पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्षांच्या चुकीची किंमत इस्रायलला चुकवावी लागेल – हमासचा इस्रायल व पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष अब्बास यांना इशारा

पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्षांच्या चुकीची किंमत इस्रायलला चुकवावी लागेल – हमासचा इस्रायल व पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष अब्बास यांना इशारा

गाझा – पॅलेस्टाईनच्या दोन राजकीय गटांमधील सत्तासंघर्ष तीव्र झाला असून गाझापट्टीतील हमासने इस्रायलला धमकावले आहे. वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी गाझापट्टीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर इस्रायलला त्याची किंमत चुकती करावी लागेल, असा इशारा हमासने दिला. त्याचबरोबर गाझापट्टीच्या कोंडीमागे अब्बास प्रशासन असल्याचा आरोपही हमासने केला.

इजिप्तच्या मध्यस्थीने गाझातील हमास आणि इस्रायलमध्ये संघर्षबंदी लागू झाली असून इस्रायलने गाझाच्या सीमारेषा मोकळ्या केल्या आहेत. याबरोबरच इस्रायलमधून गाझापट्टीत मानवतावादी सहाय्य घेऊन ट्रक्स दाखल झाले आहेत. इस्रायलने गाझावरील हे निर्बंध काढल्याचा दावा करून हमास नेता इस्माईल हनिया यांनी या निर्णयावर समाधान व्यक्त केले होते. पण गाझावरील निर्बंध शिथिल केले असून ते पूर्णपणे मागे घेतलेले नाहीत, असे इस्रायलने स्पष्ट केले. तसेच शस्त्रास्त्रांची तस्करी रोखण्यासाठी गाझापट्टीवरील निर्बंध कायम राहतील, असा इशाराही इस्रायलने दिला होता.

पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष, चुक, महमूद अब्बास, हमास, इस्रायल, निर्बंध, Gaza, ww3, इजिप्त

गाझावर निर्बंध कायम ठेवण्याच्या इस्रायलच्या या निर्णयावर टीका करून हमासने इशारा दिला. गेल्या दहा वर्षांपासून इस्रायलने गाझापट्टीवर लादलेल्या या निर्बंधांसाठी वेस्ट बँकमधील फताहचे प्रमुख महमूद अब्बास जबाबदार असल्याचा ठपका हमासने ठेवला. ‘अब्बास यांनी गाझापट्टीवर टाकलेले निर्बंध सुरू राहिले किंवा वाढविले, तर इस्रायलला त्यासाठी जबाबदार धरून इस्रायललाच आम्ही त्याची किंमत मोजायला लावू’, अशी धमकी हमासने दिली. याआधीही हमासने गाझातील पॅलेस्टिनींवरील संकटांसाठी वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनींचे नेते अब्बास जबाबदार असल्याचा ठपका ठेवला होता.

पॅलेस्टाईनच्या गाझापट्टी आणि वेस्ट बँक अशा दोन भागांवर पॅलेस्टिनी जनतेने निवडून दिलेले सरकार असावे, अशी मागणी अरब देश करीत आहेत. यासाठी गाझातील हमास तर वेस्ट बँकमधील फताह या दोन विरोधी पॅलेस्टिनी गटांमध्ये एकी व्हावी म्हणून इजिप्तचे प्रयत्न सुरू आहेत. पण पॅलेस्टाईनमधील हे दोन्ही गट समेट करण्यासाठी तयार नाहीत. अमेरिका व पाश्‍चिमात्य आणि अरब देशांची मान्यता असलेले वेस्ट बँकेतील राष्ट्राध्यक्ष अब्बास यांच्या ‘पॅलेस्टिनियन अथॉरिटी’ने (पीए) गाझापट्टीवरही हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे.

‘‘हमासने गाझापट्टीचा हक्क सोडून आपल्या ‘पीए’च्या सरकारचे नेतृत्व मान्य करावे’’, अशी मागणी अब्बास यांनी गेल्याच आठवड्यात केली होती. त्याचबरोबर हमासने गाझाचे सारे अधिकार ताबडतोब सोडावे, असेही अब्बास यांनी स्पष्ट केले होते. पण हमास ‘पीए’मध्ये सहभागी होण्यास तयार नसून उलट अब्बास यांचे प्रशासन असलेल्या वेस्ट बँकमध्येही आपले समर्थक असल्याचा दावा हमास करीत आहे. त्यामुळे पॅलेस्टाईनच्या दोन्ही गटांमध्ये गाझा व वेस्ट बँकवरील नियंत्रणासाठी सत्तासंघर्ष पेटला आहे.

त्यात ‘पीए’चे राष्ट्राध्यक्ष अब्बास यांनी इस्रायलकडे गाझापट्टीवर आर्थिक आणि राजकीय दबाव कायम ठेवण्याची मागणी केल्याचा आरोप हमास करीत आहे. इस्रायलने गाझापट्टीच्या सीमारेषेची कोंडी फोडू नये, असा इशारा पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष अब्बास यांनी काही आठवड्यांपूर्वी दिला होता. त्यामुळे पॅलेस्टाईनच्या सत्तेसाठी हमास आणि फताहमधील सत्तासंघर्ष तीव्र बनल्याचे दिसत आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info