Breaking News

नाटोशी निगडित संस्थेच्या चुकीमुळे युरोपिय देशांमधील नाटोच्या अण्वस्त्रांची वादग्रस्त माहिती उघड

ब्रुसेल्स – जर्मनी, इटली, बेल्जियम, नेदरलँड आणि तुर्की या देशांमधील नाटोच्या तळांवर सुमारे १५० अण्वस्त्रे तैनात आहेत, अशी माहिती नाटोशीच निगडित असलेल्या एका संस्थेने चुकून उघड केली. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि रशियामध्ये झालेला अण्वस्त्र प्रसारबंदी करार मोडीत निघाल्यानंतर अणुयुद्धाची शक्यता बळावल्याचे दावे केले जात होते. अशा परिस्थितीत नाटोच्या अण्वस्त्रांबाबत उघड झालेली ही माहिती स्फोटक असल्याचा दावा युरोपिय माध्यमे करीत आहेत. बेल्जियमच्या विरोधी पक्षनेत्यांनी यावर सरकारला जाब विचारला असून याबाबतची खरी माहिती उघड करा, अशी मागणी केली आहे. इतर देशांमध्येही अशी मागणी केली जाण्याची दाट शक्यता समोर येत आहे.

बेल्जियमच्या ‘क्लेन-ब्रोगेल’, जर्मनीच्या ‘बुशेल’, इटलीच्या ‘एव्हिआनो’ आणि ‘गेतीतोर’, नेदरलँडच्या ‘ओल्केल’ व तुर्कीच्या ‘इन्सर्लिक’ या शहरांमध्ये असलेल्या नाटोच्या तळांवर सुमारे १५० अण्वस्त्रे तैनात आहेत. ‘अ न्यू इरा फॉर न्यूक्लिअर डिटरन्स? मॉर्डनायझेशन, आर्म्स कंट्रोल अँड एलायड न्यूक्लिअर फोर्सेस’ असे शीर्षक असलेल्या या अहवालातून ही माहिती उघड झाली. एप्रिल महिन्यात नाटोशीच संलग्न असलेल्या संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला होता. यामुळे युरोपातील नाटोच्या अण्वस्त्रांबाबतची माहिती उघड झाली असून याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात, असे आत्तापासूनच दिसू लागले आहे. बेल्जियमचे वर्तमानप ‘दे मॉर्गन’ व ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ या अमेरिकी दैनिकांनी याबाबतची विस्तृत माहिती प्रसिद्ध केली.

आपल्या देशातील नाटोच्या तळांवर अण्वस्त्रे तैनात आहेत, ही माहिती यामुळे बर्‍याचणांना पहिल्यांदा कळली. याचे पडसाद उमटू लागले आहेत. बेल्जियमच्या विरोधी पक्षनेत्यांनी या प्रकरणी आपल्या सरकारला धारेवर धरले आहे. सरकारने याबाबतची सारी माहिती उघड करावी, अशी मागणी केली आहे. इतर देशांमधली माध्यमे याबाबत आक्रमक बनली असून यामुळे अणुयुद्धाचा धोका अधिकच बळावल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. अमेरिका व रशियामध्ये शीतयुद्धाच्या काळात अण्वस्त्रांची संख्या न वाढविण्याबाबत ‘इंटरमिजिएट रेंज न्यूक्लिअर फोर्स ट्रिटी-आयएनएफ’ करार झाला होता. रशिया याचे पालन करीत नसल्याचा आरोप करून अमेरिकेने हा करार मोडीत काढला आहे.

यानंतर अणुयुद्धाचा धोका अधिकच वाढल्याचे दावे केले जात आहेत. अशा परिस्थितीत नाटोच्या अहवालाने चुकून प्रसिद्ध केलेल्या या माहितीमुळे नवे संकट खडे ठाकल्याचे दिसते. मात्र हा नाटोचा अधिकृत अहवाल नाही, असे स्पष्टीकरण पुढे आले आहे. हा केवळ सदर अहवालाचा पहिला मसूदा होता. पुढच्या काळात त्यात सुधारणा होणे अपेक्षितच होते, असा खुलासा नाटोकडून केला जात आहे. या अहवालाच्या सुधारित आवृत्तीत मात्र ही वादग्रस्त माहिती वगळण्यात आली आहे. मात्र या खुलाशामुळे परिस्थितीत फरक पडलेला नसून नाटोच्या युरोपातील अण्वस्त्रांची समस्या पुढच्या काळातही धुमाकूळ घालत राहणार असल्याचे दिसत आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info