मेक्सिकोत सहा महिन्यात १७ हजार जणांची हत्या -दरदिवशी सरासरी ९४ जणांची हत्या होत असल्याची माहिती

मेक्सिकोत सहा महिन्यात १७ हजार जणांची हत्या -दरदिवशी सरासरी ९४ जणांची हत्या होत असल्याची माहिती

मेक्सिको सिटी, दि. ६ (वृत्तसंस्था) –  अमेरिकेबरोबर निर्वासितांच्या मुद्यावर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर, मेक्सिकोत गेल्या सहा महिन्यात तब्बल १७ हजार जणांच्या हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जून महिन्यात तीन हजारांहून अधिक जणांची हत्या घडविण्यात आली आहे. मेक्सिकोच्या आतापर्यंतच्या इतिहासात एका महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणात हत्या होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मेक्सिकोतील वाढत्या गुन्हेगारीच्या आकडेवारीमुळे अमेरिका-मेक्सिको सीमा सुरक्षा व निर्वासितांच्या घुसखोरीचा मुद्दा पुन्हा भडकण्याची शक्यता आहे.

‘मेक्सिको न्यूज डेलि’ या दैनिकाने देशातील अंतर्गत सुरक्षा विभागाचा हवाला देऊन नवी आकडेवारी जाहीर केली. मेक्सिकोचे नवे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस लोपेझ ओब्राडोर यांनी डिसेंबर महिन्यात सूत्रे हाती घेतल्यावर सुरक्षेच्या मुद्यावर स्थिती सुधारण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र त्यानंतर गेल्या सहा महिन्यातच देशाच्या अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेची दैना उडाली आहे. मेक्सिकोतील ‘गुआनजुआतो’ व ‘मेक्सिको सिटी’ या भागातच हत्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याने ओब्राडोर यांनी घेतलेल्या निर्णयांवर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.

गेल्या वर्षी मेक्सिकोत तब्बल ३३ हजारांहून अधिक हत्या झाल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली होती. ही आकडेवारी गेल्या दोन दशकांमधील सर्वाधिक असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र यावर्षी पहिल्या सहा महिन्यातच गेल्या वर्षीच्या सहा महिन्यातील हत्यांची संख्या ओलांडली गेली असून हे वर्षदेखील हत्यांच्या बाबतीत नवे विक्रम करणारे ठरेल, अशी भीती विश्‍लेषकांकडून व्यक्त करण्यात येते.

मेक्सिकोत अंमली पदार्थांचा व्यापार करणार्‍या गुन्हेगारी टोळ्यांचे जबरदस्त वर्चस्व असून इंधनाची चोरी हादेखील संघटित गुन्हेगारीचा मोठा भाग आहे. अंमली पदार्थांचा व्यापार करणार्‍या टोळ्या ‘कार्टेल’ म्हणून ओळखण्यात येतात. यावर्षीच्या हत्याकांडामध्ये याच कार्टेल्समधील ‘जॅलिस्को न्यू जनरेशन’ व ‘सान्ता रोझ दे लिमा’ या दोन कार्टेल्समधला संघर्ष कारणीभूत ठरल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. या कार्टेल्सना रोखण्यासाठी लष्कर तैनात केल्यानंतरही विशेष बदल झाला नसल्याचे नव्या आकडेवारीने दाखवून दिले आहे.

गेल्या वर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेऊन मेक्सिकोतून येणार्‍या निर्वासितांची घुसखोरी थांबविण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी मेक्सिकोवर दबाव टाकण्याचे ट्रम्प यांचे धोरण सध्या यशस्वी ठरले असून मेक्सिकोने अमेरिकेत घुसणार्‍या निर्वासितांना रोखण्यासाठी स्वतंत्र सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे. मात्र हे करताना देशातील अंतर्गत सुरक्षाव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचे हत्यांची नवी आकडेवारी दाखवून दिली आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info