गाझापट्टीतून इस्रायलवर १००हून अधिक रॉकेट्सचा मारा इस्रायली लष्कराकडून तीव्र हवाईहल्ले सुरू

गाझापट्टीतून इस्रायलवर १००हून अधिक रॉकेट्सचा मारा इस्रायली लष्कराकडून तीव्र हवाईहल्ले सुरू

जेरूसलेम/गाझा – गेल्या महिन्यात इजिप्तच्या मध्यस्थीने करण्यात आलेल्या संघर्षबंदीनंतर पुन्हा एकदा इस्रायल व गाझापट्टीत तीव्र संघर्ष भडकला आहे. शुक्रवारी इस्रायल-पॅलेस्टाईन सीमेनजिक झालेल्या निदर्शनांमध्ये दोन इस्रायली सैनिक जखमी झाले होते. त्यानंतर इस्रायलने केलेल्या कारवाईत चार पॅलेस्टिनी ठार झाले होते. याचा सूड घेण्यासाठी गाझापट्टीतून हमास व ‘इस्लामिक जिहाद’ या दहशतवादी संघटनांनी शनिवारी जोरदार रॉकेट हल्ले चढविले.

इस्रायलमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू विजयी झाले होते. या निवडणुकांपूर्वी इस्रायल व पॅलेस्टाईनमध्ये इजिप्तच्या मध्यस्थीने संघर्षबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे काही काळ सीमाभागात शांतता होती. मात्र बुधवारी रात्री पुन्हा एकदा गाझातून इस्रायलच्या सीमाभागात बलुन बॉम्ब व रॉकेटच्या सहाय्याने हल्ले चढविण्यात आले. त्यापाठोपाठ शुक्रवारी इस्रायलच्या सीमेनजिक करण्यात आलेल्या निदर्शनांदरम्यान दोन इस्रायली सैनिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला.

शुक्रवारच्या हल्ल्यात दोन इस्रायली सैनिक जखमी झाल्यानंतर इस्रायली लष्कराने प्रत्युत्तरादाखल कारवाई केली. त्यात चार पॅलेस्टिनींचा बळी गेला होता. इस्रायलच्या या कारवाईविरोधात गाझातील दहशतवादी गटांनी शनिवारी सकाळपासून जोरदार रॉकेटहल्ल्यांना सुरुवात केली. इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार दुपारपर्यंत १००हून अधिक रॉकेट्सचा मारा करण्यात आला. यात जीवितहानी झाली नसली तरी त्याविरोधात इस्रायलने मोठी लष्करी मोहीम हाती घेतली आहे.

याअंतर्गत इस्रायलच्या लढाऊ विमानांनी गाझातील अनेक भागात हवाईहल्ले सुरू केले असून, गाझा सीमेनजिक तोफांचा माराही सुरू झाला आहे. हमास तसेच सहकारी संघटनांच्या लष्करी चौक्यांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या काही दिवसात हमास, इस्लामिक जिहादसह हिजबुल्लाहकडून इस्रायलविरोधात वारंवार मोठ्या हल्ल्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. त्याविरोधात इस्रायलनेही जोरदार तयारी केली असून दहशतवादी संघटनेच्या नेत्यांना थेट लक्ष्य करण्याचा इशारा दिला आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info