Breaking News

चीन युरोप बळकावण्याच्या प्रयत्नात – युरोपियन विश्‍लेषकांचा इशारा

जीनिव्हा – आशियामार्गे युरोपला जोडणी करू पाहणारी चीनच्या महत्त्वाकांक्षी ‘वन बेल्ट वन रोड’ योजना (ओबीओआर) म्हणजे कर्जाचा सापळा आहे. त्यामागे युरोपची बाजारपेठ बळकाविण्याचा कट असल्याचा घणाघाती आरोप युरोपमधील काही विश्‍लेषकांनी केला आहे. त्याचबरोबर युरोपिय देश व महासंघाने चीनच्या जाळ्यात अडकू नये, असे आवाहनही या विश्‍लेषकांनी केले आहे.

कर्जाचा सापळा, कट, OBOR, युरोपिय महासंघ, आरोप, world war 3, चीन, पाकिस्तानसंयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार संघटनेचे विशेष सत्र नुकतेच ब्रुसेल्स येथे पार पडले. यावेळी आशियाई देशांमधील घडामोडी आणि युरोपिय महासंघाबरोबरचे या देशांचे संबंध याचा अभ्यास करणार्‍या ‘साऊथ एशिया डेमोक्रॅटिक फोरम’ (एसएडीएफ) या अभ्यासगटाशी संबंधित विश्‍लेषकांनी चीनवर हे आरोप केले. जमिन आणि सागरीमार्गे युरोपला जोडणारा चीनचा ‘ओबीओआर’ प्रकल्प युरोपिय देशांसाठी मोठे संकट ठरेल, असा इशारा या विश्‍लेषकांनी यावेळी दिला.

‘चीनला सार्‍या जगाचा ताबा घ्यायचा आहे, जगाचे नेतृत्व करायचे आहे. चीनची ही महत्त्वाकांक्षा युरोपसाठी संकट ठरेल. कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून युरोपला हद्दपार करून चीनला युरोपवर नियंत्रण मिळवायचे आहे’, असा आरोप ‘एसएडीएफ’ या अभ्यासगटाचे संचालक ‘सेगफ्रेड वुल्फ’ यांनी केला. यासाठी ‘वुल्फ’ यांनी मध्य आशियाई देशांमध्ये सुरू असलेल्या चीनच्या हालचालींचा दाखला दिला. मध्य आशियातील काही देशांना चीनने नव्या पायाभूत सुविधांसाठी प्रचंड पैसा पुरविला आहे. हा पैसा पुरविताना चीनने या देशांच्या व्यवस्थेवरही प्रभाव प्रस्थापित केला आहे, याची आठवण ‘वुल्फ’ यांनी करून दिली.

पाकिस्तानवरील चीनचा प्रभाव याचे उत्तम उदाहरण ठरेल, असे वुल्फ म्हणाले. चीनच्या या हालचालींमुळे आशिया तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवरील युरोपिय महासंघाचा प्रभाव नष्ट होऊ शकतो, असा दावा ‘वुल्फ’ यांनी केला. तर ‘ओबीओआर’च्या माध्यमातून चीन संबंधित देशांवरचे आपले वर्चस्व वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप या अभ्यासगटाचे संस्थापक आणि ‘युरोपियन पार्लामेंट’चे माजी सदस्य ‘पाओलो कॅसाका’ यांनी केला.

‘चीनच्या या कर्जाच्या सापळ्याला युरोपिय देशांनी वेळेच ओळखणे गरजेचे आहे. चीनच्या या सापळ्यात श्रीलंका अडकली आहे. चीनने दिलेल्या कर्जाची परतफेड जमली नाही म्हणून श्रीलंकेचे बंदर चीनने ताब्यात घेतले’, असे सांगून कॅसाका यांनी युरोपिय देशांना चीनपासून सावध केले. ‘‘‘साऊथ चायना सी’च्या प्रकरणात चीन आंतरराष्ट्रीय नियमांची पर्वा केली नाही, हे लक्षात घ्या. युरोपिय नेत्यांनी वेळीच आपल्या अधिकारांचा वापर केला नाही तर युरोपबाबत देखील चीन असेच करील’’, असा इशाराच कॅसाका यांनी दिला.

तर हंगेरीचे माजी परराष्ट्रमंत्री ‘इस्तवान ईवायी’ यांनीही चीनपासून असलेला धोका अधोरेखित केला. ‘‘चीन हा शांतीप्रिय देश असल्याची आतापर्यंत आपली समजूत होते. त्याचबरोबर चीन एक चांगला सहकारी असून चीनपासून कुठलाही धोका नसल्याचे वाटत होते. पण चीनची ‘ओबीओआर’ योजना पाहिल्यानंतर आपला भ्रमनिरास झाला. कारण ‘ओबीओआर’ हा विकास प्रकल्प नाही तर चीनच्या विस्तारवादी योजनेचे मोठे कारस्थान आहे. या योजनेबरोबर चीन फक्त आशियाच नाही तर आफ्रिका आणि युरोपपर्यंत आपले पाय पसरण्याच्या प्रयत्नात आहे’’, असा आरोप ईवायी यांनी केला.

‘‘चीनपासून जागतिक व्यवस्थेला मोठा धोका आहे. ‘साऊथ चायना सी’, ‘जिबौती’, श्रीलंका आणि पाकिस्तानमधील चीनच्या हालचाली याचे संकेत देणारे असून सार्‍या जगाने याकडे लक्ष द्यावे’’, असे आवाहन ईवायी यांनी दिले.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info