निर्वासितांसाठी लवकरच युरोपचे दरवाजे खुले करू – तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांचा युरोपिय देशांना नवा इशारा

अंकारा – ‘युरोपिय देशांकडे पैसा आहे, युरोपची अर्थव्यवस्था मजबूत आहे. तरीही शंभर-दोनशे निर्वासित ग्रीसमध्ये दाखल झाल्यानंतर युरोपिय देशांची धावपळ सुरू होते आणि ते हात वर करून जबाबदारी झटकतात. युरोपिय देशांनी ही जबाबदारी झटकली तरी वेळ येईल तेव्ह निर्वासितांसाठी युरोपचे दरवाजे खुले करू’, असा इशारा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी दिला. निर्वासितांसाठी सिरियामध्ये ‘सेफ झोन’ उभारण्यासाठी तुर्कीने सिरियात चढविलेल्या हल्ल्यांवर युरोपिय देशांनी टीकेची झोड उठविली आहे. या पार्श्‍वभूमीवर तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी सदर निर्वासितांचे लोंढे युरोपवर सोडण्याची नवी धमकी दिली.

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, युरोपिय देशांवर जोरदार ताशेरे ओढले. सिरियातील हल्ल्यांवर युरोपिय देशांनी नाराजी व्यक्त करून तुर्कीला नाराज केले तर लवकरच निर्वासितांचे लोंढे युरोपिय देशांवर सोडले जातील, असे एर्दोगन यांनी यावेळी पुन्हा एकदा बजावले. ‘निर्वासितांसाठी युरोपचे दरवाजे उघडू, असे तुर्कीने जाहीर केले तेव्हा युरोपिय देशांनी या निर्वासितांची जबाबदारी झटकली. अशी जबाबदारी झटकू नका. वेळ येईल, जेव्हा आम्ही युरोपचे दरवाजे लाखो निर्वासितांसाठी मोकळे करू’, अशी धमकी एर्दोगन यांनी दिली.

‘युरोपिय देशांची आर्थिक स्थिती मजबूत आहे. तरीही शे-दोनशे निर्वासित सागरीमार्गाने ग्रीसमध्ये धडकतात, तेव्हा युरोपिय नेत्यांची पळापळ होते. तुर्कीने मात्र ३६ लाखांहून अधिक निर्वासितांना आसरा दिला आहे. आता या लाखो निर्वासितांची जबाबदारी तुम्ही कसे सांभाळणार ते लवकरच पाहू’, असे सांगून एर्दोगन यांनी तुर्कीवर टीका करणार्‍या युरोपिय देशांना धमकावले.

२०१६ साली युरोपिय महासंघाबरोबर झालेल्या करारानुसार निर्वासितांचा वाढता प्रवास कमी करण्याची जबाबदारी तुर्कीवर टाकण्यात आली होती. या निर्वासितांना थोपविण्यासाठी युरोपिय देशांकडून तुर्कीला आर्थिक तसेच व्यापारी सवलतीही पुरविण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत तुर्कीची लष्करी कारवाई सिरियाला अधिकाधिक अस्थिर करील. यामुळे सिरियन निर्वासितांचे लोंढे इतर मार्गाने युरोपिय देशांवर अधिक मोठ्या संख्येने धडकतील, अशी चिंता युरोपला सतावित आहे. या पार्श्‍वभूमीवर, युरोपिय महासंघ तुर्कीच्या सिरियातील कारवाईला कडाडून विरोध करीत आहेत.

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या युरोपिय महासंघाच्या बैठकीतही तुर्कीच्या उत्तर सिरियातील हल्ल्यांवर टीका करण्यात आली. तुर्कीचे सिरियातील हल्ले आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन असून यामुळे क्षेत्रीय स्थैर्य व सुरक्षा धोक्यात सापडल्याचा ठपका महासंघाने ठेवला आहे. तर महासंघाच्या काही सदस्यांनी मानवाधिकारांचे उल्लंघन करणार्‍या तुर्कीवर निर्बंध टाकण्याची तसेच व्यापारी सहकार्यातून माघार घेण्याची मागणी केली आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info