Breaking News

गुगल व इंटेलसह प्रमुख अमेरिकी तंत्रज्ञान कंपन्यांनी ‘हुवेई’बरोबरील संबंध तोडले – ‘हुवेई’च्या ‘५जी’ महत्त्वाकांक्षेला धक्का

वॉशिंग्टन/बीजिंग – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेली ‘नॅशनल इमर्जन्सी’ व चिनी कंपन्यांना ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकण्याचा घेतलेला निर्णय या पार्श्‍वभूमीवर, ‘गुगल’, ‘इंटेल’ यासह अमेरिकेतील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांनी ‘हुवेई’ या चिनी कंपनीबरोबरील संबंध तोडण्याची घोषणा केली.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील दूरसंचार व इंटरनेट क्षेत्रात आघाडीच्या मानल्या जाणार्‍या कंपन्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे ‘हुवेई’च्या ‘५जी’ क्षेत्रातील महत्त्वाकांक्षेला जबरदस्त धक्का बसला आहे. चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिलेल्या इशार्‍यानंतरही अमेरिकी कंपन्यांनी हा निर्णय घेतल्यामुळे आता अमेरिका व चीनमधील व्यापारयुद्ध अधिकच भडकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

गेल्या आठवड्यात बुधवारी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी दूरसंचार कंपन्यांविरोधात आणीबाणी जाहीर केली होती. त्यात, अमेरिकेचे शत्रू माहिती व दूरसंचार तंत्रज्ञान क्षेत्रातील कच्च्या दुव्यांचा फायदा उचलून त्याचा वापर सायबरहल्ले तसेच आर्थिक व औद्योगिक क्षेत्रातील संवेदनशील माहितीच्या हेरगिरीसाठी करीत असल्याचा आरोप करण्यात आला होता. आणीबाणीच्या अध्यादेशापाठोपाठ अमेरिकेच्या व्यापार विभागाने व्यापाराबाबतची ‘ब्लॅक लिस्ट’ प्रसिद्ध केली होती. त्यात चीनच्या ‘हुवेई’सह इतर ७० कंपन्यांचा समावेश आहे.

त्यापूर्वी ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सरकारी विभागांमधील कंत्राटांमध्ये चिनी कंपन्यांना सहभागी होण्यापासून रोखणारा आदेश जारी केला होता. चिनी कंपन्यांकडून अमेरिकेच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांवर ताबा मिळविण्याचे प्रयत्नही उधळण्यात आले होते. ‘चायना मोबाईल’ या चीनच्या आघाडीच्या कंपनीला देशात दूरसंचार सेवा पुरविण्यावरही बंदी घालण्यात आली होती. ‘झेडटीई’ या चिनी कंपनीला अब्जावधी डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला होता.

चिनी कंपन्यांवर एकामागोमाग होणारी ही कारवाई व ‘ब्लॅक लिस्ट’ जारी करण्याच्या निर्णयानंतर आता अमेरिकी कंपन्यांनाही ट्रम्प यांच्या आदेशाचे पालन करणे भाग पडले आहे. इंटरनेट क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी असणार्‍या ‘गुगल’ने यापुढे ‘हुवेई’ कंपनीला त्यांच्या स्मार्टफोन्समध्ये ‘ऑपरेटिंग सिस्टिम’सह ‘यु ट्यूब’, ‘गुगल मॅप्स’ यासारखी प्रमुख ऍप्स वापरता येणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. जगभरात वापरण्यात येणार्‍या ८० टक्क्यांहून अधिक स्मार्टफोन्समध्ये गुगलची ‘ऍड्रॉईड’ ही ‘ऑपरेटिंग सिस्टिम’ व ऍप्स वापरण्यात येतात. त्यामुळे गुगलचा निर्णय ‘हुवेई’च्या ‘५जी’च्या महत्त्वाकांक्षांना जबरदस्त धक्का ठरला आहे.

‘गुगल’बरोबरच अमेरिकास्थित इतर तंत्रज्ञान कंपन्यांनीही ‘हुवेई’बरोबरचे संबंध तोडले आहेत. त्यात स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब यासाठी ‘सेमीकंडक्टर चिप्स’ पुरविणार्‍या ‘इंटेल’, ‘क्वालकॉम’, ‘ब्रॉडकॉम’ यासारख्या आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी ‘हुवेई’ला यापुढे चिपसेट्स पुरविण्यास नकार दिला असून त्याचा परिणाम ‘हुवेई’कडून भविष्यात तयार करण्यात येणार्‍या ‘५जी स्मार्टफोन्स’च्या निर्मितीवर होऊ शकतो. मात्र ‘हुवेई’ने अशा स्वरुपाच्या बंदीसाठी आपण पुरेशी तयारी केली आहे, असा खुलासा प्रसिद्ध केला आहे.

दरम्यान अमेरिकी कंपन्यांकडून करण्यात आलेल्या घोषणेचे तीव्र प्रतिसाद चिनी प्रसारमाध्यमे व सोशल मीडियावर उमटू लागले आहेत. अमेरिकेची आघाडीची कंपनी असणार्‍या ‘ऍपल’च्या उत्पादनांवर बंदी टाकण्याची मोहीम जोर पकडू लागली असून त्याचा मोठा फटका ‘ऍपल’ला बसू शकतो, असे संकेत देण्यात आले आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info