व्हेनेझुएलातील कारवाईसाठी अमेरिकी नौदल सज्ज – अमेरिकेच्या ‘सदर्न कमांड’च्या प्रमुखांचा दावा

व्हेनेझुएलातील कारवाईसाठी अमेरिकी नौदल सज्ज – अमेरिकेच्या ‘सदर्न कमांड’च्या प्रमुखांचा दावा

रिओ दी जानिरो/कॅराकस – ‘अमेरिकेचे नौदल काय तयारी करीत आहे किंवा आमची योजना काय आहे, याची माहिती मी देऊ शकत नाही. पण अमेरिकन सरकार जो काही धोरणात्मक निर्णय घेईल त्याच्या अंमलबजावणीसाठी नौदल सज्ज आहे. आम्ही कोणत्याही मोहिमेसाठी पूर्ण तयारीत आहोत’, अशा शब्दात अमेरिकेच्या ‘सदर्न कमांड’चे प्रमुख अ‍ॅडमिरल क्रेग फॉलर यांनी व्हेनेझुएलातील कारवाईचे संकेत दिले. काही दिवसांपूर्वीच व्हेनेझुएलाच्या संरक्षणमंत्र्यांनी रशियाला भेट देऊन रशियन युद्धनौकांच्या व्हेनेझुएलातील तैनातीबाबत करार केला होता. त्यानंतर अमेरिकी नौदलाकडून आलेले हे वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते.

अमेरिका व व्हेनेझुएलाचे हुकूमशहा निकोलस मदुरो यांच्यात ‘गोपनीय चर्चा’ सुरू असल्याची माहिती गेल्या काही दिवसात माध्यमांमधून समोर आली आहे. व्हेनेझुएलाचे हुकूमशहा मदुरो यांनी अशा वृत्तांना दुजोरा दिला आहे. अमेरिकेतील काही सूत्रांनीही मदुरो यांच्याशी चर्चा सुरू असल्याची कबुली दिली आहे. मात्र चर्चा सुरू असली तरी व्हेनेझुएलाची कोंडी करून त्यावर लष्करी कारवाई करण्याची योजना अमेरिकेने अद्याप बाजूला केलेली नाही. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ब्लॉकेड’ची घोषणा केली होती.

ट्रम्प यांच्या घोषणेवर व्हेनेझुएलातून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. अमेरिकेच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी व्हेनेझुएलाची जनता सज्ज असल्याचा इशारा मदुरो यांनी दिला होता. त्याचवेळी मदुरो यांना समर्थन देणार्‍या रशिया, चीन व क्युबा या देशांनीही अमेरिकेच्या कोंडीला प्रत्युत्तर देण्यात येईल, असे बजावले होते. अमेरिकेकडून व्हेनेझुएलावर लादण्यात येणार्‍या निर्बंधांवर रशिया लक्ष ठेऊन असून अमेरिकेने व्हेनेझुएलाची कोंडी करण्याचा प्रयत्न करु नये, असा इशारा रशियाने दिला आहे.

मदुरो व त्यांना पाठिंबा देणार्‍या देशांच्या आक्रमक भूमिकेनंतरही अमेरिकेने आपले धोरण बदलण्यास नकार दिला असून लष्करी कारवाईचा पर्याय कायम ठेवल्याचे दिसत आहे. ब्राझिलमध्ये सुरू झालेला ‘युनिटास’ हा नौदल सरावही याच पर्यायाची तयारी असल्याचे मानले जाते. या सरावात अमेरिकी नौदल व मरिन कॉर्प्सच्या पथकासह १२ लॅटिन अमेरिकन व कॅरेबियन देशांचे नौदल सहभागी झाले आहे.

मित्रदेशांशी सागरी सहकार्य मजबूत करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून हा सराव असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. ब्राझिलच्या सागरी क्षेत्रात सुरू असलेला हा सराव ३० ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.

या सरावानिमित्त अमेरिकेच्या ‘सदर्न कमांड’चे प्रमुख अ‍ॅडमिरल क्रेग फॉलर ब्राझिलमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी व्हेनेझुएलाच्या मुद्यावर भूमिका स्पष्ट करताना अमेरिकी नौदल पूर्णपणे तयारीत व सज्ज असल्याची ग्वाही दिली. ‘अमेरिकेचे नौदल जगातील सर्वात सामर्थ्यशाली नौदल आहे. जर व्हेनेझुएलातील कारवाईसाठी नौदल तैनात करण्याचा निर्णय अमेरिकन सरकारने घेतला तर आमच्यावरील जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली जाईल, याची खात्री देतो’, अशा शब्दात अ‍ॅडमिरल क्रेग फॉलर यांनी संभाव्य कारवाईसाठी अमेरिकी नौदल तयार असल्याचे बजावले.

यापूर्वी अमेरिकेच्या संरक्षण विभागाने व्हेनेझुएलाच्या सीमेनजिक असणार्‍या ब्राझिल तसेच कोलंबियात लष्करी पथके तसेच वायुसेनेची तैनाती केल्याचे दावे समोर आले होते. अमेरिकेची टेहळणी विमाने व्हेनेझुएलाच्या सागरी क्षेत्रात घिरट्या घालत असल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले होते. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेच्या ‘सदर्न कमांड’च्या प्रमुखांनी सज्जतेविषयी केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info