किरगिझिस्तान व कझाकस्तानच्या भूभागावरही चीनचा दावा

किरगिझिस्तान व कझाकस्तानच्या भूभागावरही चीनचा दावा

बीजिंग – काही दिवसांपूर्वी ‘साऊथ चायना सी’मधील बेटे व त्यापाठोपाठ थेट ‘माउंट एव्हरेस्ट’वर आपला दावा सांगणाऱ्या चीनने आता मध्य आशियाई देशांकडे आपले लक्ष वळवले आहे. चीनमधील दोन वेबसाईट्सनी मध्य आशियाई देश ‘कझाकस्तान’ व ‘किरगिझिस्तान’देखील चीनचाच हिस्सा असल्याचे दावे केले आहेत. चीनची कम्युनिस्ट राजवट जवळपास सर्वच शेजारी देशांच्या कुरापती काढून कोरोनाव्हायरसबाबत होणाऱ्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.

गेल्या आठवड्यात भारतीय सीमेतील पँगोंग सरोवराच्या क्षेत्रात चीनने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय लष्कराने चीनला माघार घेण्यास भाग पाडले होते. त्यापूर्वी भारतीय सीमारेषेवर घिरट्या घालणाऱ्या चीनच्या हेलिकॉप्टर्सना भारताच्या लढाऊ विमानांनी पिटाळले होते. डेमचोक व गलवान नदी क्षेत्रातही भारतीय लष्कर अलर्टवर असल्याने नव्या संघर्षासाठी धडपडणाऱ्या चीनचा चांगलाच मुखभंग झाला आहे.

भारतीय क्षेत्रात घुसखोरीचे प्रयत्न सुरू असतानाच चीनने अचानक ‘माउंट एव्हरेस्ट’वर आपला दावा सांगून नेपाळला चिथावण्याचा प्रयत्नही केला. त्यापूर्वी ‘साऊथ चायना सी’ मधील बेटांना नावे देऊन चीनने आपले अधिकारक्षेत्र वाढल्याचे संकेत दिले. त्याचवेळी ‘ईस्ट चायना सी’मध्ये जपानच्या हद्दीनजिक तसेच तैवानजवळही आक्रमक हालचाली सुरू केल्या होत्या. एकाच वेळी सर्व बाजूंनी सामर्थ्याचे प्रदर्शन करून आम्ही आंतरराष्ट्रीय दडपणाची पर्वा करीत नसल्याचे चीन दाखवित आहे. त्याचवेळी शेजारी देशांनाही हाच संदेश देत आहे.

चीनच्या या आक्रमक हालचाली कोरोनाच्या साथीवरून आलेले दडपण, अर्थव्यवस्थेतील घसरण आणि इतर अंतर्गत समस्यांपासून जनतेचे लक्ष वळविण्याच्या धोरणाचा भाग दिसतो. गेल्याच महिन्यात चीनने कोरोनाच्या साथीवर विजय मिळविल्याचे दावे केले होते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना साथीचे मूळ असलेल्या वुहानमध्येच व्हायरसच्या संसर्गाची नवी प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे साथीवर विजय मिळविल्याचा खोटा प्रचार उघडा पडला आहे. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय पातळीवरही कोरोनाच्या मुद्यावरून चीनच्या सत्ताधारी राजवटीला दणके बसत आहेत. हे अपयश झाकण्यासाठी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीला नवे पर्याय शोधावे लागत आहेत.

अंतर्गत तसेच जागतिक स्तरावर बसलेल्या फटक्यांमुळे कम्युनिस्ट राजवटीला धक्के बसू नयेत म्हणून एकाच वेळी अनेक आघाड्या उघडून मूळ समस्यांना बगल देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जपान, भारत, तैवान यांच्यासह अमेरिका व इतर देश आपल्याविरोधात उभे राहिले आहेत, असा देखावा उभा करून राष्ट्रवादाची भावना चेतवण्याचे प्रयत्न चीनच्या सत्ताधाऱ्यांनी सुरू केले आहेत.

मध्य आशियाई देशांवर हक्क सांगण्याची कुरापत त्याचाच भाग दिसतो. मात्र अमेरिका, युरोप यांच्यासह आशियाई देशही चांगलेच सावध झाले असून चीनच्या कुरापतींना आक्रमक व तोडीस तोड प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या समस्यांवरील अपयश लपविण्यासाठी इतरांना चिथावण्याचा हालचाली चीनसाठी अपेक्षाभंग देणाऱ्याच ठरतील, असे चित्र दिसत आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info