तालिबानकडून अफगाणिस्तानातील निवडणुकीवर हल्ले चढविण्याची धमकी

तालिबानकडून अफगाणिस्तानातील निवडणुकीवर हल्ले चढविण्याची धमकी

काबुल – अफगाणिस्तानची सुरक्षा व स्थैर्यासाठी अमेरिका कतार येथे तालिबानबरोबर वाटाघाटी करीत असताना या दहशतवादी संघटनेने अफगाण सरकार व जनतेला उद्देशून धमकी प्रसिद्ध केली. ‘पुढच्या महिन्यात अफगाणिस्तानात होणार्‍या निवडणुकींमध्ये जनतेने सहभागी होऊ नये. तसेच निवडणूक प्रचारापासूनही दूर रहावे. अन्यथा हल्ल्यांमध्ये नाहक मारले जाल’, अशी धमकी तालिबानने दिली.

‘अफगाणिस्तानात होणार्‍या निवडणूका म्हणजे सामान्य नागरिकांना फसविण्यासाठी रचलेले एक कारस्थान आहे. अफगाणिस्तानातील काही लबाड राजकारण्यांच्या अहंकारासाठी ही निवडणूक आयोजित केली जात आहे’, अशी टीका तालिबानने एका पत्रकातून केली. तालिबानने यात कुठल्याही नेत्याचे नाव घेतले नाही, पण राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांना उद्देशून ही टीका केल्याचा दावा केला जातो.

त्याचबरोबर अफगाणिस्तानातील या निवडणुकांना आपण मान्य करीत नसून अफगाणी जनतेने देखील यात सहभागी होऊ नये, असे तालिबानने बजावले. ‘आपल्याच देशबांधवांकडून केल्या जाणार्‍या हल्ल्यांपासून स्वत:चा जीव वाचवायचा असेल तर निवडणूक प्रचारमोहीम आणि मतदानापासून दूर रहावे. या ठिकाणांवर हल्ले चढविले जातील’, असा इशारा तालिबानने दिला.

मतदान केंद्र आणि प्रचारमोहिमांवर हल्ले चढविण्याची धमकी दिल्यानंतर तालिबानने अफगाण सरकारचे समर्थन करणार्‍या अमेरिकेवरही ताशेरे ओढले. ‘निवडणुकांचे समर्थन करण्यापेक्षा अमेरिकेने सध्या सुरू असलेल्या वाटाघाटींमधील नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी हालचाली वाढवाव्यात. अफगाणिस्तानात शांती कशारितीने प्रस्थापित करता येईल, यासाठी अमेरिकेने प्रामाणिक प्रयत्न करावेत’, असा टोला तालिबानने लगावला.

कतारची राजधानी दोहा येथे सोमवारपासून अमेरिका आणि तालिबानमधील वाटाघाटीचा आठवा टप्पा सुरू झाला आहे. याआधीच्या टप्प्यात तालिबानने आपला प्रस्ताव स्वीकारल्याचे अमेरिकेने जाहीर केले होते. त्यामुळे सोमवारपासून सुरू झालेल्या या टप्प्यात यश मिळेल, असा दावा अमेरिकेचे विशेषदूत ‘झाल्मे खलिलझाद’ यांनी केला आहे. ‘नाटो’चे प्रमुख जेन्स स्टोल्टनबर्ग यांनीदेखील शांतीचर्चा लवकरच यशस्वी होईल, असे म्हटले आहे.

अमेरिकेने अफगाणिस्तानातून पूर्ण माघार घेतली तर दहशतवादी हल्ले थांबतील, अशी घोषणा तालिबानने याआधी केली होती. तसेच अफगाणिस्तानातील गनी सरकारबरोबर जुळवून घेत लोकशाहीचा अवलंब करण्याच्या अमेरिकेच्या मागणीचाही तालिबानने स्वीकारला केला होता. पण आठवड्यापूर्वीच्या शांतीचर्चेअंतर्गत अमेरिकेने केलेल्या मागण्यांना तालिबानने आपल्या धमकीतून धुडकावल्याचे दिसत आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info