इराकमधील अमेरिकेच्या दूतावासावरील हल्ल्याची इराणला मोठी किंमत चुकवावी लागेल – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

इराकमधील अमेरिकेच्या दूतावासावरील हल्ल्याची  इराणला मोठी किंमत चुकवावी लागेल – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन/बगदाद/तेहरान – ‘याआधी इराणने अमेरिकी कंत्राटदाराला ठार केले. इराणच्या या हल्ल्याला अमेरिकेने जोरदार प्रत्युत्तर दिले. आता इराणने इराकमधील अमेरिकी दूतावासावर हल्ला घडविला. या हल्ल्यासाठी पूर्णपणे इराणच जबाबदार असून इराणला याची मोठी किंमत चुकवावी लागेल. हा इशारा नाही तर धमकी आहे’, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. दरम्यान, इराकमधील आपले दूतावास आणि हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेने १०० मरिन्स जवानांचे पथक रवाना केले. तर इराणने अमेरिकेचे आरोप फेटाळून आपण प्रत्युत्तरासाठी सज्ज असल्याचे प्रतिआव्हान दिले आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून इराकमधील ‘पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेस’ (पीएमएफ) आणि ‘कतैब हिजबुल्लाह’ या दोन इराणसंलग्न गटांनी अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केले होते. गेल्या आठवड्यात किरकूकमधील हल्ल्यात आपल्या कंत्राटदाराचा बळी गेल्यानंतर अमेरिकेने इराणसंलग्न गटांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर, रविवारी अमेरिकेने इराक व सिरियातील इराणसंलग्न गटांच्या ठिकाणांवर जोरदार हल्ले चढविले.

अमेरिकेच्या या हवाई हल्ल्यांमध्ये इराणसंलग्न ‘कतैब हिजबुल्लाह’ या गटाचे २५ दहशतवादी ठार झाले होते. त्याचबरोबर यापुढेही आपल्या हितसंबंधांसाठी धोकादायक बनलेल्या इराण किंवा इराणसंलग्न गटांना लक्ष्य करण्याची घोषणा अमेरिकेने केली होती. अमेरिकेच्या या कारवाईवर संताप व्यक्त करण्यासाठी मंगळवारी इराणसंलग्न गटांनी राजधानी बगदादमधील अमेरिकी दूतावासावर हल्ले चढविले.

सुरुवातीला इराकमधील निदर्शकांनी हे हल्ले चढविल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पण निदर्शकांच्या हातात ‘कतैब’ व ‘पीएमएफ’चे झेंडे होते व यामुळे इराणसंलग्न गट या हल्ल्यामागे असल्याचे उघड झाले. सलग दोन दिवस या इराणसंलग्न गटाच्या निदर्शकांनी दूतावासाच्या बाहेरील सुरक्षा चौकीची काच फोडून तसेच आसपास जाळपोळ करून दूतावासात शिरण्याचा प्रयत्न केला. दुसर्‍या दिवशी, बुधवारी अमेरिकी सैनिकांनी निदर्शकांना पांगविण्यासाठी अश्रुधूराचा वापर केला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या निदर्शनांवर संताप व्यक्त करून इराणने हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप केला. तसेच इराणने कितीही नाकारले तरी दूतावासावरील या हल्ल्यांसाठी इराणच जबाबदार असून यासाठी लवकरच या देशाला मोठी किंमत चुकवावी लागणार असल्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी बजावले. पुढच्या काही तासात अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांनी इराकसाठी १०० मरिन्स जवानांचे पथक रवाना केले आहे. काही वर्षांपूर्वी लिबियातील बेंगाझी येथील अमेरिकी दूतावासावरील दहशतवादी हल्ल्याविरोधात कारवाई करणार्‍या मरिन्स पथकाचे जवान यात असल्याचा दावा अमेरिकी माध्यमे करीत आहेत.

दरम्यान, अमेरिकेच्या या इशार्‍यानंतर दूतावासावर हल्ले चढविणार्‍या आपल्या समर्थकांना माघार घेण्याचे आदेश इराकमधील इराणसंलग्न गटाच्या अधिकार्‍यांनी दिले आहेत. अमेरिकेला इशारा देण्याचे तुमचे काम पूर्ण झाले, आता मागे फिरा, असा संदेश या निदर्शकांना देण्यात आल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info