कॅनडा ‘हुवेई’च्या वँगझाऊ मेंग यांना अमेरिकेकडे सोपविण्यास तयार राजकीय सूडबुद्धीचा भाग असल्याचा चीनचा आरोप

कॅनडा ‘हुवेई’च्या वँगझाऊ मेंग यांना अमेरिकेकडे सोपविण्यास तयार राजकीय सूडबुद्धीचा भाग असल्याचा चीनचा आरोप

वॉशिंग्टन/ओटावा/बीजिंग – चीनमधील ‘हुवेई’ या दूरसंचार क्षेत्रातील कंपनीच्या कार्यकारी संचालक वँगझाऊ मेंग यांना अमेरिकेकडे सोपविण्यास कॅनडाने तयारी दर्शविली आहे. शुक्रवारी कॅनडाच्या न्यायविभागाने यासंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध करून मेंग यांना अमेरिकेकडे सोपविण्याबाबतची प्रक्रिया सुरू केल्याचे जाहीर केले. कॅनडाच्या या घोषणेवर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून हा राजकीय सूडबुद्धीचा प्रकार आहे, अशी नाराजी चीनच्या दूतावासाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात, ‘हुवेई’ या दूरसंचार क्षेत्रातील कंपनीच्या कार्यकारी संचालक वँगझाऊ मेंग यांना कॅनडात अटक करण्यात आली होती. अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधांच्या मुद्यावरून ‘हुवेई’ कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना लक्ष्य केल्याचे सांगण्यात येते. या अटकेला अमेरिका व चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापारयुद्धाचीही पार्श्‍वभूमी असून काही विश्‍लेषकांनी अमेरिकेने चीनवर दडपण वाढविण्यासाठी ही कारवाई घडवून आणल्याचा दावा केला होता.

दूरसंचार क्षेत्रात कार्यरत असणारी ‘हुवेई’ ही जागतिक स्तरावर दुसर्‍या क्रमांकाची कंपनी म्हणून ओळखण्यात येते. ही कंपनी चीनच्या आर्थिक व औद्योगिक प्रभावक्षेत्राचा महत्त्वाचा घटक म्हणून ओळखण्यात येते. हुवेई’चे संस्थापक ‘रेन झेंगफेई’ चीनच्या लष्करातील माजी अधिकारी असून सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ सदस्य आहेत. कॅनडाने मेंग यांची सुटका करावी, अन्यथा परिणामांसाठी तयार रहावे, असा इशारा चीनकडून देण्यात आला होता.

मात्र कॅनडाने चीनच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष केल्यानंतर चीनच्या सत्ताधारी राजवटीने कॅनडाचे माजी अधिकारी तसेच उद्योजकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई सुरू केली होती. पण त्यानंतरही कॅनडाने चीनला दाद न देता कारवाई पुढे ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला होता. शुक्रवारी कॅनडाच्या न्याय विभागाने केलेली घोषणा त्याचाच भाग दिसत आहे.

कॅनडाने मेंग यांना केलेल्या अटकेनंतर जगभरात ‘हुवेई’विरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यात अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व आघाडीच्या युरोपिय देशांचा समावेश होता. ब्रिटनच्या दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘बीटी ग्रुप’नेही ‘५जी’ तंत्रज्ञानासाठी चीनच्या ‘हुवेई’ कंपनीचे सहकार्य घेण्यात येणार नाही, असे जाहीर केले होते. नुकत्याच युरोपात झालेल्या एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातही ‘हुवेई’चा मुद्दा गाजल्याचे वृत्त समोर आले होते.

या पार्श्‍वभूमीवर चीनने कॅनडाच्या कारवाईवर दिलेली प्रतिक्रिया चीन व पाश्‍चात्य देशांमधील तणाव अधिकच चिघळवणारी ठरेल, असे संकेत मिळू लागले आहेत. चीनने मेंग यांच्याविरोधातील कारवाई कायद्याशी संबंधित प्रकरण नसून राजकीय सूडबुद्धिने चीनच्या तंत्रज्ञान कंपन्यांविरोधात सुरू असलेल्या कारस्थानाचा भाग असल्याचा आरोप केला आहे. चीन या कारवाईला योग्य प्रत्युत्तर देईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info