पाकिस्तानचा दहशतवाद सिरियापेक्षा तिप्पट धोकादायक – आंतरराष्ट्रीय अभ्यासगटाचा इशारा

पाकिस्तानचा दहशतवाद सिरियापेक्षा तिप्पट धोकादायक – आंतरराष्ट्रीय अभ्यासगटाचा इशारा

लंडन/मुंबई – ‘जगातील सर्वाधिक धोकादायक दहशतवादी गट व त्यांच्यापासून असणार्या धोक्याचा अभ्यास केला, तर त्यातील जास्त गट हे पाकिस्तानस्थित किंवा पाकिस्तानने पोसलेले असल्याचे दिसून येते. पाकिस्तानचा शेजारी देश असलेल्या अफगाणिस्तानातील दहशतवादी गटही पाकिस्तानच्याच समर्थनावर उभे आहेत. त्यामुळे मानवी समाजाला पाकिस्तानकडून असणारा दहशतवादाचा धोका, सिरियापेक्षा तिपटीने अधिक आहे’, असा गंभीर इशारा आंतरराष्ट्रीय अभ्यासगटांनी दिला. या इशार्यामुळे भारताकडून ‘पाकिस्तानी दहशतवादा’च्या धोक्याविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात येणार्या प्रयत्नांना अधिकच बळ मिळाल्याचे दिसत आहे.

ब्रिटनमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी व ‘स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुप’ यांनी मानवी समाजाला असणार्या दहशतवादाच्या धोक्याबाबत विस्तृत अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. ‘ह्युमॅनिटी ऍट रिस्क-ग्लोबल टेरर थ्रेट इंडिकंट’(जीटीटीआय) नावाच्या या अहवालात, जगातील आघाडीच्या दहशतवादी संघटना, त्यांना सहाय्य करणारे देश, दहशतवाद्यांची संख्या या सर्व मुद्यांचा वेध घेण्यात आला आहे. त्यानुसार जगातील सर्वाधिक धोकादायक दहशतवादी संघटनांची संख्या ३१ असल्याचे सांगून त्यातील १४ दहशतवादी संघटना पाकिस्तानस्थित व पाकिस्तानकडून सहाय्य मिळणार्या असल्याचे नोंदविण्यात आले आहे.

पाश्चात्य प्रसारमाध्यमे फक्त ‘आयएस’ व ‘अल कायदा’कडून असणार्या दहशतवादाच्या धोक्याकडे जास्त लक्ष देत आहेत, याकडेही अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. प्रत्यक्षात दहशतवादी संघटनांचे सामर्थ्य, हल्ले व त्यांना मिळणारे सहाय्य यांचा विचार केला तर पाकिस्तान व अफगाणिस्तान हेच वाढत्या धोक्याचे केंद्र असल्याचे लक्षात येईल, याची जाणीव अहवालात करून देण्यात आली आहे.

जगातील सर्वाधिक धोकादायक दहशतवादी संघटनांमध्ये ‘अफगाण तालिबान’ व ‘लश्कर-ए-तय्यबा’ या दहशतवादी संघटनांचा असलेला समावेश याला पुष्टी देणारा ठरला आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांना सरकार व सरकारी यंत्रणांकडून मिळणारे सहाय्य या मुद्याचाही विशेष उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर दहशतवाद्यांकडून असणार्या आण्विक हल्ल्याच्या धोक्याचा संदर्भ देतानाही पाकिस्तानकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info