व्हेनेझुएला, इराण, पाकिस्तान व बांगलादेशासह ७५ देशांमध्ये असंतोषाचा भडका उडू शकतो – ब्रिटीश गटाचा दावा

व्हेनेझुएला, इराण, पाकिस्तान व बांगलादेशासह ७५ देशांमध्ये असंतोषाचा भडका उडू शकतो – ब्रिटीश गटाचा दावा

लंडन – गेल्या वर्षी जगातील विविध देशांमध्ये उडालेल्या नागरी असंतोषाच्या भडक्याचे लोण वाढत चालले असून यावर्षी सुमारे ७५ देशांमध्ये असंतोषाची तीव्रता वाढलेली पहायला मिळेल, असा दावा ब्रिटनमधील एका गटाने केला आहे. ‘व्हेरिस्क मॅपलक्रॉफ्ट’ या ब्रिटीश गटाने २०१९ साली जगातील ४७ देशांमध्ये आंदोलन व हिंसेचा समावेश असलेल्या असंतोषाचा भडका पहायला मिळाला होता, अशी माहिती अहवालात दिली. त्याचवेळी २०२० साली असंतोषाचा सर्वाधिक धोका इराण, व्हेनेझुएला, लिबिया, पाकिस्तान व इथिओपियासारख्या देशांना असल्याचा इशाराही दिला.

‘व्हेरिस्क मॅपलक्रॉफ्ट’ या विश्‍लेषक गटाने ‘पॉलिटिकल रिस्क आऊटलुक २०२०’ नावाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्यात २०१९ साली जगाच्या वेगवेगळ्या खंडातील ४७ देशांमध्ये सुरू असलेल्या आंदोलन व हिंसाचाराचा उल्लेख करून हाच कल यावर्षी अर्थात २०२० सालीही कायम राहिल, असा दावा करण्यात आला आहे. गेल्या वर्षातील नागरी असंतोषाच्या घटनांचा उल्लेख करताना ‘हॉंगकॉंग’ व ‘चिली’ ही जगातील सर्वात धोकादायक क्षेत्रे बनली असून पुढील दोन वर्षे ही स्थिती कायम राहिल, असे बजावले.

२०२० साली जगातील १० देशांमध्ये असंतोष, आंदोलन व हिंसाचाराचा भडका सर्वाधिक तीव्र असेल, असे भाकित ब्रिटीश गटाने वर्तविले. त्यात इराण, व्हेनेझुएला, लिबिया, गिनिआ, नायजेरिया, पाकिस्तान, बांगलादेश, चिली, पॅलेस्टाईन व इथिओपिया यांचा समावेश आहे. लेबेनॉन व बोलिव्हिया या देशांमध्ये सध्या सुरू असलेल्या आंदोलनांना अधिक हिंसक वळण मिळण्याची शक्यताही अहवालात व्यक्त करण्यात आली.

‘२०१९ साली जगातील अनेक देशांमधील जनतेने मनात दाबून ठेवलेला संताप रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलनाच्या रुपात व्यक्त केला. संबंधित देशांमधील सत्ताधार्‍यांसाठी ही गोष्ट अनपेक्षित व आश्‍चर्याचा धक्का देणारी ठरली. काही देशांमध्ये सरकारने असंतोषाचे कारण असलेल्या गोष्टींवर तोडगा काढण्याचे प्रयत्नही केले. मात्र नाराजीचे अनेक मुद्दे जनतेच्या मनात खोलवर मूळ धरून असून त्यांच्यावर उपाय शोधण्यास अनेक वर्षे लागू शकतात’, असा इशारा ‘पॉलिटिकल रिस्क आऊटलुक २०२०’ मध्ये देण्यात आला आहे.

ब्रिटनच्या गटाने आपल्या अहवालासाठी जगातील १२५ देशांचा अभ्यास व सर्वेक्षण केल्याची माहिती दिली. ‘पॉलिटिकल रिस्क आऊटलुक २०२०’ अहवालानुसार त्यातील जवळपास ७५ देशांमध्ये असंतोषाच्या भडक्याची शक्यता आहे. याचाच अर्थ जगातील १९५ देशांपैकी जवळपास ४० टक्के देशांना अस्थैर्य व निदर्शनांचा धोका आहे, याकडे ‘व्हेरिस्क मॅपलक्रॉफ्ट’ या ब्रिटीश गटाने लक्ष वेधले.

गेल्या दोन वर्षात जगातील आघाडीच्या संस्था, प्रसारमाध्यमे, अधिकारी तसेच अभ्यासक सातत्याने जागतिक स्तरावरील वाढत्या संघर्षाकडे लक्ष वेधत आहेत. दोन वर्षांपूर्वी ब्रिटनच्या तत्कालिन लष्करप्रमुखांनी सध्या सुरू असलेल्या संघर्ष तसेच तणावाच्या स्थितीची तुलना पहिल्या महायुद्धाशी केली होती. तर आखाती देशांमधील अभ्यासकांनी लवकरच दुसर्‍या ‘अरब स्प्रिंग’ आंदोलनाची लाट उसळणार असल्याचा इशारा दिला होता. संयुक्त राष्ट्रसंघाने आपल्या २०१९ सालच्या अहवालात संघर्ष व हिंसाचारामुळे तब्बल चार कोटींहून अधिक नागरिकांवर विस्थापित होण्याची वेळ ओढवली असल्याची जाणीवही करून दिली होती.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info