Breaking News

अमेरिका चीनला वेढा घालत आहे – अमेरिकेच्या माजी राजनैतिक अधिकार्‍याचा दावा

वॉशिंग्टन – दक्षिण कोरियातील अमेरिकेच्या लष्कराची तैनाती आणि त्याचवेळी उत्तर कोरियाशी शांती प्रस्थापित करण्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारलेली भूमिका दक्षिण कोरियाच्या सुरक्षेसाठी नाही. तर दक्षिण कोरियातील अमेरिकी सैनिकांची तैनाती ही चीनविरोधात आहे. चीनला वेढा घालण्यासाठी ट्रम्प प्रशासनाकडून हे सारे केले जात आहेत, असा दावा अमेरिकेचे माजी राजनैतिक अधिकारी ‘जिम जॅट्रास’ यांनी केला.

अमेरिकन सिनेटच्या परराष्ट्र धोरणाचे माजी सल्लागार राहिलेल्या जॅट्रास यांनी एका रशियन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या धोरणांचा वेध घेणे अवघड असल्याचे म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांचे अनेक मुद्यांवर दुमत असल्याचे दिसते. कारण ट्रम्प यांचे धोरण त्यांच्या प्रशासनातील अधिकार्‍यांच्या धोरणांसारखे जगजाहीर करता येणारे नाही, असे जॅट्रास यांनी म्हटले आहे. यासाठी जॅट्रास यांनी सिरिया आणि उत्तर कोरियाचे उदाहरण दिले.

अमेरिकेने उत्तर कोरियाबरोबर वाटाघाटी न करता थेट कारवाई करावी, असे त्यांच्या प्रशासनातील अधिकार्‍यांचे म्हणणे होते. पण राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सिंगापूर येथे उत्तर कोरियन हुकूमशहा किम जॉंग-उन यांची भेट घेऊन धक्का दिला होता. यानंतर उत्तर कोरिया अण्वस्त्रमुक्त करण्यावर एकमत झाले. पण ट्रम्प यांची उत्तर कोरियन हुकूमशहांबरोबरची भेट म्हणजे मुत्सद्दी खेळी असल्याचा दावा जॅट्रास यांनी केला.

उत्तर कोरियाबरोबर वाटाघाटी करूनही दक्षिण कोरियात अमेरिकी सैनिकांची तैनाती कायम राखण्याचा ट्रम्प यांचा निर्णय चीनला डोळ्यासमोर ठेवून घेतला आहे. यासाठीच अमेरिका उत्तर कोरियाबरोबर यशस्वी वाटाघाटी करीत नाही. कारण वाटाघाटी यशस्वी ठरल्या तर अमेरिकेला दक्षिण कोरियातून २९ हजार सैनिक माघारी बोलावावे लागतील. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना ते नको आहे.

अमेरिकी सैनिकांची दक्षिण कोरियातील तैनाती ही उत्तर कोरियाच्या विरोधात नसून चीनला घेरण्यासाठी आहे. म्हणूनच ट्रम्प कोरियन देशांमधील वाद पूर्णपणे सोडविण्याचा प्रयत्न करीत नाहीत. त्याचवेळी उत्तर कोरियाला आपल्या विरोधातही जाऊ देत नाही, असा दावा जॅट्रास यांनी केला. ट्रम्प यांच्याबरोबर किम जॉंग-उन यांची भेट झाल्यानंतर उत्तर कोरियाने एकही अण्वस्त्र किंवा क्षेपणास्त्र चाचणी केलेली नाही, याकडे काही विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत. तर ‘साऊथ चायना सी’मधील अमेरिकेच्या लष्करी हालचाली देखील चीनला घेरण्याच्या योजनेचाच एक भाग असल्याचे सांगून जॅट्रास यांनी ट्रम्प यांच्या मुत्सद्देगिरीला दाद दिली आहे.

 English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info