रशिया व चीनचा बचाव भेदण्यासाठी अमेरिका ‘सुपरगन’ व ‘हायपरसोनिक’ क्षेपणास्त्रे विकसित करणार

रशिया व चीनचा बचाव भेदण्यासाठी अमेरिका ‘सुपरगन’ व ‘हायपरसोनिक’ क्षेपणास्त्रे विकसित करणार

वॉशिंग्टन – चीन व रशियाच्या वाढत्या आक्रमकतेची दखल घेऊन तब्बल ७१८ अब्ज डॉलर्सची मागणी करणार्‍या अमेरिकी संरक्षणदलाने १,१०० मैलांहून अधिक लांब मारा करणारी ‘सुपरगन’ व ‘हायपरसोनिक’ क्षेपणास्त्रे विकसित करण्यावर भर देण्याचे संकेत दिले आहेत. रशिया व चीनने अमेरिकी यंत्रणा भेदणारी प्रगत शस्त्रास्त्रे विकसित केल्याचा दावा अमेरिकेचे संरक्षण अधिकारी तसेच विश्‍लेषकांनी केला होता. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने या दोन्ही देशांना प्रत्युत्तर देण्यासाठी आक्रमकरित्या पुढाकार घेतल्याचे ‘सुपरगन’ व ‘हायपरसोनिक’ क्षेपणास्त्रांच्या विकासाला वेग दिल्याचे दिसत आहे.

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे हंगामी संरक्षणमंत्री पॅट्रिक शॅनाहन यांनी २०२० सालासाठी ७१८ अब्ज डॉलर्सच्या संरक्षणखर्चाची मागणी संसदेसमोर ठेवली होती. ही मागणी २०१९ सालच्या तुलनेत पाच टक्क्यांची वाढ दर्शविणारी असून संरक्षणखर्च वाढविताना चीनबरोबरच रशियाबरोबरील स्पर्धेचा उल्लेखही करण्यात आला होता. ‘चीन व रशियाने मिळवलेल्या क्षमतांमुळे अमेरिकी लष्कराच्या हालचालींवर मर्यादा आल्याचे दिसत आहे’, असे संरक्षणदलप्रमुख जनरल डनफोर्ड यांनी म्हटले होते.

या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेच्या संरक्षणदलाने चीन व रशियाच्या यंत्रणा भेदण्यासाठी विशेष योजना आखली असून त्यात ‘सुपरगन’ व ‘हायपरसोनिक मिसाईल’चा समावेश आहे. संरक्षणविभागाने जमिनीवरून मारा करता येणार्‍या ‘हायपरसोनिक मिसाईल’साठी १.१८ अब्ज डॉलर्स तर ‘सुपरगन’साठी ३०.५ कोटी डॉलर्सची तरतूद केली आहे. या दोन्ही यंत्रणा येत्या चार वर्षात विकसित करण्याचे ध्येय समोर ठेवण्यात आले आहे.

यातील ‘स्ट्रॅटेजिक लाँग रेज कॅनन’ अर्थात ‘सुपरगन’ सर्वाधिक लक्ष वेधणारी यंत्रणा ठरली आहे. अमेरिकेचे लष्कर तसेच नौदलाकडे असणार्‍या तोफा सध्या १८ ते २३ मैल लांब मारा करु शकतात. मात्र ‘सुपरगन’ त्यांच्या तब्बल ६० पट लांब मारा करणारी तोफ असून त्यातून १,१०० मैल लांबपर्यंत क्षेपणास्त्राचा मारा करता येईल, असा दावा अमेरिकी अधिकार्‍यांनी केला आहे.

भविष्यात ही ‘सुपरगन’ सध्या अमेरिकेच्या लढाऊ विमानांकडून करण्यात येणार्‍या कारवायांची जबाबदारी पार पाडू शकते, असे संकेतही सूत्रांकडून देण्यात येत आहेत. रशिया व चीनकडे असणार्‍या प्रगत हवाईभेदी यंत्रणांचा विचार करता लढाऊ विमानांऐवजी ‘सुपरगन’चा वापर उपयुक्त ठरू शकतो, अशी शक्यताही संरक्षण विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

या ‘सुपरगन’बरोबरच हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या विकासावर भर तसेच रॉकेट्सचा वापर वाढविण्याचा उल्लेखही संरक्षण विभागाच्या मागणीत करण्यात आला आहे. अमेरिकेच्या हवाईदल व नौदलाने ‘हायपरसोनिक’ क्षेपणास्त्रांचा प्राथमिक टप्पा पार केला असला तरी अद्याप लष्कराकडे अशी क्षमता नाही. मात्र येत्या चार वर्षात लष्कर यावर भर देणार असल्याचे संरक्षणविभागाचे वरिष्ठ अधिकारी माईक ग्रिफिन यांनी सांगितले. चीन व रशियाच्या क्षेपणास्त्रांना भेदण्यासाठी ही क्षमता महत्त्वाची ठरेल, अशा शब्दात ग्रिफिन यांनी त्याचे समर्थन केले.

अमेरिकी संरक्षण विभागाने यावेळी संरक्षणखर्चात ‘रॉकेट्स’ची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढविल्याचे समोर आले आहे. २०२० साली अमेरिका जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी तब्बल १० हजारांहून अधिक रॉकेट्स खरेदी करणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या मागणीत तब्बल २६ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यासाठी एक अब्ज डॉलर्सहून अधिक निधीची मागणी करण्यात आली असून लष्कराची मारक क्षमता वाढविण्यासाठी हा घटक महत्त्वाचा आहे, असे यात नमूद करण्यात आले आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info