‘कोरोनाव्हायरस’च्या साथीविरोधात दक्षिण कोरियाची युद्धाची घोषणा – जगभरातील रुग्णांची संख्या ९२ हजारांवर

‘कोरोनाव्हायरस’च्या साथीविरोधात दक्षिण कोरियाची युद्धाची घोषणा – जगभरातील रुग्णांची संख्या ९२ हजारांवर

सेऊल/रोम/तेहरान – दक्षिण कोरियाने ‘कोरोनाव्हायरस’च्या संसर्गजन्य साथीविरोधात युद्ध पुकारले आहे, अशी घोषणा दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ‘मून जे-इन’ यांनी केली. ‘कोरोनाव्हायरस’चा संसर्ग झालेल्या देशांमध्ये चीनपाठोपाठ दक्षिण कोरियाचा क्रमांक लागत असून या देशातील रुग्णांची संख्या पाच हजारांवर जाऊन पोहोचली आहे. कोरियापाठोपाठ इराण व इटलीतही ‘कोरोनाव्हायरस’च्या रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडली असून जगभरातील रुग्णांची आकडेवारी ९२ हजारांवर गेल्याचे समोर आले आहे.

गेले दोन महिने प्रामुख्याने चीनमध्ये केंद्रित राहिलेल्या ‘कोरोनाव्हायरस’च्या साथीने आता जगाच्या इतर भागांमध्ये चिंताजनक प्रभाव दाखविण्यास सुरुवात केली आहे. अवघ्या एका आठवड्याच्या अवधीत जगातील २०हून अधिक देशांमध्ये ‘कोरोनाव्हायरस’चे रुग्ण आढळले असून फैलाव झालेल्या देशांची संख्या ७०वर गेली आहे. गेल्या २४ तासांच्या अवधीत सहा देशांमध्ये साथीचे नवे रुग्ण आढळले असून त्यात युक्रेन, लाटव्हिया, सौदी अरेबिया, जॉर्डन, ट्युनिशिआ व सेनेगलचा समावेश आहे.

दक्षिण कोरियात ‘कोरोनाव्हायरस’च्या साथीचे रुग्ण गेल्या महिन्यापासून आढळण्यास सुरुवात झाली होती. मात्र अवघ्या एका आठवड्याच्या अवधीत त्याचा संसर्ग वेगाने पसरला असून सरकार व स्थानिक यंत्रणा त्याचा अंदाज घेण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले.

कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून यांनी या अपयशाबद्दल देशाच्या जनतेची जाहीर माफी मागितली असून मास्क व इतर सुविधा पुरविण्यात कमी पडल्याने झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्याचवेळी यापुढे युद्धस्तरावर ‘कोरोनाव्हायरस’च्या साथीचा मुकाबला सुरू झाला असून त्यासाठी २५ अब्ज डॉलर्सची तरतूद केल्याचेही जाहीर केले.

दक्षिण कोरियापाठोपाठ इराण व इटलीमध्येही ‘कोरोनाव्हायरस’च्या साथीने हाहाकार माजविला आहे. इराणमधील रुग्णांची संख्या २,३३६ झाली असून ७७ जणांचा मृत्यू झाला आहे. इराणमध्ये ‘कोरोनाव्हायरस’चा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये २३ संसद सदस्यांचा समावेश आहे. त्याचवेळी गेल्या तीन दिवसात इराणमधील एक संसद सदस्य तसेच सर्वोच्च नेते खामेनी यांच्या सल्लागारांचा साथीत बळी गेल्याचेही उघड झाले.

इटलीत गेल्या २४ तासांमध्ये ‘कोरोनाव्हायरस’च्या बळींमध्ये मोठी वाढ आढळली आहे. रविवारी इटलीतील बळींची संख्या १८ होती. मात्र मंगळवारी पहाटेपर्यंत ‘कोरोनाव्हायरस’ने इटलीत ५२ जणांचा बळी घेतल्याची माहिती देण्यात आली. इटली हा ‘कोरोनाव्हायरस’च्या साथीची सर्वाधिक व्याप्ती असणारा युरोपिय देश ठरला असून रुग्णांच्या संख्येन दोन हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

जपानमध्येही ‘कोरोनाव्हायरस’च्या रुग्णांची संख्या एक हजारानजिक पोहोचली असून बळींची संख्या १२ झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर जपानने यावर्षी होणार्‍या ऑलिंपिकची सुरुवात पुढे ढकलली जाऊ शकते, असे संकेत दिले आहेत. फ्रान्सने ‘कोरोनाव्हायरस’च्या साथीची व्याप्ती रोखण्यासाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून ब्रिटनमधील विमानकंपन्यांनी आपल्या उड्डाणांमध्ये मोठी कपात करीत असल्याची घोषणा केली आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info