अमेरिकेने चीनबरोबरील संघर्षासाठी सज्ज रहावे – पेंटॅगॉनच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा इशारा

अमेरिकेने चीनबरोबरील संघर्षासाठी सज्ज रहावे – पेंटॅगॉनच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा इशारा

वॉशिंग्टन – ‘अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती, मित्रदेशांबरोबरचे सहकार्य आणि आपल्या संरक्षणदलांची कार्यक्षमता वाढवून, अमेरिकेने चीनबरोबरच्या होऊ घातलेल्या लष्करी संघर्षासाठी सज्ज रहावे. आपल्या सामर्थ्यात वाढ करणे ही अमेरिकेसाठी दीर्घकालिन प्रक्रिया असेल. यासाठी अमेरिकेने त्वरित व चलाखीने पावले टाकली पाहिजे. कारण चीनबरोबरच्या या संघर्षात अमेरिकेला मिळणारे आव्हान महाभयंकर असेल’, असा गंभीर इशारा पेंटॅगॉनचे वरिष्ठ अधिकारी ‘छाड स्रागिया’ यांनी दिला.

चीनची ‘पिपल्स लिबरेशन आर्मी’ (पीएलए) दिवसेंदिवस अधिकच शक्तीशाली बनत चालली आहे. जागतिक महासत्ता होण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी चीन आपल्या लष्करी सामर्थ्यात वाढ करीत आहे. विशेषत: इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या लष्करी हालचाली चिंताजनक असल्याची माहिती पेंटॅगॉनमधील चीन विभागाचे उपसंरक्षणमंत्री छाड स्रागिया यांनी दिली. अमेरिकन कॉंग्रेसच्या ‘युएस-चायना इकोनॉमिक अँड सिक्युरिटी कोऑपरेशन’ समितीसमोर बोलताना स्रागिया यांनी चीनच्या वाढत्या धोक्याबाबत इशारा दिला.

  

चीन आपल्या लष्करी सामर्थ्याचा विस्तार जगभरात करीत असून संरक्षण सामर्थ्याचे अद्ययावतीकरण अमेरिकेच्या हितसंबंधांना आव्हान देणारे असल्याचा दावा स्रागिया यांनी केला. अशा परिस्थितीत अमेरिकेने अतिप्रगत शस्त्रास्त्रांची निर्मिती करणे आवश्यक आहे. यासाठी हायपरसोनिक क्षेपणास्त्रे, आर्टिफिशल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता), रोबोट्स आणि लेझर शस्त्रास्त्रे यांची अमेरिकेला मोठी गरज असेल, याची जाणीव स्रागिया यांनी करून दिली.

आपल्या शस्त्रास्त्रांची धार वाढवत असताना, अमेरिकेने इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील मित्रदेशांबरोबरचे संबंध अधिक दृढ करणे, तसेच नव्या सहकारी देशांशी संधान साधणे सुरू ठेवावे, असे आवाहन स्रागिया यांनी केले. या सहकार्यामुळे अमेरिकेला मोठा लाभ मिळू शकतो. अमेरिकेच्या या आघाडीला आव्हान देणे चीनला देखील अवघड होईल, असा दावा स्रागिया यांनी केला. त्याचबरोबर फिलिपाईन्सने अमेरिकेबरोबरच्या लष्करी सहकार्यातून घेतलेली माघार अमेरिकेसाठी धक्कादायक आहे. पण राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे इंडो-पॅसिफिकबाबतचे धोरण सुस्पष्ट असल्याचे स्रागिया यांनी सांगितले.

पेंटॅगॉनच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून हा इशारा दिला जात असतानाच, ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रातील चीनच्या हालचाली वाढू लागल्या आहेत. फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्राजवळ चीनने याआधीच आपली विनाशिका तैनात केली होती. आता चीनने नतूना आणि पॅरासेल द्वीपसमुहांजवळ आपल्या गस्तीनौका तैनात केल्या आहेत. चीनच्या या नौदल हालचालींवर मलेशिया आणि व्हिएतनामने टीका करून आपल्या गस्तीनौका रवाना केल्या आहेत. त्यामुळे सदर सागरी क्षेत्रात तणाव निर्माण झाला आहे.

‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रावर आपला सार्वभौम अधिकार असल्याचा दावा चीन करीत आहे. पण व्हिएतनाम, फिलिपाईन्स, मलेशिया, तैवान हे आग्नेय आशियाई देश चीनच्या या दावेदारीला आव्हान देत आहे. अमेरिकेने आग्नेय आशियाई देशांच्या या भूमिकेचे समर्थन केले असून या क्षेत्रातील सागरी तसेच हवाई गस्तही वाढविली आहे. गेल्या काही वर्षात सदर सागरी क्षेत्रात चीनने अमेरिका तसेच मित्रदेशांच्या युद्धनौका आणि विमानांना आव्हान देणार्‍या हालचाली केल्या होत्या. तसेच अमेरिकेच्या युद्धनौकांना जलसमाधी देण्याच्या धमक्याही चीनच्या लष्करी अधिकार्‍यांनी दिल्या होत्या.

या पार्श्‍वभूमीवर, छाड स्रागिया’ यांनी अमेरिकेला चीनविरोधी युद्धासाठी सज्ज राहण्यासंबंधी दिलेल्या इशार्‍याचे महत्त्व वाढले आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info