Breaking News

‘साऊथ चायना सी’मध्ये युद्धनौका रवाना करून ब्रिटनने चीनबरोबरचे सहकार्य धोक्यात टाकले – चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा

बीजिंग – ‘साऊथ चायना सी’च्या हद्दीत युद्धनौका रवाना करून ब्रिटनने मोठी चूक केल्याचा इशारा चीनने दिला आहे. ‘‘युरोपिय महासंघातून बाहेर पडण्याच्या ब्रिटनच्या ‘एक्झिट’नंतर चीनबरोबर मुक्त व्यापारी करार करण्याच्या प्रयत्नांना ‘साऊथ चायना सी’मधील गस्तीमुळे फटका बसू शकतो. त्यामुळे ब्रिटनने वेळीच आपली चूक सुधारावी’’, अशी धमकी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली. चीन हा ब्रिटनचा सर्वात मोठा व्यापारी सहकारी देश म्हणून समोर येत आहे. त्यामुळे चीनने ब्रिटनला दिलेल्या या धमकीचे गांभीर्य वाढले आहे.

ब्रिटनच्या नौदलातील ‘एचएमएस ऍल्बियॉन’ या ऍम्फिबियस युद्धनौकेने गेल्या आठवड्यात ‘साऊथ चायना सी’मधून प्रवास केला. ब्रिटनचे रॉयल मरिन्स तैनात असलेल्या या युद्धनौकेने या सागरी क्षेत्रातील ‘पॅरासेल’ द्विपसमुहांच्या हद्दीजवळून प्रवास केला होता. ब्रिटिश युद्धनौकेच्या ‘साऊथ चायना सी’मधील प्रवासावर चीनने टीका केली होती. या संपूर्ण सागरी क्षेत्रावर आपले वर्चस्व असून ब्रिटनने परवानगीशिवाय चीनच्या सागरी क्षेत्रात युद्धनौका रवाना करून चिथावणी दिली आहे, अशी टीका चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली होती. तसेच ‘साऊथ चायना सी’मधील चीनची गस्त ही आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन असल्याचा आरोपही केला होता.या आरोपांना काही तास उलटत नाही तोच, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या ‘हुआ चुनयिंग’ यांनी ब्रिटनला गंभीर इशारा दिला.

‘‘चीनबरोबर सहकार्याचा ‘सुवर्णयुग’ प्रस्थापित करण्याची घोषणा करणार्‍या ब्रिटनने चीनबरोबरच्या सहकार्याचे उल्लंघन केले आहे. ब्रिटनच्या या कारवाईचा थेट परिणाम उभय देशांमधील संबंधांवर नक्कीच होईल’’, असा इशारा चुनयिंग यांनी दिला. त्याचबरोबर ब्रिटनने चीनबरोबरच्या सहकार्याचे गांभीर्य ओळखून वेळीच आपली चूक सुधारावी, असा इशारा देऊन दोन्ही देशांमधील व्यापारी सहकार्याची जाणीव करून दिली.

चुनयिंग यांनी चिनी माध्यमांशी बोलताना हा इशारा दिल्यानंतर पुढच्या काही तासात चीनच्या मुखपत्राने ब्रिटनवर जोरदार ताशेरे ओढले. त्याचबरोबर ब्रिटनला चीनबरोबरच्या सहकार्याचा विसर पडल्याचा आरोप केला. येत्या काही महिन्यांमध्ये ब्रिटन युरोपिय महासंघातून बाहेर पडणार आहे. या ‘ब्रेक्झिट’नंतर ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडू नये म्हणून चीनने ब्रिटनबरोबर मुक्त व्यापार करण्याची घोषणा केली होती. यामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल, असा दावा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी केला होता.

असे असताना ब्रिटनने ‘साऊथ चायना सी’मध्ये युद्धनौका रवाना करून चीनबरोबरच्या व्यापारी सहकार्याचे भविष्य धोक्यात टाकल्याची धमकी चीनच्या मुखपत्राने दिली. चीनने ‘साऊथ चायना सी’च्या संपूर्ण सागरी क्षेत्रावर वर्चस्व सांगितले आहे. तसेच या सागरी क्षेत्रातून परदेशी जहाजांना चीनच्या परवानगीशिवाय प्रवेश नसल्याची धमकीही चीन देत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून या सागरी क्षेत्रातून प्रवास करणार्‍या जहाजे तसेच विमानांना चीनच्या नौदलाकडून धमक्या दिल्या जात आहेत. यामुळे या सागरी क्षेत्रातून होणार्‍या तीन ट्रिलियन डॉलर्सच्या व्यापाराच्या सुरक्षेवर प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.

English हिंदी

 

Click below to express your thoughts and views on this news:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info