ब्रेक्झिटमुळे ब्रिटनच्या रस्त्यांवर दंगली उसळतील – युरोपिय महासंघाच्या गुप्तचर अधिकार्‍यांचा इशारा

ब्रेक्झिटमुळे ब्रिटनच्या रस्त्यांवर दंगली उसळतील – युरोपिय महासंघाच्या गुप्तचर अधिकार्‍यांचा इशारा

ब्रुसेल्स/लंडन – ‘ब्रेक्झिट’च्या मुद्यावरून ब्रिटनच्या राजकीय वर्तुळातील अनिश्‍चितता कायम असतानाच, युरोपिय महासंघाने ‘ब्रेक्झिट’नंतर ब्रिटनच्या रस्त्यांवर दंगली उसळतील असा खळबळजनक इशारा दिला आहे. महासंघाच्या गुप्तचर अधिकार्‍यांनी यासंदर्भातील अहवाल तयार केला असून त्यात ‘ब्रेक्झिट’नंतर अवघ्या दीड वर्षात स्वतंत्र स्कॉटलंड तसेच आयर्लंडच्या एकत्रीकरणावर सार्वमत होण्याचे भाकितही वर्तविले आहे. ब्रिटनच्या प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त प्रसिद्ध केले असून महासंघाने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मंगळवारी ब्रिटनच्या संसदेत ‘ब्रेक्झिट’शी निगडीत प्रस्तावावर अंतिम मतदान होणार आहे. पंतप्रधान थेरेसा मे यांनी त्यांच्याकडून सादर करण्यात आलेला ‘प्लॅन बी’ मंजूर झाला नाही तर ‘नो डील ब्रेक्झिट’चा पर्याय स्वीकारणे भाग पडेल, असा इशारा दिला आहे. मात्र विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षातील काही सदस्यांनी ‘नो डील ब्रेक्झिट’ऐवजी ‘ब्रेक्झिट’ची प्रक्रिया लांबणीवर टाकण्याचा तसेच दुसरे सार्वमत घेण्याचा पर्याय पुढे केला आहे. तर संसदेतील तिसर्‍या गटाने ब्रिटन महासंघात कायम ठेवण्याचा प्रस्ताव पुढे केला आहे.

ब्रिटनमधील या राजकीय गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर युरोपिय महासंघाकडून तयार करण्यात आलेला अहवाल खळबळ उडविणारा ठरला आहे. महासंघातील सदस्य देशांच्या गुप्तचर यंत्रणांकडून ‘ब्रेक्झिट’बाबतचा अहवाल तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यात ‘ब्रेक्झिट’बाबत कोणताही पर्याय स्वीकारण्यात आला तरी त्यामुळे ब्रिटन अस्थिर होण्याचा धोका असल्याचे बजावण्यात आले आहे. ‘ब्रेक्झिटच्या पार्श्‍वभूमीवर आगामी काळातील स्थितीचा अंदाज घेण्यासाठी विविध घटकांचा विचार करण्यात आला आहे. ब्रिटनने कोणताही पर्याय स्वीकारला तरी ब्रेक्झिटनंतर हिंसाचार होणारच, असा निष्कर्ष यातून समोर येत आहे. सध्याचा करार मान्य झाला तर ब्रिटनमधील उजवे गट आक्रमक होऊन रस्त्यावर उतरतील. जर नो डीलचा पर्याय स्वीकारला गेला ब्रिटनमधील सर्वच गट चिडण्याची शक्यता आहे. पुन्हा सार्वमताची शक्यता दिसली तरीही काही गट भडकण्याचा अंदाज आहे’, अशा शब्दात महासंघाच्या अधिकार्‍यांनी ब्रिटनमध्ये दंगली भडकण्याचा इशारा दिला आहे. महासंघ दंगलीची शक्यता व्यक्त करीत असतानाच ब्रिटीश सरकारने ‘ब्रेक्झिट’साठी आणीबाणी लागू करण्याचे संकेत दिले आहेत. त्यासाठी ब्रिटनच्या काही भागांमध्ये विविध यंत्रणांकडून रंगीत तालीमही घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. 

ब्रिटनच्या संरक्षणदलांना यापूर्वीच ‘हाय अलर्ट’चा इशारा देण्यात आला असून अतिरिक्त तैनातीचे संकेत देण्यात आले आहेत. गेल्याच महिन्यात, साडेतीन हजारांहून अधिक सैनिक ‘स्टँडबाय’वर आणि औषधे व अत्यावश्यक गोष्टींसाठी बोटींचा वापर यासारख्या आपत्कालिन योजनांचा समावेश असलेल्या ‘नो ब्रेक्झिट डूम्सडे प्लॅन’ला ब्रिटनच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती.

Englishहिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info