Breaking News

सौदी व ‘युएई’च्या धोरणांमुळे ‘ओपेक’चा अंत होईल – इराणच्या इंधनमंत्र्यांचा इशारा

तेहरान – अमेरिकेने इराणच्या इंधननिर्यातीवर नवे निर्बंध घोषित केले. यामुळे निर्माण झालेली इंधनाच्या बाजारपेठेतील पोकळी भरून काढण्यासाठी सौदी अरेबिया व ‘संयुक्त अरब अमिराती’ने (युएई) इंधनाचे उत्पादन वाढविण्याची तयारी दाखविली. यावर इराणने जहाल प्रतिक्रिया दिली आहे. सौदी व युएईच्या अशा धोरणांमुळे इंधन उत्पादक देशांची संघटना असलेल्या ‘ओपेक’चा अंत निश्‍चित झाला आहे, असे इराणने धमकावले.

‘युएई’, इंधनाचे उत्पादन वाढविण्याची तयारी, ओपेक, निर्बंध, इंधन उत्पादनात घसरण, इराण, व्हेनेझुएलादोन दिवसांपूर्वी अमेरिकेने इराणवर लादलेल्या नव्या कठोर निर्बंधांची अंमलबजावणी सुरू झाली. या निर्बंधांमुळे इराणची इंधननिर्यात शून्यावर नेऊन ठेवण्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे. याचे परिणाम दिसू लागले असून इराणकडून इंधन खरेदी करणार्‍या देशांनी अमेरिकेच्या निर्बंधांमुळे इराणबरोबरच्या सहकार्यातून माघार घेण्यास सुरुवात केली आहे. तर इराणची इंधननिर्यात रोखल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर भडकू नये म्हणून सौदी अरेबिया आणि ‘संयुक्त अरब अमिरात’ने (युएई) इंधनाचे उत्पादन वाढविण्याचे संकेत दिले होते.

सौदी अरेबिया, युएई, इराण हे ‘इंधन उत्पादक देशांची संघटना’चे (ओपेक) सदस्य देश आहेत. १९६१ साली स्थापन झालेल्या या संघटनेत १४ इंधन उत्पादक देश असून यातील सौदीकडून सर्वाधिक इंधनाचे उत्पादन केले जाते. सौदी दर दिवशी एक कोटी चार लाख बॅरेल्स इंधनाचे उत्पादन करू शकतो. पण गेल्याच महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाच्या दरात सातत्य राखण्यासाठी सौदीने इंधनाचे उत्पादन दिवसाकाठी सुमारे सव्वा तीन लाख बॅरेल्स कमी करण्याची घोषणा केली होती.

दोन दिवसांपूर्वी सौदीने इंधन दर वाढू नये म्हणून उत्पादन वाढविण्याचे जाहीर केले असले तरी अद्याप या सौदी तसेच युएई’ने इंधनाचे उत्पादन वाढविले नसल्याचे इंधन बाजारावर लक्ष ठेवणार्‍या कंपन्या व संकेतस्थळांचे म्हणणे आहे. पण सौदी व युएईने इंधन उत्पादन वाढविण्याबाबत केलेल्या घोषणेमुळे इराण खवळला आहे. ‘इंधन उत्पादक देशांची संघटना’चे (ओपेक) सदस्य देश असलेले सौदी व युएई इंधनाचा वापर शस्त्रासारखा करीत असल्याचा आरोप इराणचे इंधनमंत्री ‘बिजान झांगेनेह’ यांनी केला.

‘‘ओपेकचे तुकडे पाडण्यासाठी आणि या संघटनेचा शेवट करण्यासाठी हे दोन्ही देश अमेरिकेच्या साथीने इराण आणि व्हेनेझुएलाविरोधात इंधनाचा वापर शस्त्रासारखा करीत आहे’’, असा इशारा इंधनमंत्री झांगेनेह यांनी केला. इराणमधील इंधनविषयक प्रदर्शनात बोलताना इराणच्या इंधनमंत्र्यांनी सौदी व युएई’चा थेट उल्लेख करण्याचे टाळले. पण इराणची इंधन निर्यात शुन्यावर नेण्यासाठी सौदी व ‘युएई’ सहाय्य करीत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला.

दरम्यान, अमेरिकेच्या निर्बंधांमुळे इराण आणि व्हेनेझुएला या दोन्ही ‘ओपेक’ संस्थापक सदस्य देशांची इंधननिर्यात घसरत आहे. व्हेनेझुएलाचे इंधन उत्पादन प्रति दिन १० लाख बॅरेल्सनी घसरले. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे व्हेनेझुएला तसेच इराणच्या इंधन उत्पादनात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तविण्यात येते. याचे परिणाम इंधनाच्या दरावर होऊ लागले आहेत. इंधनाचे दर गेल्या सहा महिन्यांचा उच्चांक गाठत आहेत. ही परिस्थिती इंधनाचे उत्पादन करणार्‍या देशांसाठी अनुकूल ठरत आहे. त्याचवेळी इंधनाची आयात करणार्‍या देशांच्या अर्थव्यवस्थांवरचा ताण यामुळे वाढत चालला आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info