Breaking News

‘ब्रेक्झिट’च्या मुद्यावर बहुमत गमावल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन यांच्याकडून निवडणुकांची घोषणा

लंडन – तीन महिन्यांपूर्वी ब्रिटनच्या तत्कालिन पंतप्रधान थेरेसा मे यांना ‘ब्रेक्झिट’च्या मुद्यावर राजीनामा देणे भाग पडले होते. त्यांच्या जागी सूत्रे स्वीकारलेल्या पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मंगळवारी झालेल्या नाट्यमय घडामोडीत संसदेतील बहुमत गमावले आहे. त्यानंतर पंतप्रधान जॉन्सन यांनी आक्रमक भूमिका घेऊन १५ ऑक्टोबरला ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली. ब्रिटनच्या संसदेत घडलेला हा संपूर्ण घटनाक्रम अभूतपूर्व असून अराजकतेच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचा दावा काही विश्‍लेषकांनी केला आहे.

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी ‘ब्रेक्झिट’च्या मुद्यावर तोडगा काढण्यात आलेल्या अपयशाचे कारण पुढे करून ७ जूनला आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सत्ताधारी ‘कॉन्झर्व्हेटिव्ह’ पक्षातील प्रक्रियेनुसार मतदान होऊन बोरिस जॉन्सन यांची पक्षाचे नवे नेते व पंतप्रधान म्हणून निवड झाली होती. ‘३१ ऑक्टोबर किंवा त्यापूर्वी ब्रिटन युरोपिय महासंघातून बाहेर पडणार आहे. आपण सर्व त्यासाठी वचनबद्ध आहोत. यात कोणत्याही प्रकारे जर-तर, पण-परंतु आडवे येणार नाहीत’, अशा शब्दात पंतप्रधान जॉन्सन यांनी आपली प्राथमिकता स्पष्ट केली होती.

मात्र मंगळवारी संसदेत ‘नो डील ब्रेक्झिट’च्या मुद्यावर झालेल्या मतदानादरम्यान सत्ताधारी पक्षाच्या २०हून अधिक सदस्यांनी पंतप्रधान जॉन्सन यांच्याविरोधात मतदान केले. त्याचवेळी पक्षाचे एक सदस्य उघडपणे विरोधी पक्षाच्या जागेत जाऊन बसले. त्यामुळे पंतप्रधान जॉन्सन यांनी सरकारकडे असलेले अवघ्या एका मताचे निसटते बहुमत गमावल्याचे स्पष्ट झाले. सत्ताधारी पक्षात झालेली ही बंडखोरी अभूतपूर्व मानली जात आहे.

या घटनेनंतर सत्ताधारी ‘कॉन्झर्व्हेटिव्ह’ पक्षातील २१ बंडखोर संसद सदस्यांची तातडीने हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर बुधवारी संसदेत पंतप्रधान जॉन्सन यांनी संसद बरखास्त करून १५ ऑक्टोबर रोजी देशात निवडणुका घेण्यात याव्यात, असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर संसदेत मतदान घेण्यात येणार असून रात्री उशिरा ब्रिटीश संसदेचा निर्णय स्पष्ट होईल, असे संकेत सूत्रांनी दिले आहेत.

जुलै महिन्यात सूत्रे स्वीकारल्यानंतर, संसदेत पंतप्रधान जॉन्सन यांनी ‘ब्रेक्झिट’च्या मुद्यावरील आक्रमक भूमिकेचे जोरदार समर्थन केले होते. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस कोणत्याही परिस्थितीत ब्रिटन युरोपिय महासंघातून बाहेर पडणारच ही ग्वाही देताना त्यासाठी कोणतीही नवी तडजोड केली जाणार नसल्याचे जॉन्सन यांनी सांगितले होते. मात्र सत्ताधारी पक्षातील काही संसद सदस्य व विरोधी पक्षाने युरोपिय महासंघाबरोबर तडजोड करण्यासाठी आग्रही भूमिका घेतली.

सरकारकडे निसटते बहुमत असताना जॉन्सन यांनाही ही भूमिका स्वीकारणे भाग पडेल, असा विरोधकांचा कयास होता. मात्र जॉन्सन यांनी थेट सार्वत्रिक निवडणुकांचा प्रस्ताव मांडून, ब्रिटीश मतदारांवर पुढील निर्णय सोपविला आहे. मात्र सदर निर्णय ब्रिटनमध्ये अधिकच गोंधळाची स्थिती निर्माण करेल, असे संकेत विश्‍लेषकांनी दिले आहेत.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info