Breaking News

अमेरिकेवर १९ अब्ज युरोचे कर लादण्याची युरोपची धमकी

वॉशिंग्टन/ब्रुसेल्स – अमेरिका आणि चीनमध्ये पेटलेल्या व्यापारयुद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात आल्याचे इशारे अर्थतज्ज्ञ देत आहेत. अशा परिस्थितीत अमेरिका व युरोपमध्ये नवे व्यापारयुद्ध पेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सुमारे १.१ ट्रिलियन डॉलर्स इतका व्यापार असलेल्या अमेरिका व युरोपमधला व्यापारी वाद चिघळला तर त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेवर भयंकर परिणाम होऊ शकतात. या पार्श्‍वभूमीवर, युरोपने अमेरिकेच्या उत्पादनांवर १९ अब्ज युरो इतका कर लादण्याची धमकी दिली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी युरोपच्या निर्यातीवर ११ अब्ज डॉलर्सचा कर लादण्याचा इशारा दिल्यानंतर युरोपकडून ही प्रतिक्रिया उमटली आहे.

युरोचे कर, व्यापारी वाद, जागतिक व्यापार संघटन, अर्थव्यवस्था, युरोपिय महासंघ, व्यापारयुद्ध, वॉशिंग्टन, ब्रुसेल्स, चीन

जागतिक व्यापार संघटनेत अमेरिका व युरोपिय महासंघात बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना दिलेल्या अर्थसहाय्यावरून जोरदार वाद सुरू आहे. यातील एका प्रकरणात संघटनेने अमेरिकेच्या बाजूने निकाल दिला होता. या निकालाला अनुसरून अमेरिकेने महासंघावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. याच निकालाचा उल्लेख करून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी, युरोपिय महासंघ गेली अनेक वर्षे व्यापारामध्ये अमेरिकेचा गैरफायदा घेत असून यापुढे तसे होणार नाही, असे बजावून करांची धमकी दिली होती.

अमेरिकेच्या या करआकारणीवर महासंघाने तीव्र आक्षेप घेतला होता. या आक्षेपात अमेरिकेने अवास्तव करआकारणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र अमेरिकेने त्याकडे दुर्लक्ष करून आपला निर्णय योग्य असल्याचे समर्थन केले होते. त्यामुळे युरोपिय महासंघानेही व्यापार संघटनेतील याचिकेचा मुद्दा समोर आणून अमेरिकेविरोधात कर लादण्याचा इशारा दिला आहे.

जागतिक व्यापार संघटनेच्या निर्णयानंतर अमेरिकेने कराचे मूल्य अवास्तव वाढविले असून युरोपिय महासंघदेखील त्याच भाषेत प्रत्युत्तर देईल, असे महासंघाच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. अमेरिकेच्या ‘बोईंग’ कंपनीला देण्यात येणार्‍या अर्थसहाय्यामुळे युरोपिय देशांचे नुकसान झाल्याचा दावा करून तब्बल १९ अब्ज युरो कर आकारण्याचा निर्णय महासंघाने घेतला असल्याचेही अधिकार्‍यांनी सांगितले. यासंदर्भातील उत्पादनांची यादी सदस्य देशांकडे पाठविण्यात आली असून पुढील आठवड्यात ती जाहीर केली जाईल, असे महासंघाकडून सांगण्यात आले.

गेली दोन वर्षे अमेरिका व युरोपिय महासंघामध्ये व्यापारयुद्ध भडकले असून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी महासंघावर व्यापारी गैरफायदा उपटत असल्याचे आरोप केले होते. गेल्या वर्षी ट्रम्प यांनी युरोपातून आयात होणार्‍या पोलाद व इतर घटकांवर करदेखील लादले होते. त्यानंतर युरोपातून अमेरिकेत येणार्‍या गाड्यांवरही १५ ते २० टक्के कर लादण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली. त्यानंतर महासंघ व अमेरिकेदरम्यान व्यापाराच्या मुद्यावर चर्चा सुरू असली तरी अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही.

या पार्श्‍वभूमीवर, व्यापार संघटनेच्या निकालानंतरच्या कारवाईने आता पुन्हा एकदा व्यापारयुद्ध भडकण्याची शक्यता दिसू लागली आहे. अमेरिकेचे चीनविरोधात व्यापारयुद्ध सुरू असून आता युरोपिय महासंघाबरोबरील व्यापारी तणाव चिघळल्यास त्याचे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम उमटू शकतात.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info