‘कोरोनाव्हायरस’ची साथ रोखण्याची संधी निसटत चालली आहे जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

‘कोरोनाव्हायरस’ची साथ रोखण्याची संधी निसटत चालली आहे जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

जीनिव्हा/तेहरान/सेऊल/रोम – चीनच्या ‘कोरोनाव्हायरस’ साथीला रोखण्याची संधी हळूहळू हातातून निसटत चालली असून खिडकी बंद होण्यापूर्वी झटपट हालचाली करणे गरजेचे आहे. विषाणूची साथ कोणत्याही दिशेने सरकू शकते. आपण जलद उपाययोजना करु शकलो तर मोठे संकट टाळता येईल. पण संधी घालवली तर आपल्यासमोर गंभीर समस्या उभी राहू शकते’, असा चिंताजनक इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला. चीनमध्ये ‘कोरोनाव्हायरस’चे रुग्ण व बळी घटत असल्याचा दावा होत असला तरी दक्षिण कोरिया, इराण, इटली व कॅनडातील घटनांमुळे साथीची तीव्रता कायम असल्याचे दिसत आहे.

दक्षिण कोरियातील ‘कोरोनाव्हायरस’च्या साथीने गेल्या ४८ तासात गंभीर रूप धारण केले आहे. या कालावधीत दक्षिण कोरियात साथीमुळे दोन जणांचा मृत्यू झाला असून रुग्णांची संख्या ४३३ वर जाऊन पोहोचली आहे. त्यात गेल्या २४ तासांमध्ये साथीची लागण झालेल्या २२९ नव्या रुग्णांचा समावेश आहे. हे रुग्ण ‘दाएगु’ व ‘शेओंग्दो’ या दोन शहरांमधील असून दोन्ही शहरांमध्ये नागरिकांच्या हालचालींवर मोठ्या प्रमाणात निर्बंध घालण्यात आले असून त्यांना ‘स्पेशल केअर झोन्स’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. चीनबाहेर ‘कोरोनाव्हायरस’च्या रुग्णांची सर्वाधिक नोंद झालेला दक्षिण कोरिया हा दुसरा देश ठरला आहे.

     

आखातातील इराणमध्येही ‘कोरोनाव्हायरस’ची साथ वेगाने फैलावत असल्याचे समोर येऊ लागले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीपर्यंत इराणमधील यंत्रणा साथीबाबत कोणतीही माहिती देण्यास तयार नव्हत्या. मात्र गेल्या तीन दिवसात परिस्थिती बदलली असून शुक्रवारपर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. हे सर्व बळी इराणच्या ‘कोम’ शहरातील आहेत. त्याव्यतिरिक्त सध्या इराणमध्ये ‘कोरोनाव्हायरस’ साथीच्या २८ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील बहुतांश रुग्णांचा चीनशी संबंध नसल्याचा दावा इराणी यंत्रणा करीत असल्याने त्याबाबतचे गूढ अधिकच वाढले आहे.

युरोपमधील इटलीमध्येही ‘कोरोनाव्हायरस’च्या साथीची व्याप्ती वाढल्याचे संकेत मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वी उत्तर इटलीतील ‘वेनेटो’ शहरात दाखल झालेल्या एका ७८ वर्षाच्या रुग्णाचा साथीत मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक मंत्र्यांनी दिली. त्याचवेळी लोम्बार्डी प्रांतात १४ नवे रुग्ण आढळले असून साथ पसरण्याचा धोका वाढला आहे. हा धोका रोखण्यासाठी जवळपास १० शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’ घोषित करण्यात आला असून वाहतुकीसह अनेक उपक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.

इराणला भेट दिलेल्या एका ३० वर्षाच्या कॅनेडियन तरुणीला ‘कोरोनाव्हायरस’चा फटका बसला असून हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याची माहिती वैद्यकक्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे. या तरुणीला झालेल्या ‘कोरोनाव्हायरस’ आजारानंतर कॅनडातील रुग्णांची संख्या नऊवर गेली आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info