Breaking News

इस्रायल पुन्हा गाझा ताब्यात घेईल – इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांचा निर्वाणीचा इशारा

तेल अविव – ‘गाझापट्टीतून होणारे हल्ले रोखण्यासाठी इस्रायल सारी गाझापट्टी ताब्यात घेईल. इस्रायलसमोर असलेल्या पर्यायांमध्ये हा सर्वात अखेरचा पर्याय आहे’, असे सांगून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी खळबळ माजविली आहे. सध्या गाझापट्टीवर इस्रायलचे नियंत्रण असले तरी २००७ सालापासून गाझापट्टीचा अंतर्गत कारभार तिथल्या पॅलेस्टिनी सरकार व प्रशासनाकडून पाहिला जातो. मात्र यापुढेही गाझापट्टीतून इस्रायलवर हल्ले सुरू राहिले, तर पुन्हा गाझापट्टी ताब्यात घेण्याची घोषणा करून इस्रायली पंतप्रधानांनी जहालमतवादी पॅलेस्टिनी संघटनांना निर्वाणीचा इशारा दिल्याचे दिसत आहे.

इजिप्तच्या मध्यस्थीने गाझापट्टीतून इस्रायलवर होणारे रॉकेट्स, मॉर्टर्स तसेच बलुन बॉम्बचे हल्ले थांबले आहे. पण कुठल्याही क्षणी हमास व इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनांकडून पुन्हा हल्ले सुरू होतील, अशी चिंता इस्रायली जनतेला सतावित आहे. या पार्श्‍वभूमीवर एका मुलाखतीत बोलताना इस्रायलच्या पंतप्रधानांनी गाझातील जहालमतवादी पॅलेस्टिनी संघटना तसेच दहशतवादी संघटनांना धमकावले. आपल्या सुरक्षेसाठी इस्रायलने सारे पर्याय समोर ठेवले असून यामध्ये गाझात घुसण्यापासून ताबा घेईपर्यंतच्या सर्व पर्यायांचा समावेश असल्याचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी बजावले.

पण गाझावर पुन्हा ताबा मिळविणे हा इस्रायलसाठी शेवटचा पर्याय ठरेल असे सांगून त्याआधी इतर पर्यायांचा वापर करील, असा विश्‍वास इस्रायलच्या पंतप्रधानांनी व्यक्त केला. त्याचबरोबर लष्करी कारवाईने हमासला चिरडण्याची क्षमता इस्रायलकडे आहे. पण सुरुवातीलाच तसे करणे चुकीचे ठरेल, असे सांगून गाझाबाबत आपल्याकडे वेगवेगळे पर्याय असल्याचे नेत्यान्याहू म्हणाले. जर इस्रायलने गाझा ताब्यात घेतले तर मग इस्रायल गाझातून माघार घेणार नाही, असेही इस्रायली पंतप्रधानांनी सांगितले. मात्र इस्रायलला २० लाख पॅलेस्टिनींवर सत्ता गाजवायची इच्छा नसल्याचे नेत्यान्याहू यांनी स्पष्ट केले.

या व्यतिरिक्त गाझापट्टीचा संपूर्ण ताबा दुसर्‍या देशांकडे सोपविण्याच्या पर्यायाचाही विचार केला जाऊ शकतो, असेही पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी सुचविले. यासाठी आपण अरब नेत्यांशी चर्चा केल्याचेही इस्रायली पंतप्रधानांनी सांगितले. पण कुठलाही अरब नेता गाझापट्टीची जबाबदारी घेण्यासाठी तयार नसल्याचे सांगून अरब देशांची गाझापट्टीबाबतची भूमिका पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी मांडली. त्याचबरोबर इस्रायलच्या विनाशाच्या घोषणा देणार्‍या हमास व इतरांबरोबर इस्रायल कुठल्याही प्रकारच्या राजकीय वाटाघाटींमध्ये अडकणार नसल्याचेही पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी म्हटले आहे.

दरम्यान, गुरुवारी सकाळी पंतप्रधान नेत्यान्याहू रशियासाठी रवाना झाले असून यावेळी ते राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेतील. इस्रायलमधील निवडणुकीला अवघे पाच दिवस शिल्लक असताना पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्या रशिया दौर्‍याकडे गांभीर्याने पाहिले जाते. गेल्याच आठवड्यात नेत्यान्याहू यांनी अमेरिकेचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info