इराणच्या हल्ल्यानंतरही संयमी भूमिका स्वीकारून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणची कोंडी केली

इराणच्या हल्ल्यानंतरही संयमी भूमिका स्वीकारून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणची कोंडी केली

वॉशिंग्टन, दि. ९ (वृत्तसंस्था) – अमेरिकेच्या इराकमधील लष्करी तळांवर इराणने क्षेपणास्त्रांचा मारा केल्यानंतर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प इराणला याची अद्दल घडविण्याचा निर्णय घेतील, असे दावे केले जात होते. यामुळे बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या ‘प्रेस ब्रिफिंग’वर सार्‍या जगाच्या नजरा खिळलेल्या होत्या. मात्र ट्रम्प यांनी लष्करी कारवाईच्या ऐवजी, इराणवर आर्थिक निर्बंधांची घोषणा करून या सर्वांना चकित केले. इराणच्या राजवटीने आपला मार्ग बदलल्याखेरीज हे आर्थिक निर्बंध कायम राहतील, असे सांगून ट्रम्प यांनी इराणबरोबर नव्या वाटाघाटी होऊ शकतात, असे संकेत दिले. तर अमेरिकेला इराणशी युद्ध सुरू करायचे नाही. मात्र इराणने युद्ध छेडलेच, तर ते संपविण्याची आमची तयारी झालेली आहे, असे अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांनी बजावले आहे.

इराणने इराकमधील अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविल्यानंतर, ट्रम्प इराणवर लष्करी कारवाईची घोषणा करतील आणि यातून घनघोर युद्धाला तोंड फुटेल, असे दावे केले जात होते. पण ट्रम्प यांनी त्यांच्या बेधडक व्यक्तिमत्त्वाशी विसंगत अशी भूमिका घेऊन हे युद्ध टाळल्याचे दिसत आहे. इराणने चढविलेल्या हल्ल्यात अमेरिकेची हानी झालेली नाही, असे सांगून ट्रम्प यांनी या हल्ल्याला महत्त्व देण्याचे टाळले. त्याचवेळी कासेम सुलेमानी यांच्यावरील कारवाईचा निर्णय योग्यच होता, असे ट्रम्प यांनी बुधवारच्या प्रेस ब्रिफिंगमध्ये ठासून सांगितले. इतकेच नाही, तर २०१५ साली इराणबरोबर झालेल्या अणुकराराचे ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वाभाडे काढून या करारामुळेच इराणला अधिक बळ मिळाल्याचा दावा केला.

या अणुकराराला जबाबदार असलेल्या अमेरिकेच्या आधीच्या प्रशासनाला धारेवर धरून ट्रम्प यांनी इराणच्या राजवटीलाही पुन्हा एकदा लक्ष्य केले. जोवर इराणची ही राजवट आपला मार्ग बदलत नाही, तोवर या देशाशी वाटाघाटी शक्य नाही. पण जर या राजवटीने आपल्या धोरणात विधायक बदल केले तर या देशाशी चर्चा शक्य असल्याचे सूचक उद्गार ट्रम्प यांनी यावेळी काढले. याबरोबरच पुढच्या काळात नाटोने आखाताकडे लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केले आहे. या आवाहनाला नाटोकडून प्रतिसाद मिळाला आहे.
ट्रम्प यांच्या या संयमी भूमिकेवर अमेरिकेतील माध्यमांच्या एका गटाने टीका सुरू केली असून आधी सुलेमानी यांना ठार करणारे ट्रम्प आता युद्ध टाळण्याचा प्रयत्न करीत असल्याचा ठपका हा माध्यमांचा गट ठेवत आहे. तर काही विश्‍लेषकांनी मात्र ट्रम्प यांनी स्वीकारलेल्या या संयमाच्या मागे फार मोठी व्यूहरचनात्मक खेळी असल्याचा निष्कर्ष नोंदविला आहे. कासेम सुलेमानी यांना ठार करून अमेरिकेने आपले ध्येय साध्य केले आहे. इराक, सिरिया, लेबेनॉन, येमेन या देशांमधल्या इराणसंलग्न सशस्त्र गटांचे सूत्रसंचलन कासेम सुलेमानी यांच्याकडून केले जात होते. त्यांना ठार करून अमेरिकेने इराणची क्षमता बर्‍याच प्रमाणात कमी केली. त्यामुळे आता संयम दाखविण्याचे अमेरिकेचे काहीच नुकसान होणार नाही. तर दुसर्‍या बाजूला इराणला अमेरिकेचा सूड घेण्याची भाषा करून अमेरिकेच्या तळांवर नवे हल्ले चढविण्याच्या धमक्या देत आहे. यावर युरोपिय देशांची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. इराणच्या विरोधातील अमेरिकेच्या व्यूहरचनेत सहभागी होण्याचे संकेत ब्रिटन व फ्रान्सने दिले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी नाटोला आखातात तैनाती करण्याचे केलेले आवाहन व्यापक डावपेचांचा भाग ठरतो. यामुळे इराणची राजनैतिक पातळीवर अधिक कोंडी होऊ शकते. पुढच्या काळात इराणने अधिक आक्रमकता दाखविलीच, तर अमेरिकेच्या बरोबरीने ब्रिटन व फ्रान्ससह नाटोकडून त्यावर प्रतिक्रिया उमटू शकते. बुधवारी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका स्वीकारण्याचे टाळून हे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

मात्र पुढच्या काळात इराणने फाजिल आक्रमकता दाखविली, तर अमेरिकेकडे जबरदस्त लष्करी सामर्थ्य आहे, याची जाणीवही अमरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट शब्दात करून दिली आहे. पुढच्या काळात अमेरिकेशी संघर्ष करायचा की टाळायचा, याचा निर्णय इराणलाच घ्यायचा आहे, असे पर्याय समोर ठेवून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपली युद्धखोर ही प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला. याला अमेरिकेत होणार्‍या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा संदर्भ लक्षात घेऊन ट्रम्प यांनी आपल्या भूमिकेत हे बदल केले, याचीही जाणीव विश्‍लेषक करून देत आहेत.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info