१९६७ सालच्या युद्धात जिंकलेल्या गोलान टेकड्यांवरील इस्रायलचे सार्वभौमत्व रशियाला अमान्य – रशियन परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह

१९६७ सालच्या युद्धात जिंकलेल्या गोलान टेकड्यांवरील इस्रायलचे सार्वभौमत्व रशियाला अमान्य – रशियन परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह

मॉस्को/जेरूसलेम – रशिया आणि इस्रायलमधील तणाव निवळण्याची चिन्हे धुसर होत आहेत. सिरियामध्ये ‘एस-३००’ विमानभेदी हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात केल्यानंतर रशियाने गोलान टेकड्यांवरील इस्रायलचे सार्वभौमत्व मान्य करण्यास नकार दिला आहे. दोन दिवसांपूर्वी इस्रायलच्या पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाच्या पार्श्‍वभूमीवर रशियाने ही प्रतिक्रिया दिली.

गेल्या कित्येक महिन्यांच्या संघर्षानंतर इस्रायल व सिरियामधील गोलान टेकड्यांच्या सीमारेषेवर शांती प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतीसैनिकांच्या माघारीमुळे गोलानच्या ‘कुनित्रा’ सीमेवरील सुरक्षा चौकीवर रशियन लष्कराने ताबा घेतला आहे. रशियन लष्कराने या भागात गस्त सुरू केली असून इस्रायलच्या लष्करानेही या भागातील आपली सैन्यतैनाती व गस्त वाढविली आहे.

सिरियाच्या दक्षिणेकडील गोलान भागात ‘आयएस’चे दहशतवादी दडून असल्याचा दावा केला जातो. त्याचबरोबर इराणचे रिव्होल्युशनरी गार्ड्सचे जवान व हिजबुल्लाहचे दहशतवादी देखील याच भागात तळ ठोकून असल्याचा आरोप इस्रायलने याआधी केला होता. या पार्श्‍वभूमीवर इस्रायल व सिरियाच्या सीमेवरील या लष्करी हालचालींचे गांभीर्य वाढले होते.

सीमाभागात हा तणाव निर्माण झालेला असताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी दोन दिवसांपूर्वी गोलान टेकड्यांचा दौरा केला होता. यावेळी गोलानवरील सुरक्षेची पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाने गोलानवरील इस्रायलचा अधिकार मान्य करावा, असे आवाहन केले होते. त्याचबरोबर इस्रायलने गोलानमधून माघार घेतली तर पुढच्या काही तासातच इराणचे लष्कर या भागात पाय रोवतील, असा इशाराही नेत्यान्याहू यांनी दिला होता.

अमेरिकेने गोलानवरील इस्रायलचा अधिकार मान्य केला आहे. पण इस्रायली पंतप्रधानांच्या या इशार्‍यावर रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी प्रतिक्रिया दिली. ‘गोलान टेकड्यांचा कायदेशीर निर्णय हा संयुक्त राष्ट्रसंघाची सुरक्षा परिषदच देऊ शकते. त्यामुळे सुरक्षा परिषदेला डावलून रशियाने गोलानबाबत प्रतिक्रिया देणे म्हणजे राष्ट्रसंघाच्या नियमांचे उल्लंघन ठरेल’, असे सांगून लॅव्हरोव्ह यांनी इस्रायली पंतप्रधानांचे आवाहन धुडकावले.

1967 साली इजिप्त, सिरिया, जॉर्डन, इराक या देशांनी इस्रायलविरोधात युद्ध पुकारले होते. इस्रायलच्या लष्कराने अवघ्या सहा दिवसात हे युद्ध जिंकून सिरियाच्या गोलान टेकड्या आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. तेव्हापासून या भूभागावर इस्रायलचे नियंत्रण आहे.

इस्रायलचे सिरियातील हल्ले सुरूच राहणार – पंतप्रधान नेत्यान्याहू

जेरूसलेम – सिरियातील रशियाची ‘एस-300’ची तैनातीही इस्रायलच्या सिरियातील हवाई हल्ल्यांना रोखू शकणार नसल्याचा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी दिला. रशियाचे उपपंतप्रधान ‘मॅक्झिम अ‍ॅकिनोव्ह’ यांच्याबरोबर झालेल्या भेटीत पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी इस्रायलची भूमिका स्पष्ट केली.

सिरियातील रशियन विमानाच्या दुर्घटनेनंतर पहिल्यांदाच रशियाचे वरिष्ठ नेते इस्रायलच्या दौर्‍यावर दाखल झाले होते. पण रशियन विमानावरील हल्ल्यासाठी सिरियाच जबाबदार असल्याचे नेत्यान्याहू यांनी ठासून सांगितले.

 

English हिंदी

 

Click below to express your thoughts and views on this news:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info