‘वुहान व्हायरस’च्या साथीची तब्बल एक लाखांहून अधिक जणांना लागण – ब्रिटनच्या ‘इम्पिरिअल कॉलेज’चा दावा

‘वुहान व्हायरस’च्या साथीची तब्बल एक लाखांहून अधिक जणांना लागण – ब्रिटनच्या ‘इम्पिरिअल कॉलेज’चा दावा

लंडन/बीजिंग/वुहान – चीनमध्ये ८० हून अधिक जणांचे बळी घेणार्‍या ‘वुहान व्हायरस’च्या साथीची लागण तब्बल एक लाखांहून अधिक जणांना झालेली असू शकते, असा खळबळजनक दावा ब्रिटनच्या संशोधकांनी केला आहे. ब्रिटनमधील ‘इम्पिरिअल कॉलेज, लंडन’च्या संशोधकांनी हा दावा करताना साथीच्या वाढणार्‍या वेगाकडेही लक्ष वेधले आहे. दोन आठवड्यांपूर्वी अवघ्या ४० ते ५० रुग्णच असल्याचा दावा करणार्‍या चीनकडून आता तीन ते सहा हजार रुग्णांना ‘वुहान व्हायरस’ची लागण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याचवेळी जगभरात ‘वुहान व्हायरस’चे रुग्ण आढळलेल्या देशांची संख्या १२ झाली आहे.

चीनमध्ये जानेवारी महिन्याचा अखेरचा आठवडा व फेब्रुवारी महिन्याची सुरुवात हा कालावधी ‘ल्युनार न्यू इयर’ म्हणून साजरा करण्यात येतो. या कालावधीत चीनच्या सत्ताधारी राजवटीकडून अधिकृतरित्या सुट्टी घोषित करण्यात येते. चीनच्या शहरांमध्ये वास्तव्यास असणारे कोट्यावधी नागरिक या काळात गावाला भेट देतात. त्याचवेळी जगभरातील पर्यटकही मोठ्या प्रमाणात चीनमध्ये दाखल होतात. त्यामुळे या कालावधीत चीनमधील सर्व प्रवासी मार्ग व सुविधांवर प्रचंड ताण असतो. याच कालावधीत ‘वुहान व्हायरस’ची साथ फैलावत असून चीनसह आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी, देशातील सर्व नागरिकांना तसेच यंत्रणांना परिस्थिती गंभीर असल्याची जाणीव करून देतानाच एकजुटीने मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. चीनचे पंतप्रधान ली केकिआंग यांनी सोमवारी वुहानला भेट देऊन ‘वुहान व्हायरस’च्या साथीविरोधात कार्यरत असलेल्या वैद्यकीय पथकांना तसेच रुग्णालयांना भेट दिली. पंतप्रधान केकिआंग यांनी काही रुग्णांचीही विचारपूस केल्याची माहिती सूत्रांनी दिली. चीनचे आरोग्यमंत्री मा शिओवेई यांनी, ‘वुहान व्हायसर’ची पसरण्याची क्षमता जास्त असल्याचा दावा केला आहे.

चीनमध्ये ‘वुहान व्हायरस’ची लागण झालेल्यांची संख्या दोन हजार ७०० हून अधिक असल्याचे सांगण्यात आले असून त्यातील सुमारे ५०० जणांची प्रकृती गंभीर आहे. देशाच्या विविध भागात आढळलेल्या संशयित रुग्णांची संख्या पाच हजारांहून अधिक असल्याचा दावा करण्यात येतो. रुग्णांची संख्या अधिक वाढून नये म्हणून पूर्ण अथवा अंशतः ‘लॉकडाऊन’ असणार्‍या शहरांची संख्या वाढविली असून सध्या जवळपास २० शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’ असल्याचे सांगण्यात येते. चीनचा शेजारी देश असलेल्या मंगोलियाने सीमाभाग व त्यातील दळणवळण पूर्णपणे थांबविल्याचे जाहीर केले आहे.

चीनपाठोपाठ जगातील इतर देशांमध्येही ‘वुहान व्हायरस’चे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. थायलंड, जपान, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम या आशियाई देशांसह ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, नेपाळ अशा सुमारे १२ देशांमध्ये ‘वुहान व्हायरस’चे रुग्ण आढळले आहेत. थायलंडमध्ये आठ तर अमेरिका व ऑस्ट्रेलियामध्ये प्रत्येकी पाच रुग्ण असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा तसेच भारताने चीनमध्ये वास्तव्यास असलेले आपले नागरिक माघारी आणण्याची तयारी केली असून त्यासाठी विमाने सज्ज ठेवल्याचे संकेत दिले आहेत.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info