हायपरसोनिक क्षेपणास्त्र विकसित करून जपानचे चीनला प्रत्युत्तर

हायपरसोनिक क्षेपणास्त्र विकसित करून जपानचे चीनला प्रत्युत्तर

टोकिओ – ‘ईस्ट चायना सी’सह आशिया-प्रशांत क्षेत्रातील चीनचे वाढते वर्चस्व व लष्करी आक्रमकता रोखण्यासाठी जपानने हायपरसोनिक क्षेपणास्त्राच्या विकासाला वेग दिला आहे. ‘मॅक ५’ अर्थात ध्वनीच्या पाचपट वेग असणारे हे क्षेपणास्त्र चीनच्या विमानवाहू युद्धनौकांना उद्ध्वस्त करण्याची क्षमता बाळगून आहे, असा दावा जपानच्या लष्करी सूत्रांनी केला. या क्षेपणास्त्राच्या निर्मितीनंतर जपान हायपरसोनिक क्षेपणास्त्र विकसित करणारा रशिया, चीन व अमेरिकेनंतरचा जगातील चौथा देश ठरेल. चीनने आण्विक पाणबुडी दाखल केल्यानंतर ही बातमी येणे म्हणजे जपानने चीनला त्याच भाषेत दिलेले प्रत्युत्तर दिसत आहे.

हॉंगकॉंगस्थित ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ या दैनिकाने जपानच्या संरक्षण विभागाशी निगडित सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिल्याचा दावा केला. २०२६ सालापर्यंत जपानच्या संरक्षणदलात तैनात होणारे हे क्षेपणास्त्र ‘हायपर व्हेलॉसिटी ग्लायडिंग प्रोजेक्टाईल’ (एचव्हीजीपी) प्रकारातील आहे. यातील ‘हायपरसोनिक ग्लायडिंग’ तंत्रज्ञानामुळे क्षेपणास्त्र वेगाने आकाशात जाऊन खालील लक्ष्य भेदण्यासाठी झेपावेल असा दावा जपानकडून करण्यात आला. त्याचवेळी सध्या सक्रिय असणाऱ्या जगातील कोणत्याही क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेला हे क्षेपणास्त्र भेदता येणार नाही, असेही दाव्यात सांगण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षात चीनने आपले वर्चस्व वाढविण्यासाठी आक्रमक लष्करी धोरण राबविले आहे. आशियासह इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनने मोठ्या प्रमाणावर लष्करी तैनाती सुरू केली आहे. या क्षेत्रातील अमेरिकेच्या प्रभावाला शह देण्यासाठी विमानवाहू युद्धनौका, विनाशिका, पाणबुड्या, लढाऊ विमाने व प्रगत क्षेपणास्त्रांची निर्मिती तसेच तैनाती वेगाने करण्यात येत आहे.

‘साऊथ चायना सी’ तसेच जपाननजिक आलेल्या ईस्ट चायना सी भागातील चीनच्या लष्करी हालचाली मोठया प्रमाणात वाढल्या आहेत. ईस्ट चायना सीमधील ‘सेंकाकू’ बेटांवरून जपान व चीनमध्ये पूर्वापार वाद सुरू आहे. सध्या आंतरराष्ट्रीय समुदाय कोरोना साथीविरोधात संघर्ष करीत असतानाही चीनच्या आक्रमक कारवाया थांबलेल्या नाहीत. उलट चीनकडून साऊथ चायना सी तसेच ईस्ट चायना सीनजिक युद्धनौकांची तैनाती आणि लढाऊ विमानांची घुसखोरी सुरूच आहे.

ही पार्श्वभूमी लक्षात घेता जपानने हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या विकासाला दिलेला वेग महत्त्वाचा ठरतो. जपानचे नवे हायपरसोनिक क्षेपणास्त्र चीनच्या विमानवाहू युद्धनौकांना भेदण्याची क्षमता राखून असल्याने त्याची निर्मिती हा चीनच्या वाढत्या लष्करी आक्रमकतेला थेट इशारा असल्याचे मानले जाते.

 English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info