चीनमध्ये राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या एकाधिकारशाहीला धक्के

चीनमध्ये राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या एकाधिकारशाहीला धक्के

लंडन – अमेरिकेबरोबरील व्यापारयुद्धाचे परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवर जाणवू लागले असताना, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या एकाधिकारशाहीला चीनमध्ये धक्के बसू लागले आहेत. राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या धोरणांवर चिनी विश्‍लेषक उघडपणे टीका करू लागले आहेत. त्याचवेळी जिनपिंग यांचे पूर्ण नियंत्रण असलेल्या कम्युनिस्ट पक्षातील सुधारणावादी व बुद्धिमंतही जिनपिंग यांच्यामुळे गेल्या चाळीस वर्षातील सुधारणा धुळीला मिळाल्याची खंत व्यक्त करीत आहेत.

काही दिवसांपूर्वी चीनमध्ये मुलांना निकृष्ट दर्जाच्या लसी वापरण्यात आल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. यात झालेल्या गैरव्यवहारांचा संबंध चीनचे सर्वोच्च नेते जिनपिंग यांच्याशी जोडण्यात आला होता. सत्तेवर आल्यापासून राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी भ्रष्टाचार व गैरव्यवहारांच्या विरोधात कडक कारवाई हाती घेऊन चीनचे वरिष्ठ नेते व अधिकार्‍यांची गय केली जाणार नाही, अशी ग्वाही दिली होती. भ्रष्टाचारविरोधी नेता अशी आपली प्रतिमा उभी करणार्‍या राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या कार्यकाळात झालेल्या या घोटाळ्यामुळे त्यांच्या स्थानाला धक्का बसला आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेची घसरण ही राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यासमोरील सर्वात मोठी समस्या मानली जाते.

अमेरिकेबरोबर व्यापारयुद्ध सुरू झाल्यानंतर चीनच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण येऊ लागला असून अर्थकारण मंदावले आहे. पुढच्या काळात चीनच्या अर्थव्यवस्थेला अधिक बिकट समस्यांचा सामना करावा लागणार असल्याचे संकेत तीव्र बनलेल्या व्यापारयुद्धातून मिळत आहेत. अशा काळात राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी स्वीकारलेल्या आक्रमक परराष्ट्र धोरण तसेच आर्थिक धोरणावरही चिनी विश्‍लेषक प्रश्‍न उपस्थित करीत आहेत. अतिआक्रमक धोरणांमुळे चीनची प्रतिमा विस्तारवादी देश अशी बनली असून सर्वच देश यामुळे धास्तावले आहेत. ही बाब चीनला महाग पडू शकते, असा दावा एका विश्‍लेषकाने केला. त्याचवेळी ‘वन रोड, वन बेल्ट’ प्रकल्पासाठी चीनने परदेशात केलेली प्रचंड गुंतवणूक देखील टीकेचा विषय बनली आहे.

दुसर्‍या देशांमध्ये अवाढव्य गुंतवणूक करण्याच्या ऐवजी चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्याच देशात अधिक गुंतवणूक करणे अपेक्षित होते, असा ठपका अर्थतज्ज्ञांनी ठेवला आहे. तसेच ‘माओ त्से तुंग’ यांच्या काळानंतर चीनमध्ये सुरू झालेल्या राजकीय सुधारणांची प्रक्रिया राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी बंद पाडली. इतकेच नाही तर त्यांनी चीनला राजकीयदृष्ट्या अधिक मागे नेले आहे, असा दावा करून काही विश्‍लेषकांनी त्यांच्यावरील टीका अधिकच तीव्र केली आहे.

चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची एकाधिकारशाही असून या पक्षावर जिनपिंग यांचे सध्या तरी पूर्ण नियंत्रण आहे. पण चीनची अर्थव्यवस्था धोक्यात आल्याने व यामुळे जनतेची नाराजी वाढू लागल्याने, राष्ट्राध्यक्ष जिनपिंग काहीसे अडचणीत आल्याचे दिसत आहे. याच काळात त्यांच्यावर कम्युनिस्ट पक्षातील सुधारणावादी व बुद्धिमंत टीका करू लागले आहेत, हा योगायोग नक्कीच नाही. हा विरोध राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची सत्ता उलथण्याइतका तीव्र नसला तरी त्यातून शी जिनपिंग यांच्या एकाधिकारशाहीला धक्के बसू लागल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. ही बाब पाश्‍चिमात्य माध्यमांनी उचलून धरली असून पुढच्या काळात चीनमध्ये जिनपिंग यांना होणारा विरोध अधिकच तीव्र होऊ शकेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

English हिंदी

 

इस समाचार के प्रति अपने विचार एवं अभिप्राय व्यक्त करने के लिए नीचे क्लिक करें:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info