Breaking News

सौदीचे प्रिन्स व इस्रायलच्या पंतप्रधानांची गोपनीय बैठक पार पडणार – कतारच्या संकेतस्थळाचा दावा

लंडन – इस्रायल हा काही सौदी अरेबियाचा शत्रू नाही. सौदीसह आखातातील सर्वच देशांचा खरा शत्रू इराणच आहे, असा दावा इस्रायलचे नेते उघडपणे करीत आहेत. त्याला सौदीकडून प्रतिसाद मिळत असल्याचेही समोर येत आहे. आखातातील बदलत्या समीकरणांच्या पार्श्‍वभूमीवर, सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान लवकरच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांची भेट घेऊ शकतात. ‘कॅम्प डेव्हिड’च्या धर्तीवर क्राऊन प्रिन्स मोहम्मद, पंतप्रधान नेत्यान्याहू आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात छुपी बैठक होऊ शकते, अशी बातमी कतारच्या संकेतस्थळाने प्रसिद्ध केली. ही बैठक समीकरणे बदलणारी ठरेल, असा दावा सदर संकेतस्थळाने केला आहे.

प्रिन्स मोहम्मद यांनी आपल्या विशेष अधिकार्‍यांशी चर्चा करून इस्रायली पंतप्रधानांबरोबरच्या भेटीची तयारी केली आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मध्यस्थीने इस्रायली पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्याबरोबर त्रिपक्षीय बैठक आयोजित करण्याचे आदेश प्रिन्स मोहम्मद यांनी दिल्याचे सौदीच्या सूत्रांनी कतारी संकेतस्थळाला सांगितले. पत्रकार खशोगी याच्या हत्येनंतर सौदीच्या प्रिन्स मोहम्मद यांची प्रतिमा मलिन झाली आहे. ही प्रतिमा सुधारण्यासाठी ते उत्सुक असून यासाठी त्यांना इस्रायलचे सहाय्य अपेक्षित आहे. यासाठीच सदर बैठकीसाठी प्रिन्स मोहम्मद उत्सुक असल्याचे या संकेतस्थळाने म्हटले आहे.

यासाठी 1978 साली कॅम्प डेव्हिड येथे झालेल्या ‘बेगिन-सदात’ भेटीचा संदर्भ या संकेतस्थळाने केला. इस्रायल आणि अरब देशांमध्ये झालेल्या संघर्षानंतर अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांनी पुढाकार घेऊन इस्रायल व इजिप्तच्या नेत्यांमध्ये यशस्वी शांतीचर्चा घडविली होती. इस्रायलचे पंतप्रधान ‘मेनाशेम बेगिन’ आणि इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष ‘अन्वर सदात’ यांच्यात ‘कॅम्प डेव्हिड’ येथे ही बैठक पार पडली होती. अमेरिकेच्या ‘मेरिलँड’मध्ये असलेल्या ‘कॅम्प डेव्हिड’ येथे गोपनीय बैठकींचे आयोजन केले जाते. ‘कॅम्प डेव्हिड’ येथील बैठकींची माहिती कधीही जगजाहीर केली जात नाही. या परिसरात माध्यमांना परवानगी देखील दिली जात नाही. हे ठिकाण अमेरिकी राष्ट्राध्यक्ष व गुप्तचर यंत्रणेच्या नियंत्रणात आहे.

प्रिन्स मोहम्मद यांना देखील ‘कॅम्प डेव्हिड’प्रमाणे पंतप्रधान नेत्यान्याहू आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी चर्चा करायची आहे. पण ही बैठक ‘कॅम्प डेव्हिड’मध्ये होईल का, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. या बैठकीच्या निमित्ताने प्रिन्स मोहम्मद आखातात शांती प्रस्थापित करण्यासाठी तयार असल्याचा संदेश द्यायचा आहे, असा दावा या सूत्रांनी केला.

सौदी पत्रकार जमाल खशोगीच्या हत्येप्रकरणी प्रिन्स मोहम्मद यांच्यावर जोरदार टीका सुरू आहे. अमेरिकन सिनेट व माध्यमे प्रिन्स मोहम्मद हेच खशोगी हत्याकांडातील प्रमुख दोषी असल्याचा आरोप करीत आहेत. त्याचबरोबर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदीबरोबर लष्करी सहकार्य करू नये, असे सुचविले आहे. तर युरोपिय देशांनी खशोगी हत्याप्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर, सौदीबरोबर लष्करी व्यवहार शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. पण राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या एका प्रकरणामुळे सौदीबरोबरील सहकार्य अमेरिका तोडू शकत नाही, असे जाहीर केले आहे.

याआधी जून महिन्यात प्रिन्स मोहम्मद आणि पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्यात छुपी बैठक झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. जॉर्डनचे राजे अब्दुल्लाह यांच्या मध्यस्थीने अम्मान येथे ही छुपी बैठक पार पडल्याचा दावा इस्रायली दैनिकाने केला होता. तर अमेरिका, ब्रिटनमध्ये या दोन्ही देशांच्या गुप्तचर यंत्रणेच्या अधिकार्‍यांमध्ये चर्चा झाल्याचेही प्रसिद्ध झाले होते. पण दोन्ही देशांनी याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, सौदी अरेबिया व इतर आखाती देशांबरोबर मैत्रीपूर्ण सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी आपण तयार असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी याआधीच जाहीर केले आहे. महिन्याभरापूर्वी नेत्यान्याहू यांनी ओमानचा दौरा करून तसेच आपल्या मंत्र्यांना ‘संयुक्त अरब अमिराती’च्या दौर्‍यावर रवाना या सहकार्यासाठी एक पाऊल पुढे टाकले होते.

 English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info