्ये आखातात सुरू असलेल्या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना या क्षेत्रात लवकरच युद्धाचा भडका उडणार असल्याचे जनरल केन यांनी ठासून सांगितले. आखातातील युद्धासाठी रशिया व इराण कारणीभूत असतील, असा आरोप जनरल केन यांनी केला. यापैकी आखातावर वर्चस्व मिळविण्याची इराणची महत्त्वाकांक्षा युद्धाचे कारण ठरू शकते, असा दावा जनरल केन यांनी केला.

‘इस्रायलचे लेबेनॉन व हिजबुल्लाहबरोबर युद्ध पेटले तरी लेबेनॉनच्या आडून इराण या युद्धात सहभागी झालेला असेल. याआधीही इराण अशा संघर्षापासून स्वतः दूर राहून हिजबुल्लाहच्याद्वारे युद्ध खेळला होता. त्यामुळे लेबेनॉनप्रमाणे सिरिया, येमेन आणि इतर देशांमध्ये इराण आपल्या समर्थकांच्या सहाय्याने संघर्ष छेडू शकतो’, असा दावा जनरल केन यांनी केला.

(Courtesy: www.newscast-pratyaksha.com)

leave a reply