युरोपात ‘आयएस’च्या दहशतवादी हल्ल्यांची दुसरी लाट धडकेल – इंटरपोलच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा इशारा

युरोपात ‘आयएस’च्या दहशतवादी हल्ल्यांची दुसरी लाट धडकेल – इंटरपोलच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा इशारा

जीनिव्हा – ‘आशिया तसेच युरोपच्या अनेक देशांमध्ये आयएसचे समर्थक असणार्‍या कट्टरपंथियांची येत्या काही काळात सुटका हेईल. सुटका झालेले हे कट्टरपंथिय समर्थक पुन्हा एकदा आयएसचा भाग बनू शकतात’, अशा शब्दात ‘इंटरपोल’ या आंतरराष्ट्रीय सुरक्षा संघटनेने युरोपात नजिकच्या काळात ‘आयएस’चे हल्ले तीव्र होण्याचा इशारा दिला आहे. मार्च महिन्यात, युरोपातील गुप्तचर यंत्रणांनी, तुरुंगातून सुटणारे कट्टरपंथी व दहशतवादी युरोपच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका ठरु शकतो, असे बजावले होते.

गेल्याच आठवड्यात फ्रान्सच्या स्ट्रासबर्गमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जणांचा बळी गेला आहे. हा हल्ला ‘आयएस’ समर्थक कट्टरपंथियाने घडविल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर युरोपात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यांचे सत्र सुरू होण्याची भीती सुरक्षा विषयक तज्ज्ञ तसेच विश्‍लेषकांकडून व्यक्त करण्यात येत होती. या पार्श्‍वभूमीवर इंटरपोलचे वरिष्ठ अधिकारी जुर्गन स्टॉक यांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

‘युरोपिय देशांमध्ये आयएसशी निगडीत किंवा त्यांचे समर्थक असलेल्या कट्टरपंथियांची दुसरी लाट धडकण्याची भीती आहे. या लाटेला आयएस २.० असे म्हणता येईल. इराक व सिरियातील आयएसच्या पराभवानंतर त्या भागातील दहशतवादी युरोपात माघारी येत आहेत. हे निराश व गमावण्यासारखे काहीही नसलेले दहशतवादी युरोपिय यंत्रणांसाठी चिंतेची बाब आहे’, अशा शब्दात इंटरपोलच्या महासंचालकांनी नव्या दहशतवादी हल्ल्यांच्या धोक्याकडे लक्ष वेधले. हे माघारी येणारे दहशतवादी युद्धाचा अनुभव असलेले, प्रशिक्षित व आंतरराष्ट्रीय संपर्क असलेले आहेत, ही बाब ध्यानात ठेवायला हवी, असे स्टॉक यांनी बजावले.

२०१७ साली युरोपमध्ये झालेल्या १५ दहशतवादी हल्ल्यांमध्ये सुमारे ८० जणांचा बळी गेला होता तर ८००हून अधिक जण जखमी झाले होते. त्यानंतर, युरोपिय यंत्रणा ‘आयएस’च्या इराक व सिरियामधून दाखल होणार्‍या दहशतवाद्यांना रोखण्याचे प्रयत्न करीत असतानाच, तुरुंगातून सुटणार्‍या दहशतवाद्यांच्या रुपात नवे आव्हान समोर ठाकले आहे.

फ्रान्समध्ये सुमारे ५०० संशयित दहशतवादी व कट्टरपंथियांना तुरुंगात डांबण्यात आले होते. या कट्टरपंथिय कैद्यांची २०२० सालच्या आत सुटका होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ब्रिटनमध्येही सुमारे २०० दहशतवादी तुरुंगात असून त्यातील अनेक जण नजिकच्या काळात सुटण्याची शक्यता आहे. बेल्जियममध्ये २०१६ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यांपूर्वी व त्यानंतर २००हून अधिक कट्टरपंथियांना दहशतवादाच्या आरोपांवरून तुरुंगात टाकण्यात आले आहे.

या महिन्याच्या सुरुवातीलाच ‘आयएस’ने दिलेल्या धमकीत, एका पोस्टरमध्ये ‘आयएस’चे दहशतवादी हातात रायफल्स घेऊन जर्मनीच्या बर्लिन शहरात फिरत असल्याचे दाखविण्यात आले होते. २०१६ साली ख्रिसमसच्या काळात ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी बर्लिनमध्ये केलेल्या हल्ल्याचा फोटो या पोस्टरमध्ये दाखविला होता. त्यापूर्वी सोशल मीडियावरील विविध पोस्टमध्ये युरोपिय देशांमध्ये निर्वासितांवरही हल्ले चढविण्याच्या धमक्या दिल्या होत्या.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info