Breaking News

दोन राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी आणि दोन बॉम्बस्फोटांच्या पार्श्‍वभूमीवर अफगाणिस्तानातून अमेरिकेची सैन्यमाघार सुरू झाली

काबुल – सोमवारी अफगाणिस्तानमध्ये दोन राष्ट्राध्यक्षांनी शपथ घेतली. यापैकी अश्रफ गनी यांचा शपथविधी सोहळा पार पडला, त्यावेळी दोन बॉम्बस्फोट झाले. यानंतर काही काळाने अब्दुल्ला अब्दुल्ला यांनीही अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. त्यामुळे सध्या अफगाणिस्तानात एक नाही, तर दोन राष्ट्राध्यक्ष आहेत आणि दोघेही आपल्यालाच निवडणुकीत बहुमत मिळाल्याचा दावा करीत आहेत. हे राजकीय संकट खडे ठाकले असताना, अश्रफ गनी यांचे सरकार आणि तालिबानमधील मतभेद तीव्र झाल्याचे समोर येत असून यामुळे सर्वपक्षीय चर्चा धोक्यात आली आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानातील आपले सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची घोषणा अमेरिकन लष्कराच्या अधिकार्‍यांनी केली आहे.

सोमवारी काबुलमध्ये अश्रफ गनी यांचा शपथविधी सोहळा पार पडला. अफगाणिस्तानात झालेल्या निवडणुकीत गनी यांचा विजय झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यांच्या या विजयाला अमेरिकेचीही मान्यता असून सोमवारी पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्याला अमेरिकेचे अफगाणिस्तानसाठी नियुक्त करण्यात आलेले विशेषदूत झल्मे खलिलझाददेखील उपस्थित होते. हा शपथविधीचा कार्यक्रम सुरू असतानाच, दोन बॉम्बस्फोट झाले आणि उपस्थित जीव वाचविण्यासाठी पळू लागले. मात्र काही काळाने परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात सुरक्षा यंत्रणांना यश मिळाले. या बॉम्बस्फोटात कुठल्याही प्रकारची हानी झालेली नसल्याचे सांगितले जाते. या हल्ल्याची जबाबदारी ‘आयएस’ने घेतल्याचा दावा केला जातो.

आपल्यावर होणार्‍या हल्ल्यांना आपण घाबरून अफगाणिस्तानची सत्ता सोडणार नसल्याचे अश्रफ गनी म्हणाले. अफगाणिस्तानातील लोकशाही वाचविण्यासाठी आपण सर्वोच्च बलिदान देण्यास तयार असल्याची घोषणा यावेळी गनी यांनी केली. राजधानी काबुलमधील राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानापासून काही अंतरावर असलेल्या सफेदार पॅलेस इथे अब्दुल्ला अब्दुल्ला यांनीही अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. निवडणुकीत आपलाच विजय झाल्याचा दावा अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी केला होता. यामुळे अफगाणिस्तानात फार मोठे राजकीय संकट खडे ठाकले आहे. लवकरच अफगाणिस्तानात सर्वपक्षीय चर्चा सुरू होणार असून यात अफगाणी सरकारबरोबर तालिबानचाही समावेश आहे.

अमेरिका आणि तालिबानमध्ये?शांतीकरार झाला असला, तरी अफगाणिस्तानचे भवितव्य या सर्वपक्षीय चर्चेतच निश्‍चित होणार असल्याचे सर्वच विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. मात्र तालिबानसारख्या जहाल संघटनेशी चर्चा करण्याच्या आधी अफगाणिस्तान नक्की सरकार कुणाचे यावरून अश्रफ गनी व अब्दुल्ला अब्दुल्ला यांच्यात तीव्र मतभेद झाले आहेत. त्यातच राष्ट्राध्यक्ष गनी यांनी आपल्या ताब्यातील पाच हजार तालिबानी दहशतवाद्यांची सुटका करण्यास नकार देऊन तालिबानला धक्का दिला आहे.

आपल्या साथीदारांची सुटका झाल्याखेरीज चर्चा होणार नाही, असे जाहीर करून तालिबानने अफगाणी लष्करावर हल्ले सुरू केले आहेत. तर तालिबानच्या सदस्यांकडून हिंसा न करण्याची लेखी हमी मिळाल्याखेरीज राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी त्यांची सुटका करण्यास तयार नाहीत. त्यामुळे अफगाणिस्तानात एका नाही, तर अनेक आघाड्यांवर संघर्षाला तोंड फुटत असल्याचे दिसते. अशा निर्णायक वेळी अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानातून माघार घेण्याची तयारी करीत आहे. सध्या बारा ते तेरा हजारांवर असलेले अफगाणिस्तानातील अमेरिकेचे सैन्य पुढच्या १३५ दिवसात ८,६००वर आणण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. तालिबानबरोबरील शांतीकरारात ही बाब नमूद करण्यात आली होती, त्यानुसार अमेरिकेची ही सैन्यमाघार सुरू झाल्याचे अफगाणिस्तानातील अमेरिकन लष्कराचे प्रवक्ते कर्नल सोनी लेगॉट्ट यांनी केली आहे.

अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर अफगाणिस्तानात काय परिस्थिती उद्भवू शकते, याची झलक सोमवारच्या घटनांनी दाखवून दिली आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info