इराणच्या वाढत्या धोक्याविरोधात इस्रायलची लष्करी कारवाई तीव्र होईल – रशियन राष्ट्राध्यक्षांबरोबरच्या भेटीत इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा

इराणच्या वाढत्या धोक्याविरोधात इस्रायलची लष्करी कारवाई तीव्र होईल – रशियन राष्ट्राध्यक्षांबरोबरच्या भेटीत इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा

सोची – ‘‘गेल्या महिन्याभरात इराणसंलग्न गटांकडून इस्रायलवरील हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.या धोक्याविरोधात इस्रायलचे लष्कर ‘३६० डिग्री’मध्ये कारवाई करीत असून येत्या काळात ही कारवाई अधिकच तीव्र केली जाईल’’, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी केली. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याबरोबरील भेटीत हा इशारा देऊन नेत्यान्याहू यांनी सिरिया, इराक, लेबेनॉन, गाझापट्टी तसेच जगाच्या कुठल्याही कोपर्‍यातील इराण व इराणसंलग्न गटांवरील कारवाई थांबणार नसल्याचे ठणकावले.

इस्रायलमध्ये निवडणुकीची धामधूम असताना पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी रशियाचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट घेतली. सिरिया व शेजारी देशांमधील इराणची वाढती लष्करी आक्रमकता रोखण्यासाठी इस्रायलने स्वीकारलेल्या भूमिकेत बदल होणार नसल्याचे नेत्यान्याहू यांनी या भेटीत स्पष्ट केले. तसेच इस्रायल व रशियातील मैत्रीपूर्ण सहकार्य यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचा संदेश इस्रायली पंतप्रधानांनी दिला.

‘इस्रायल व रशियातील सहकार्य आणि वैयक्तिक स्तरावर आम्हा दोघांमधील मैत्रीचे बंध हे दोन्ही देशांमध्ये संबंध दृढ करण्यासाठी सहाय्यक ठरले आहेत. यामुळे सिरियात धोकादायक कारवाई करीत असताना देखील दोन्ही देशांच्या लष्करात तणाव निर्माण झालेला नाही. ‘इस्रायल व रशियातील हेच दृढ संबंध या क्षेत्रातील स्थैर्यासाठी मूलभूत घटक ठरत आहे. सिरियाच्या हद्दीतून इस्रायलवर हल्ले चढविण्याच्या इराणच्या प्रयत्नांमध्ये झालेली वाढ लक्षात घेता, इस्रायल व रशियातील हा समन्वय अधिकच महत्त्वाचा ठरतो’, असे इस्रायलचे पंतप्रधान म्हणाले.

‘इस्रायलवर हल्ले चढविण्यासाठी इराणने सिरियातील गटांना प्रगत क्षेपणास्त्रे पुरविली आहेत. पण सिरिया तसेच शेजारी देशांमधून इराणसंलग्न गटांकडून इस्रायलच्या सुरक्षेला मिळत असलेले आव्हान कधीही खपवून घेतले जाणार नाही. इस्रायलच्या लष्कराने इराणविरोधात ३६० अंशात कारवाई केली असून यापुढे इस्रायली लष्कराची ही कारवाई अधिक तीव्र होईल’, अशी घोषणा पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी केली.

इस्रायली पंतप्रधानांच्या या घोषणेवर रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी प्रतिक्रिया दिली नाही. पण रशिया व इस्रायलमधील सहकार्य अबाधित राहील, अशी अपेक्षा पुतिन यांनी व्यक्त केली. ‘येत्या काळात इस्रायल ऐतिहासिक निवडणुकीच्या आव्हानांना सामोरे जाणार आहे. सोव्हिएत रशियातून बाहेर पडलेले १५ लाख जण सध्या इस्रायलमध्ये राहत असून आम्ही त्यांच्याकडे आपली माणसे म्हणूनच पाहतो. इस्रायलमधील निवडणुकीचा काहीही निकाल लागो, पण रशिया व इस्रायलमधील ही मैत्री यापुढेही अशीच कायम राहील’, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले.

दरम्यान, रशियन राष्ट्राध्यक्षांबरोबरच्या भेटीआधी इस्रायली पंतप्रधानांनी रशियन संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांच्याशी इराणच्या मुद्यावर तब्बल साडे तीन तास चर्चा केली. या चर्चेत दोन्ही देशांचे वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते. या चर्चेचा कालावधी वाढल्याने राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याबरोबरील पंतप्रधान नेत्यान्याहू यांची भेट अर्ध्या तासाने पुढे ढकलावी लागली. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन व पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्यात सव्वा तासांची चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info