Breaking News

चीनमध्ये ‘ख्रिसमस’ साजरा करण्यावर बंदी

बीजिंग – चीनमध्ये स्थानिक परंपरांचा पुरस्कार करण्यावर भर देणे गरजेचे असून परदेशी सणांचे अवडंबर माजविता कामा नये, अशा शब्दात चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीने आपल्या सदस्यांना ‘ख्रिसमस’ साजरा करण्यापासून दूर राहण्याची सूचना केली. या सूचनेची अंमलबजावणी चीनमधील काही भागांमध्ये सुरू झाली असून ‘ख्रिसमस’शी संबंधित सर्व सामान दुकानांमधून काढून टाकण्यात आले आहे. चीनमध्ये सुरू झालेली ही कारवाई राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी धार्मिक स्वातंत्र्याविरोधात राबविलेल्या आक्रमक धोरणाचा भाग असल्याचे मानले जाते.

चीनच्या नानयांग, हेन्गयांग, लँगफँग, पॅन्लॉंग या शहरांसह ‘फुपिंग कौंटी’मध्ये ‘ख्रिसमस’ सणाविरोधात कारवाई सुरू असल्याचे समोर आले आहे. नानयांग शहरात एका शॉपिंग मॉल व कार्यालयीन संकुलात ख्रिसमस सणासाठी केलेली रोषणाई व सजावट सरकारी अधिकार्‍यांच्या भेटीनंतर काढून टाकण्यात आली. हेन्गयांगमध्ये गेल्याच आठवड्यात अधिकृत सरकारी नोटिस जारी करून ‘ख्रिसमस’साठी कोणत्याही उत्पादनांची विक्री अथवा सजावट तसेच रोषणाई करणार्‍यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला होता.

युनान प्रांतातील पॅन्लॉंगमध्येही हॉटेल्ससह सार्वजनिक भागात सक्रिय असणार्‍या सर्व उपक्रमांना ‘ख्रिसमस’च्या निमित्त कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम आयोजित करु नये, असा आदेश देण्यात आला आहे. ‘ख्रिसमसच्या निमित्ताने टोप्या घालणे, ख्रिसमस ट्री उभारणे, ख्रिसमसच्या भेटींसाठी कोणत्याही प्रकारचा कपडा टांगणे व इतर कोणत्याही गोष्टींवर पूर्णपणे बंदी टाकण्यात आली आहे’, असे सरकारी नोटिसीत सांगण्यात आले आहे.

लँगफँग सिटी तसेच ‘फुपिंग कौंटी’मध्ये सार्वजनिक ठिकाणी ख्रिसमससाठी उभारण्यात आलेली सर्व प्रकारची सजावट, रोषणाई तसेच दुकानांमध्ये विक्रीस ठेवण्यात आलेल्या वस्तूंविरोधात आक्रमक कारवाई हाती घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था तसेच परदेशी दैनिकांच्या प्रतिनिधींनी याबाबत स्थानिक यंत्रणांशी संपर्क साधला असता, त्यांनी या मुद्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. चीनमधील प्रसारमाध्यमांनी परदेशी माध्यमे ‘ख्रिसमस’च्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या कारवाईच्या मुद्याला अकारण व अवास्तव महत्त्व देत असल्याची टीका केली आहे.

कोणत्याही धर्माचे पालन व धार्मिक स्वातंत्र्य याला महत्त्व न देणार्‍या चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीने गेल्या काही वर्षात या मुद्यावर अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग स्वतःला चीनच्या परंपरेचे पाईक म्हणून प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न करीत असून त्यासाठी देशातील इस्लाम तसेच ख्रिस्तीधर्मियांविरोधात जोरदार कारवाई सुरू झाली आहे. २०१७ साली चीनने आपल्या नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर अधिकच निर्बंध लादणारे कठोर नियम जाहीर केले होते. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी याबाबत स्वतंत्र कायदे करून धार्मिक स्वातंत्र्य संपुष्टात आणले आहे.

गेल्यावर्षी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या आदेशांनुसार, देशातील काही चर्च उद्ध्वस्त करण्यात आली होती. त्यानंतर ख्रिस्तधर्मियांसाठी पवित्र व श्रद्धेचा भाग असलेल्या प्रतीकांऐवजी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांचे फोटो व प्रतिमा वापराव्यात यासाठी मोहीम सुरू करण्यात आली होती. देशातील ११ लाखांहून अधिक इस्लामधर्मियांना सुधारणेच्या नावाखाली छळछावण्यांमध्ये पाठविण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडविणारा ठरला होता.

पूर्णपणे नास्तिकतेचा पुरस्कार करणारी चीनची कम्युनिस्ट राजवट आपल्या जनतेला धार्मिक स्वातंत्र्य देण्यास तयार नाही. कारण या धार्मिक स्वातंत्र्याचा वापर करून नागरिक आपल्या राजवटीविरोधात खडे ठाकतील, अशी चिंता चीनवर निरंकुश सत्ता गाजविणार्‍या कम्युनिस्ट पक्षाला वाटत आहे. चीनकडून होत असलेले हे धार्मिक तसेच नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे हनन हा आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंतेचा विषय बनला आहे. त्याचवेळ आपल्या आर्थिक व राजकीय ताकदीचा वापर करून चीन याविरोधात उठणारे आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही समोर आले आहे.

 English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info