Breaking News

पॅरिसमधील ऐतिहासिक ‘नॉट्रे डॅम’ चर्चला आग

पॅरिस – फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील ८५० वर्षांपूर्वीच्या ‘नॉट्रे डॅम’ या ऐतिहासिक चर्चला आग लागली. या आगीत चर्चचे मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचवेळी या घटनेवर फ्रान्ससह जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे असून ही वास्तू पुन्हा उभारण्यासाठी जगभरातून निधी पुरविण्याची तयारी केली जात आहे.

‘नॉट्रे डॅम’, आग भडकली, मार्क स्टेन, चर्च, डागडुजीचे काम, पॅरिस, इमॅन्युअल मॅक्रॉनस्थानिक प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ६.३० वाजता ‘नॉट्रे डॅम’मध्ये ही आग भडकली. अल्पावधीतच आगीच्या ज्वाळांचे प्रचंड लोट ‘नॉट्रे डॅम’च्या शिखरावरून बाहेर पडू लागले. या ठिकाणी अग्नीशमक यंत्रणा असूनही त्याचा प्रभावीरित्या वापर होऊ शकला नाही. अखेरीस या आगीवर पॅरिसच्या अग्नीशमन दलाने चार तासांच्या प्रयत्नांनंतर नियंत्रण मिळविले. यासाठी अग्नीशमन दलाचे पाचशे जवान काम करीत होते. ही आग कशी लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच या आगीत सदर वास्तूचे किती नुकसान झाले, याचेही सारे तपशील उघड झालेले नाहीत.

‘नॉट्रे डॅम’च्या डागडुजीचे काम सुरू होते. या दरम्यान, ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जातो. पण त्याला दुजोरा मिळालेला नाही. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्याचवेळी ही आपत्ती याहूनही तीव्र बनली असती, पण ते टळले आहे, अशी माहिती राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी दिली. तसेच आपण सारे मिळून ही वास्तू पुन्हा उभी करू, असा संदेश फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला. जगभरातून या घटनेवर खेद व्यक्त करण्यात येत असून ‘नॉट्रे डॅम’ पुन्हा उभारण्यासाठी जगभरातून आर्थिक सहाय्याची घोषणा करण्यात येत आहे.

दरम्यान, या आगीला प्रतिकात्मक महत्त्व असल्याचे कॅनडाचे लेखक व विश्‍लेषक मार्क स्टेन यांनी म्हटले आहे. युरोप व त्यातही फ्रान्समध्ये ख्रिस्तधर्माची पिछेहाट होत आहे. अशा परिस्थितीत ‘नॉट्रे डॅम’ला लागलेली ही आग ख्रिस्तधर्माच्या युरोपमधील पिछेहाटीचे प्रतिक बनली आहे, असा दावा मार्क स्टेन यांनी केला. ‘नॉट्रे डॅम’चे बांधकाम ११६० साली सुरू झाले होते व १२६० साली हे बांधकाम पूर्ण झाले. ८५० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या चर्चचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व आहे.

पॅरिसमध्ये येणारे पर्यटक आवर्जून नॉट्रे डॅमला भेट देतात. ‘फ्रेंच-गॉथिक’ शिल्पशास्त्राचा उत्तम नमूना म्हणून ‘नॉट्रे डॅम’च्या वास्तूकडे पाहिले जाते. गेल्या ८५० वर्षांच्या कालावधीत फ्रान्समध्ये खूप मोठ्या उलथापालथी झाल्या. फ्रान्स दोन महायुद्धात लढला होता. तरी देखील ही वास्तू जशीच्या तशी होती. पण या आगीने सारे चित्र बदलून टाकले आहे, असे माध्यमांकडून सांगितले जात आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info