‘ग्लोबलिस्टां’चे दिवस सरले, राष्ट्रवाद्यांनाच भवितव्य – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

‘ग्लोबलिस्टां’चे दिवस सरले, राष्ट्रवाद्यांनाच भवितव्य – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

संयुक्त राष्ट्रसंघ – संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेतील आपल्या भाषणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ग्लोबलिस्ट’ अर्थात जागतिकीकरणाचा पुरस्कार करणार्‍यांवर कठोर शब्दात प्रहार केला. पुढच्या काळात ‘ग्लोबलिस्टांना’ भवितव्य असणार नाही, तर राष्ट्रवाद्यांना अर्थात आपल्या देशाचे वैशिष्ट्य, स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्त्व जपणर्‍यांना भवितव्य असेल, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ठणकावले. याबरोबरच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सौदी अरेबियाच्या इंधनप्रकल्पावर हल्ला चढविणारा इराण जागतिक शांततेसाठी घातक बनल्याचा आरोप केला. तसेच चीनच्या व्यापारी राजकीय अपप्रवृत्तींवरही जोरदार टीका केली.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर आल्यापासूनच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जागतिकीकरणाचे लाभ सर्वसामान्य अमेरिकी जनतेला नाही, तर मूठभर धनाढ्यांनाच मिळत असल्याची बाब लक्षात आणून दिली होती. मंगळवारी संयुक्त राष्ट्रसंघाच्या ७४ व्या आमसभेला संबोधित करताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘ग्लोबलिस्ट’ अर्थात जगातिकीकरणाचा पुरस्कार करण्यांंवर सडकून टीका केली. पुढच्या काळात अशा गटाच्या नेत्यांना भवितव्य नसेल, असा निर्वाळा देऊन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांचा काळ सरल्याचा इशारा दिला. त्याचवेळी आपल्या देशाचे वैशिष्ट्य, स्वातंत्र्य जपणार्‍या व नागरिकांच्या अधिकारांसाठी झटणार्‍या नेत्यांचा पुढच्या काळात उत्कर्ष होईल व त्यांनाच भवितव्य असेल, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे.

जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू करणारा देश अशी अमेरिकेची ओळख होती. ट्रम्प यांचा अपवाद वगळता अमेरिकेच्या सर्वच राष्ट्राध्यक्षांनी जागतिकीकरणाचा पुरस्कार केला. मात्र यामुळे काही मूठभर धनाढ्यांचा फायदा?झाला पण सर्वसामान्य अमेरिकी नागरिकांचे यामुळेच नुकसानच झाले, अशी टीका डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. त्यामुळे आपण सत्तेवर आल्यानंतर ‘अमेरिका फर्स्ट’ हेच धोरण कायम ठेवणार असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले होते. त्यानुसार राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आक्रमक धोरण राबविण्याचा सपाटा लावला. यामुळे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला खीळ बसल्याची टीका सुरू झाली असली तरी ट्रम्प यांच्या या धोरणांमुळे अमेरिकेत रोजगार वाढला व वेतनातही वाढ झाली.

यामुळेच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प जगभरातील राष्ट्रवादी नेत्यांना झुकते माप देत असून त्यांच्याबरोबरील सहकार्य वाढवित असल्याचे दिसते. आमसभेतील आपल्या भाषणातही ट्रम्प यांनी राष्ट्रवादाचा पुरस्कार केला असून ‘ग्लोबलिस्टांचे’ दिवस भरल्याची घोषणा करून टाकली. दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या ३७ मिनिटांच्या भाषणात इराणला लक्ष्य केले. इराण रक्ताचा चटावलेला देश बनल्याचे सांगून ट्रम्प यांनी सौदी अरेबियाच्या इंधनप्रकल्पावरील हल्ल्यामागे इराणच असल्याचा गंभीर आरोप केला. अमेरिकेबरोबर ब्रिटन, फ्रान्स व जर्मनीनेही इराणवर हा आरोप केला आहे. त्यामुळे अशा देशाला सहाय्य मिळेल, असा निर्णय दुसर्‍या कुठल्याही देशाने घेऊ नये. पुढच्या काळातही इराण असेच बेताल वर्तन करीत राहिला, तर या देशावरील निर्बंध अमेरिका मागे घेेणार नाही, असा इशारा यावेळी ट्रम्प यांनी दिला.

इराणबरोबरच ट्रम्प यांनी चीनचाही समाचार घेतला. २००१ साली जागतिक व्यापार संघटनेत सहभागी झालेल्या चीनने आर्थिक सुधारणा घडविण्याची ग्वाही दिली होती खरी. पण गेल्या दोन दशकांच्या कालावधीत चीनने आपले आश्‍वासन पाळलेले नाही. चीन अजूनही अवैध व्यापारी निर्णय घेत असून चलनाचे दर जाणीवपूर्वक कमी ठेवत आहे, असा ठपका ट्रम्प यांनी ठेवला इतकेच नाही तर चीन आपल्या उत्पादकांना मोठ्या प्रमाणात अनुदान देऊन ‘प्रॉडक्ट डंपिंग’ तसेच बुद्धिसंपदेची चोरी यासारखे प्रकार करीत असल्याचे ट्रम्प म्हणाले. चीनवर ही टीका करून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनबरोबरील व्यापारयुद्ध इतक्यात थांबणार नाही, असा इशाराच दिल्याचे दिसत आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info