आर्क्टिक क्षेत्रात रशिया व चीनला रोखण्यासाठी अमेरिकेने लष्करी तळ उभारावा – अमेरिकी संसदेची मागणी

आर्क्टिक क्षेत्रात रशिया व चीनला रोखण्यासाठी अमेरिकेने लष्करी तळ उभारावा – अमेरिकी संसदेची मागणी

वॉशिंग्टन, दि. २३ (वृत्तसंस्था) – एप्रिल महिन्यात रशियाने आर्क्टिक क्षेत्रात नवा लष्करी तळ सक्रिय करतानाच महत्त्वाकांक्षी ‘आर्क्टिक प्लॅन’चीही घोषणा केली होती. त्यातून, रशिया आर्क्टिकसाठीचा प्रमुख दावेदार असून भौगोलिकदृष्ट्याही रशियाचाच अधिकार आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. रशियाच्या या अधिकाराला आव्हान देण्यासाठी अमेरिका सरसावली असून आर्क्टिकमधील तैनाती वाढविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अमेरिकेच्या संसदेने संरक्षणविभागाकडे आर्क्टिकमध्ये नवा लष्करी तळ उभारावा, अशी मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.

अमेरिकेच्या संरक्षणखर्चाचा भाग असणार्‍या विधेयकावर संसदेत चर्चा सुरू आहे. यादरम्यान संसदेचा भाग असलेल्या ‘सिनेट आर्म्ड सर्व्हिसेस कमिटी’ने संरक्षणमंत्र्यांना विशेष निर्देश दिल्याचे उघड झाले. यात अमेरिकेच्या संरक्षणविभागाने ‘आर्मी कॉर्प्स’, तटरक्षक दल व सागरी व्यवस्थापन विभागाच्या सहकार्याने आर्क्टिकमधील नव्या लष्करी तळासाठी हालचाली सुरू कराव्या, असे सांगण्यात आले आहे.

हे निर्देश देताना रशियाच्या वाढत्या हालचालींचाही उल्लेख करण्यात आला आहे. अमेरिकेचा आर्क्टिकमधील नवा तळ रशियाच्या या वाढत्या हालचालींना रोखणारा असेल, असे संकेत ‘सिनेट आर्म्ड सर्व्हिसेस कमिटी’च्या निर्देशांमध्ये देण्यात आले आहेत. त्याचवेळी या तळावर रडार, क्षेपणास्त्रे व लष्करी पथकाची तैनाती करावी, असेही बजावण्यात आले. आर्क्टिकमधील हिमनग मोठ्या प्रमाणात वितळत असून त्यातून पृथ्वीच्या उत्तर टोकावर नवा व्यापारी मार्ग तयार होत आहे, याकडेही अमेरिकी संसदेच्या ‘सिनेट आर्म्ड सर्व्हिसेस कमिटी’ने लक्ष वेधले आहे.

आर्क्टिकमधील अमेरिकेचा भाग म्हणून ओळखण्यात येणार्‍या अलास्कामध्ये ‘युएसएआरएक’ नावाने मिलिटरी कमांड कार्यरत आहे. अमेरिकी नौदल तसेच हवाईदलाचे तळ अलास्कामध्ये सक्रिय असले तरी मात्र आर्क्टिक महासागराचा विचार करता स्वतंत्र संरक्षणतळ उभारण्यात आलेला नाही. अमेरिकेच्या या कमकुवतपणाचा फायदा उचलून रशियाने आर्क्टिक क्षेत्रात आक्रमक हालचाली सुरू केल्या असून सध्या रशियाचे किमान तीन संरक्षणतळ आर्क्टिकमध्ये कार्यरत आहेत.

या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेला आर्क्टिक सागरी क्षेत्रात स्वतंत्र तळाची आवश्यकता आहे, याकडे अमेरिकी संसदेने लक्ष वेधले आहे. गेल्याच महिन्यात अमेरिकेच्या ‘नॉर्दन कमांड’चे प्रमुख जनरल टेरेन्स ओशॉघ्नेसी यांनी आर्क्टिकमधील धोक्यांकडे लक्ष वेधले होते. ‘रशिया व चीनसारख्या देशांकडून सुरू असलेल्या वाढत्या कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर आर्क्टिक क्षेत्र आता अमेरिकेसाठी ‘फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स’ बनले आहे’, असा दावा जनरल टेरेन्स ओशॉघ्नेसी यांनी केला होता.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनीही आर्क्टिक कौन्सिलच्या बैठकीत, आर्क्टिक २१व्या शतकातील सुएझ व पनामा कालवा ठरेल, अशा शब्दात त्याचे वाढते महत्त्व अधोरेखित केले होते.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info