‘मेक्सिको वॉल’ उभी राहणारच – ‘स्टेट ऑफ द युनियन’मध्ये ट्रम्प यांची ग्वाही

‘मेक्सिको वॉल’ उभी राहणारच – ‘स्टेट ऑफ द युनियन’मध्ये ट्रम्प यांची ग्वाही

वॉशिंग्टन – ‘अमेरिकेच्या दक्षिण सीमेवर उद्भवलेल्या राष्ट्रीय आपत्तीवर तोडगा काढण्यासाठी या सीमेवर वॉल उभारण्याचा प्रस्ताव संसदेला पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव मान्य झाला नाही, तरी कोणत्याही परिस्थितीत मी सीमेवर वॉल उभारून घेणारच’, अशी खणखणीत ग्वाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. संसदेच्या दोन्ही सभागृहांना उद्देशून केलेल्या ‘स्टेट ऑफ द युनियन अ‍ॅड्रेस’मध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपण मांडत असलेला अजेंडा हा रिपब्लिकन किंवा डेमोक्रॅट पक्षाचा नसून अमेरिकी जनतेचा आहे, अशा शब्दात आपल्या भूमिकेचे समर्थन केले.

‘मेक्सिको वॉल’, राष्ट्रीय आपत्ती, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, State of the Union, मानवतावादी सहाय्य, अमेरिका, ww3

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘फेडरल स्पेंडिंग बिल’मध्ये मेक्सिको वॉलसाठी आर्थिक तरतूद हवी, अशी आग्रही भूमिका घेतली होती. मात्र डेमोक्रॅट पक्षाने ट्रम्प यांच्या प्रस्तावाला विरोध करून हटवादी धोरण कायम ठेवल्याने अमेरिकेवर ‘शटडाऊन’ला तोंड देण्याची वेळ ओढवली होती. तब्बल ३५ दिवसांनी ‘शटडाऊन’ संपविताना ट्रम्प यांनी वॉलच्या तरतुदीचा समावेश असलेल्या नव्या विधेयकासाठी संसदेला १५ फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली होती. तसे न झाल्यास ‘मेक्सिको वॉल’च्या मुद्यावर आणीबाणी जाहीर करण्याची तयारी ठेवल्याचा इशाराही अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी दिला होता.

या पार्श्‍वभूमीवर, ट्रम्प संसदेला उद्देशून असणार्‍या ‘स्टेट ऑफ द युनियन अ‍ॅड्रेस’मध्ये काय मुद्दे मांडतात याकडे अमेरिकी जनतेसह जगाचे लक्ष लागून राहिले होते. ‘स्टेट ऑफ द युनियन अ‍ॅड्रेस’च्या सुरुवातीलाच राष्ट्राध्यक्षांनी, अमेरिकी जनतेला आपले संसद सदस्य दोन पक्ष म्हणून नाही तर एक देश म्हणून कारभार चालविताना पहायचे आहेत, अशा शब्दात एकजुटीचे आवाहन केले. सुरवातीच्या टप्प्यात रोजगाराच्या संधीत झालेली वाढ व आर्थिक प्रगतीचे चित्र रंगविल्यानंतर ट्रम्प यांनी आपला मोर्चा बेकायदा निर्वासितांच्या घुसखोरीकडे वळविला.

देशाच्या दक्षिण सीमेवरून घुसणारे लोंढे हे राष्ट्रीय संकट असल्याचा उल्लेख करून त्यावर मात करण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन राष्ट्राध्यक्षांनी केले. ‘बेकायदा निर्वासितांचे लोंढे, गुन्हेगारी टोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी करणारे गट, मानवी तस्करी करणारे गुन्हेगार या सर्वांची अखेर करण्यासाठी अमेरिका वचनबद्ध आहे. ही गोष्ट जगासमोर सिद्ध करण्याची संधी अमेरिकी संसदेसमोर आहे’, अशा शब्दात ट्रम्प यांनी आपली भूमिका मांडली.

संसदेत ‘स्टेट ऑफ द युनियन अ‍ॅड्रेस’ सुरू असतानाच संघटित झालेल्या निर्वासितांचे बेकायदा लोंढे मेक्सिकन शहरांमधून अमेरिकेत पाठविण्याची तयारी सुरू असल्याची जाणीव अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी करून दिली. अमेरिकेच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आपण साडेतीन हजारांहून अधिक अतिरिक्त सैन्य धाडल्याचे सांगून सीमासुरक्षेचा मुद्दा हा नैतिकतेचाही भाग असल्याकडे ट्रम्प यांनी संसदेचे लक्ष वेधले. यावेळी अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी दक्षिण सीमेवर तैनात सुरक्षायंत्रणांनी बेकायदा निर्वासित व गुन्हेगारांविषयी केलेल्या कारवाया, ‘एमएस-१३’सारख्या गुन्हेगारी टोळ्या व सीमेवरील प्रांतांमध्ये होणार्‍या हत्या याचीही संसदेला माहिती दिली.

‘दक्षिण सीमेवर निर्माण झालेले संकट संपविण्यासाठी संसदेकडे एक प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यात मानवतावादी सहाय्य, अतिरिक्त सुरक्षा, अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी यंत्रणा आणि सीमेच्या सुरक्षेसाठी नवी वॉल यांचा समावेश आहे, यापूर्वी अमेरिकी संसदेत उपस्थित सदस्यांनी वॉलसाठी आपले मत दिले होते, पण खर्‍या अर्थाने योग्य प्रकारची वॉल कधीच बांधली गेली नाही. मात्र मी ही वा चल कोणत्याही परिस्थितीत उभारणारच आहे’, अशी ग्वाही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिली.

ट्रम्प यांनी अमेरिका-मेक्सिको सीमेवरील स्थितीचा ‘राष्ट्रीय संकट’ असा केलेला उल्लेख हे ‘मेक्सिको वॉल’साठी आणीबाणी लागू करण्याचे संकेत असल्याचा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात येतो. त्याचवेळी वॉल उभारणारच ही ग्वाहीदेखील ट्रम्प यांनी ‘मेक्सिको वॉल’ बांधण्यासाठी पर्याय तयार ठेऊन पूर्ण तयारी केल्याचे दाखवून देणारी ठरते, असेही सांगण्यात येेते.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info