Breaking News

युरोपातील ‘सिक्रेट मिशन’साठी अमेरिकेचे तीन ‘बी-२ स्टेल्थ बॉम्बर्स’ ब्रिटनच्या हवाईतळावर दाखल

लंडन – अमेरिकेतील अत्यंत प्रगत लढाऊ विमानांपैकी एक म्हणून ओळखण्यात येणारी अण्वस्त्रवाहू ‘बी-२ स्टेल्थ बॉम्बर्स’ मंगळवारी रात्री ब्रिटनच्या हवाईतळावर दाखल झाली आहेत. ही बॉम्बर्स युरोपमधील ‘सिक्रेट मिशन’साठी आल्याचा दावा ब्रिटीश प्रसारमाध्यमांकडून करण्यात येत आहे. तर अमेरिका व ब्रिटनच्या लष्करी प्रवक्त्यांनी ‘बी-२ स्टेल्थ बॉम्बर्स’ची ब्रिटनमधील तैनाती नाटोच्या प्रशिक्षण मोहिमेचा भाग असल्याची माहिती दिली आहे. अमेरिकेच्या संरक्षणदलात जवळपास २० ‘बी-२ स्टेल्थ बॉम्बर्स’ असून त्यांच्यात एकाचवेळी २० टन वजनाचे अणुबॉम्ब वाहून नेण्याची क्षमता आहे.

अमेरिका व रशियामध्ये झालेल्या ‘आयएनएफ ट्रिटी’ या क्षेपणास्त्रांसंदर्भातील महत्त्वाच्या करारातून दोन्ही देश बाहेर पडले आहेत. त्यानंतर दोन्ही देशांनी आक्रमक धोरण स्वीकारून प्रगत क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेने १९ ऑगस्टला केलेल्या चाचणीनंतर रशियाने एकापाठोपाठ एक दोन क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्या असून त्यात अण्वस्त्रांचाही समावेश आहे. त्याचवेळी रशियन संरक्षणदलांनी आर्क्टिक, ब्लॅक सी, बाल्टिक सी या क्षेत्रात एकाच वेळी व्यापक प्रमाणात युद्धसरावही सुरू केले आहेत. त्यामुळे सध्या या भागातील तणाव अधिकच चिघळताना दिसत आहे.

या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेची अण्वस्त्रवाहू बॉम्बर्स ब्रिटनमध्ये दाखल होणे लक्ष वेधून घेणारे ठरते. अमेरिकी हवाईदलाच्या युरोपिअन कमांडने याबाबत निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात नाटो सदस्य देशांच्या प्रशिक्षण मोहिमेसाठी तसेच सदर विमानांना युरोपिय वातावरणाचा सराव व्हावा यासाठी ‘बी-२ स्टेल्थ बॉम्बर्स’ तैनात झाल्याची माहिती दिली. मात्र विमाने नक्की किती कालावधीसाठी तैनात आहेत यासंदर्भातील माहिती देण्याचे टाळले आहे.

मंगळवारी मध्यरात्री ब्रिटनमधील हवाईतळावर दाखल झाल्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी ‘बी-२ स्टेल्थ बॉम्बर्स’नी आईसलँडच्या दिशेने उड्डाण केल्याचे सांगण्यात येते. आईसलॅण्डमधील ‘केफलॅविक एअरपोर्ट’वर सदर बॉम्बर्स सुमारे दोन तास थांबली होती. या कालावधीत ‘हॉट पिट रिफ्युएलिंग’ तंत्राचा वापर करून इंधन भरण्याचा सराव केल्याची माहिती देण्यात आली. आईसलॅण्डला अमेरिकेच्या ‘बी-२ स्टेल्थ बॉम्बर्स’नी भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. ब्रिटनमधील हवाईतळावर तैनात ‘बी-२ स्टेल्थ बॉम्बर्स’नी ब्रिटनच्या ‘एफ-३५बी’ लढाऊ विमानांबरोबर काही काळ सराव केला.

सध्या ब्रिटनमधील हवाईतळावर तैनात असलेली अमेरिकेची बॉम्बर्स यापुढे कोणत्या देशाला भेट देतील अथवा ‘नाटो’च्या कोणत्या सरावात सहभागी होतील, याची माहिती देण्यात आलेली नाही. ब्रिटनच्या प्रसारमाध्यमांनी ‘बी-२ स्टेल्थ बॉम्बर्स’ युरोपमधील ‘सिक्रेट मिशन’साठी आल्याचा दावा केला आहे.

अमेरिकेच्या हवाईदलात दोन दशकांपूर्वी सामील झालेली ‘बी-२ स्टेल्थ बॉम्बर्स’ ही हवाईदलातील सर्वात ‘घातक’ विमाने म्हणून ओळखण्यात येतात. रडारला चकवा देणार्‍या व अणुबॉम्बसह क्रूज क्षेपणास्त्रे वाहून नेणार्‍या या विमानांची किंमत तब्बल २.१ अब्ज डॉलर्स आहे. प्रतितास १०१० किलोमीटरचा वेग आणि तब्बल ११ हजारांहून अधिक किलोमीटरचा पल्ला असणार्‍या या विमानांचा वापर ‘कोसोवो’, ‘अफगाणिस्तान’ व ‘सिरिया’तील मोहिमांमध्ये करण्यात आला होता.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info