रशियन सैनिकांच्या मुंडक्यांचे मनोरे उभारू – तुर्कीतील रशियन राजदूतांना धमकी

रशियन सैनिकांच्या मुंडक्यांचे मनोरे उभारू – तुर्कीतील रशियन राजदूतांना धमकी

मॉस्को – ‘‘इदलिबमध्ये तुर्की व तुर्कीसंलग्न जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची रशियाला किंमत मोजावी लागेल. आम्ही रशियन सैनिकांच्या मुंडक्यांचे मनोरे तयार करू’’, अशी धमकी आपल्याला मिळाल्याचा खळबळजनक दावा तुर्कीतील रशियन राजदूत ‘ऍलेक्सी येरखोव्ह’ यांनी केला. रशियाला दिलेली ही धमकी अत्यंत गांभीर्याने घेतली जात असल्याचे येरखोव्ह यांनी म्हटले आहे. २०१५ साली तुर्कीमध्ये रशियाचे तत्कालिन राजदूत आंद्रेई कार्लोव्ह यांची हत्या घडविण्यात आली होती. पाच वर्षांपूर्वी दोन्ही देशांमध्ये यावरून मोठा तणाव निर्माण?झाला होता. त्याचा दाखलाही येरखोव्ह यांनी दिला आहे.

    

रशियाच्या ‘रिया नोवोस्ती’ या सरकारी वृत्तवाहिनीशी बोलताना राजदूत येरखोव्ह यांनी पाच वर्षांपूर्वीच्या व आत्ताच्या परिस्थितीची तुलना केली. ‘‘२०१५ सालच्या नोव्हेंबर महिन्यात सिरियामध्ये तुर्कीने रशियाचे लढाऊ विमान पाडले होते?आणि त्यानंतर तुर्कीची राजधानी अंकारामध्ये रशियाचे तत्कालिन राजदूत आंद्रेई कार्लोव्ह यांची हत्या घडविण्यात आली होती. ‘कार्लोव्ह यांची हत्या घडविणारा आम्ही लवकरच अलेप्पोचा ताबा घेऊ’ अशा घोषणा देत होता’’, असे सांगून येरखोव्ह यांनी आत्ताची परिस्थितीही फारशी काही वेगळी नसल्याचा दावा केला.

‘आज मलाही जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. दिवस-रात्र धमक्यांचे फोन, संदेश मला व तुर्कीतील रशियन दूतावासातील कर्मचार्‍यांना येत आहेत. यापैकी काही जणांनी तर सिरियात असलेल्या रशियन सैनिकांच्या मुंडक्यांचे मनोरे उभारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. तर काही धमकीखोरांनी मला जिवंत जाळण्याचे इशारेही दिले आहेत. या धमक्या व्यक्ती म्हणून मला नाही तर रशियाला दिल्या जात आहेत. म्हणूनच ते खपवून घेतले जाऊ शकत नाही’, असे येरखोव्ह यांनी रशियन वृत्तवाहिनीला सांगितले. त्याचबरोबर या धमक्यांमुळे तुर्कीमधील रशियाविरोधी भावना उघड झाल्याचे रशियन राजदूत येरखोव्ह यांनी निदर्शनास आणून दिले.

‘जनमत भडकविणार्‍या या धमक्यांमुळे रशियाविरोधात तिस्कार, संताप आणि द्वेष यांची एक साखळी तयार केली जात आहे. पाच वर्षांपूर्वी देखील अशाच प्रकारे रशियाविरोधात तुर्कीचे जनमत भडकविण्यात आले होते. त्याचा शेवट कसा झाला हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे’, असे सांगून येरखोव्ह यांनी कार्लोव्ह यांच्या हत्येकडे लक्ष वेधले. तुर्कीने आपल्याला सुरक्षा पुरविण्यात पूर्ण व्यावसायिकता दाखविल्याचे रशियन राजदूत म्हणाले. पण उभय देशांमधील तणाव कमी करण्यासाठी एर्दोगन सरकारने अधिक प्रयत्न करावे, अशी अपेक्षा रशियन राजदूतांनी व्यक्त केली.

दरम्यान, इदलिब व अलेप्पोतील संघर्षावरुन रशिया आणि तुर्कीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. म्युनिक येथील बैठकीत रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह आणि तुर्कीचे परराष्ट्रमंत्री मेवलूत कावुसोग्लू यांनी दोन्ही देशांमध्ये सिरियावरून तणाव नसल्याचे जाहीर केले. पण पुढच्या काही तासातच रशियाने सिरियातील हिंसाचाराला समर्थन देणे थांबवावे, असा शेरा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी मारला होता.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info