Breaking News

चीनने ‘रेड लाईन’चे उल्लंघन केले तर फिलिपाईन्स चीनबरोबर युद्ध पुकारेल

फिलिपाईन्सच्या परराष्ट्रमंत्र्यांचा इशारा

मनिला – “‘साऊथ चायना सी’बाबत फिलिपाईन्सने काही ‘रेड लाईन’ निर्धारित केल्या आहेत. या ‘रेड लाईन’ ओलांडून चीनने फिलिपाईन्सच्या इंधनवायूच्या साठ्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला तर फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष चीनबरोबर युद्ध पुकारतील”, असा इशारा फिलिपाईन्सच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिला. त्याचबरोबर ‘साऊथ चायना सी’मधील चीनच्या सर्वच हालचाली खपवून घेणार नसल्याचे फिलिपाईन्सच्या परराष्ट्रमंत्र्यांनी फटकारले आहे. गेल्या काही महिन्यांपासून चीनबरोबर मैत्रिपूर्ण सहकार्य प्रस्थापित करू पाहणार्‍या फिलिपाईन्सने दिलेला हा इशारा म्हणजे चीनसाठी धक्का ठरतो.

रेड लाईन, उल्लंघन, रॉड्रिगो दुअर्ते, फिलिपाईन्स, युद्ध, चीन, स्कारबोरो शोल, Third World War, South China Seaगेल्या काही वर्षांपर्यंत फिलिपाईन्सच्या सरकारने ‘साऊथ चायना सी’बाबत चीनविरोधी भूमिका स्वीकारली होती. ‘साऊथ चायना सी’वरील काही सागरी क्षेत्रावर आपला हक्क असल्याचे सांगून फिलिपाईन्सने चीनच्या दावेदारीला आव्हान दिले होते. फिलिपाईन्सने याप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात धावही घेतली होती. पण दीड वर्षांपूर्वी रॉड्रिगो दुअर्ते फिलिपाईन्सच्या सत्तेवर आल्यानंतर फिलिपाईन्सच्या परराष्ट्र धोरणात महत्त्वाचे बदल झाले होते.

राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी अमेरिकेबरोबरचे पारंपरिक सहकार्य तोडून चीनबरोबर जवळीक केली. ‘साऊथ चायना सी’बाबत चीनबरोबर फिलिपाईन्सचे मतभेद नसल्याचे दुअर्ते यांनी जाहीर केले होते. त्यानंतर दुअर्ते यांनी चीनकडून लष्करी सहकार्य मिळविण्यास सुरुवात केली होती. दुअर्ते यांच्या या भूमिकेच्या विरोधात फिलिपाईन्समधील विरोधी पक्षांनी रान उठविले होते. फिलिपाईन्सच्या हद्दीत घुसखोरी करणार्‍या चीनविरोधात राष्ट्राध्यक्ष दुअर्ते आवाज उठवित नसल्याची टीकाही सुरू झाली होती.

पण दोन दिवसांपूर्वी फिलिपाईन्सचे परराष्ट्रमंत्री ‘अ‍ॅलन पीटर केतानो’ यांनी ‘साऊथ चायना सी’मधील चीनच्या उत्खननावर आक्षेप घेऊन गंभीर इशारा दिला. “‘साऊथ चायना सी’मधील इंधनसाठ्यावर या सागरी क्षेत्रातील देशांचा समान अधिकार आहे. कुठलाही देश एकतर्फी निर्णय घेऊन या क्षेत्रातील इंधनसाठ्याचा उपसा करू शकत नाही. या सागरी क्षेत्रातील फिलिपाईन्सच्या हद्दीतून जर कुणी इंधनसाठ्याचे उत्खनन सुरू केले तर फिलिपाईन्स थेट युद्ध सुरू करील, असे राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी ठणकावले’’, अशी घोषणा परराष्ट्रमंत्री केतानो यांनी केली.

त्याचबरोबर ‘साऊथ चायना सी’मधील ‘रेड लाईन’बाबत राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी आधीच चीनला बजावले होते. फिलिपाईन्सच्या सागरी हद्दीतील उत्खनन, सागरी गस्त किंवा इतर हालचाली फिलिपाईन्सला मान्य नाहीत, याविषयी चीनला कळविल्याची माहिती परराष्ट्रमंत्री केतानो यांनी दिली. याबाबत वेळ येईल तेव्हा राष्ट्राध्यक्ष दुअर्ते आपली भूमिका जाहीर करतील, असा दावा केतानो यांनी केला.

‘साऊथ चायना सी’मधील ‘स्कारबोरो शोल’ या भागावर फिलिपाईन्सने आपला अधिकार सांगितला असून येथील काही बेटांवर फिलिपाईन्सच्या नौदलाने तळही ठोकला आहे. पण चीनला फिलिपाईन्सचा हा अधिकार मान्य नसून संपूर्ण ‘साऊथ चायना सी’वर आपला अधिकार असल्याचा दावा चीन करीत आहे. फिलिपाईन्सप्रमाणे व्हिएतनाम, तैवान, ब्रुनेई, मलेशिया या देशांचे सागरी अधिकारही चीनने धुडकावून लावले आहेत.

दरम्यान, गेल्या दीड वर्षात ‘साऊथ चायना सी’मधील चीनच्या भूमिकेबाबत सौम्य धोरण स्वीकारणार्‍या फिलिपाईन्सने आक्रमक भूमिका स्वीकारून चीनला इशारा दिला आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info/status/1002229415219089408
https://www.facebook.com/WW3Info/posts/400035213738302