इराणच्या ‘स्पेस सेंटर’ प्रक्षेपण तळावर रॉकेटचा स्फोट

इराणच्या ‘स्पेस सेंटर’ प्रक्षेपण तळावर रॉकेटचा स्फोट

दुबई  – अमेरिकेच्या टीकेकडे दुर्लक्ष करून अंतराळ मोहिम राबविणार्‍या इराणला गुरुवारी मोठा हादरा बसला. ‘खोमेनी स्पेस सेंटर’च्या प्रक्षेपण तळावरुन प्रक्षेपित केलेले रॉकेट आकाशात झेपावण्याआधीच त्याचा प्रचंड स्फोट झाला. या स्फोटाबाबत इराणने गुप्तता राखली होती. पण अमेरिकी सॅटेलाईट कंपन्यांनी प्रसिद्ध केलेल्या फोटोग्राफ्समध्ये इराणच्या प्रक्षेपण तळावरून आगीचे लोट बाहेर पडत असल्याचे दिसत आहे. एका वर्षभरात इराणच्या अंतराळ कार्यक्रमाला बसलेला हा तिसरा हादरा ठरतो.

‘प्लॅनेट लॅब्स’ आणि ‘मॅक्सार टेक्नोलॉजिस’ या दोन अमेरिकी कंपन्यांनी ‘खोमेनी स्पेस सेंटर’चे सॅटेलाईट फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये प्रक्षेपण तळातून धूर निघत असल्याचे आणि त्याच्या जवळच रॉकेटचे तुकडे पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. पण इराणने हे सर्व दावे फेटाळले आहेत. इराणच्या माध्यमांनी याबाबतची बातमी देण्याचे टाळले. तर सॅटेलाईट प्रक्षेपणासाठी वापरण्यात येणारे रॉकेट सुरक्षित ठेवल्याचा दावा वरिष्ठ अधिकार्‍याने केला.

मात्र दोन्ही कंपन्यांच्या सॅटेलाईट्सनी टिपलेल्या फोटोग्राफ्समध्ये प्रक्षेपण तळाची नासधूस झाल्याचे, धूराचे पट्टे स्पष्टपणे दिसत असल्याचे ‘मिडलब्यूरी इन्स्टिट्युट ऑफ इंटरनॅशनल स्टडिज्’ या अभ्यासगटाचे वरिष्ठ विश्‍लेषक ‘डेव्हिड शेमर्लर’ यांनी सांगितले. प्रक्षेपण करतानाच रॉकेटचा स्फोट झाल्याची शक्यता शेमर्लर यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर रॉकेटला लागलेली आग विझविण्यासाठी आजूबाजूला जमा झालेली वाहने देखील दिसत आहेत. त्यामुळे इराणने कितीही नाकारले तरी खोमेनी स्पेस सेंटरवर रॉकेटचा स्फोट झाला हे नक्की, असे शेमर्लर यांनी म्हटले आहे.

याआधी जानेवारी आणि फ्रेब्रुवारी महिन्यातही इराणच्या दोन सॅटेलाईट्सचे प्रक्षेपण अयशस्वी ठरले होते. फेब्रुवारी महिन्यात खोमेनी स्पेस सेंटरवर लागलेल्या आगीत तीन संशोधकांचा बळी गेला होता. आपल्या अंतराळ मोहिमांच्या या दुर्घटनेमागे कारस्थान असल्याचा दावा इराणी माध्यमे करीत आहेत. परदेशी शक्तींकडून इराणच्या अंतराळ मोहिमेवर छुपे हल्ले चढविले जात असल्याचा दावा माध्यमे करीत आहेत. पण इराण सरकारने याविषयी प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.

दरम्यान, अंतराळ मोहिम राबवून इराण आंतरराष्ट्रीय निर्बंधांचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप अमेरिका करीत आहे. या सॅटेलाईट प्रक्षेपणासाठी आवश्यक रॉकेटचा वापर करून इराण आपले शक्तीप्रदर्शन करीत असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info