सरकारविरोधी आंदोलन दडपून टाकण्यासाठी सुदानचे राष्ट्राध्यक्ष बशिर यांच्याकडून आणीबाणीची घोषणा

सरकारविरोधी आंदोलन दडपून टाकण्यासाठी सुदानचे राष्ट्राध्यक्ष बशिर यांच्याकडून आणीबाणीची घोषणा

खार्तुम – पूर्व आफ्रिकेतील सुदानमध्ये गेले दोन महिने राष्ट्राध्यक्ष ओमर बशिर यांच्या राजवटीविरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे. राजधानी खार्तुमसह देशाच्या विविध शहरांमध्ये लाखो नागरिक बशिर यांच्याविरोधात सातत्याने निदर्शने करीत असून सरकारकडून ती दडपण्यासाठी पोलिसी बळाचा वापर करण्यात येत आहे. मात्र त्यानंतरही आंदोलन सुरू असल्याने राष्ट्राध्यक्ष बशिर यांनी सुदानमध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर सरकार बरखास्त करण्यात आले असून काळजीवाहू सरकारची स्थापना करण्यात आली आहे.

सुदानचे राष्ट्राध्यक्ष ओमर बशिर १९९३ सालापासून सत्तेवर असून त्यांनी लष्कराच्या जोरावर देशावरील आपली पकड कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. ‘साऊथ सुदान’ची निर्मिती आणि इंधनाच्या घसरलेल्या किंमतींच्या पार्श्‍वभूमीवर सुदानची अर्थव्यवस्था गेल्या काही वर्षांपासून अडचणीत आली आहे. अर्थव्यवस्थेवर नियंत्रण मिळविण्याचे बशिर यांचे प्रयत्न अपयशी ठरले असून जनतेतील असंतोष सातत्याने वाढत असल्याचे समोर येत आहे.

डिसेंबर महिन्यापासून सुदानमधील इंधन तसेच ब्रेडच्या किंमती सातत्याने वाढत असून महागाई रोखण्याचे सरकारचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. या अपयशी सरकारला खाली खेचण्यासाठी देशातील बहुतांश विरोधी गट एकत्र आले असून डिसेंबरच्या दुसर्‍या आठवड्यापासून सुदानमध्ये निदर्शनांना सुरुवात झाली आहे. निदर्शने मोडून काढण्यासाठी राष्ट्राध्यक्ष बशिर यांनी सुरक्षायंत्रणा मोठ्या प्रमाणावर तैनात केल्या आहेत.

सुरक्षायंत्रणांनी आंदोलनावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बळाचा वापर केला असून त्यात ६०हून अधिक जणांचा बळी गेला आहे. मात्र त्यानंतरही आंदोलन थांबले नसून उलट त्याची धार अधिकच तीव्र होत चालली आहे. त्यामुळे अखेरचा उपाय म्हणून राष्ट्राध्यक्ष बशिर यांनी आणीबाणीची घोषणा केल्याचे सांगण्यात येते.

आणीबाणी जाहीर करतानाच देशासह सर्व राज्यांमधील सरकारे बरखास्त करण्यात आली आहेत. त्याचवेळी राज्यघटनेतील सुधारणा लांबणीवर टाकण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. नजिकच्या काळात सरकार विरोधकांशी चर्चा करील, अशी माहिती राष्ट्राध्यक्ष बशिर यांच्या निकटवर्तियांनी दिली.

काही दिवसांपूर्वी राष्ट्राध्यक्ष बशिर यांनी, सुदानमधील हे आंदोलन ‘अरब स्प्रिंग’चा भाग असल्याचा आरोप केला होता. त्यापूर्वी स्थानिक सूत्रांनी बशिर यांना हादरविणार्‍या आंदोलनामागे सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिरातीचा हात असू शकतो, असा दावा केला होता.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info