अमेरिकेकडून हॉंगकॉंगच्या प्रमुख कॅरी लॅम यांच्यासह ११ जणांवर निर्बंधांची घोषणा

अमेरिकेकडून हॉंगकॉंगच्या प्रमुख कॅरी लॅम यांच्यासह ११ जणांवर निर्बंधांची घोषणा

वॉशिंग्टन/हॉंगकॉंग – अमेरिकेने हॉंगकॉंगच्या प्रशासकीय प्रमुख कॅरी लॅम यांच्यासह ११ जणांवर निर्बंध लादल्याची घोषणा केली आहे. हॉंगकॉंगच्या जनतेचे स्वातंत्र्य चिरडणार्‍या नेते व अधिकाऱ्यांवर अमेरिका कारवाई करेल, अशी ठाम भूमिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली असून, त्यानुसार ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी दिली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी गेल्याच महिन्यात हॉंगकॉंगचे स्पेशल स्टेटस रद्द करणाऱ्या वटहुकुमावर स्वाक्षरी केली होती. हॉंगकॉंग हा यापुढे चीनचाच हिस्सा मानण्यात येईल, असे सांगून हाँगकॉंगसह चीनचे अधिकारी व नेत्यांवर निर्बंध लागण्यास मान्यता देणाऱ्या कायद्यालाही ट्रम्प यांनी मान्यता दिली होती.

कॅरी लॅम

शुक्रवारी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी जाहीर केलेले निर्बंध गेल्या महिन्यात मंजुरी मिळालेल्या हॉंगकॉंग ऑटोनॉमी ॲक्टचा भाग आहेत. हॉंगकॉंगच्या प्रशासकीय प्रमुख कॅरी लॅम यांच्यासह हॉंगकॉंग पोलीसप्रमुख क्रिस तांग पिंग-केउंग तसेच चीनच्या हॉंगकॉंग ऑफिसचे प्रमुख लुओ हुईनिंग यांच्यासह ११ जणांना लक्ष्य करण्यात आले आहे. या सर्वांची अमेरिकेतील मालमत्ता व संपत्ती गोठविण्यात आली आहे. ‘चीनच्या राजवटीने हॉंगकॉंगची जनता व ब्रिटनला स्वायत्ततेचे वचन दिले होते. मात्र हाँगकाँगला दिलेले हे वचन चीनची कम्युनिस्ट पार्टी पाळणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यापुढे अमेरिकाही हॉंगकॉंगला एक देश, एक व्यवस्थेनुसार चीनचाच हिस्सा मानेल व हॉंगकॉंगच्या जनतेचे स्वातंत्र्य चिरडणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करेल, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी घेतली आहे’, या शब्दात परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी निर्बंधांची माहिती दिली.

कॅरी लॅम

अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांविरोधात चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. ‘हॉंगकॉंगचा प्याद्यासारखा वापर करून अमेरिका चीनच्या अंतर्गत कारभारात अत्यंत निर्लज्जपणे हस्तक्षेप करीत आहे’, अशी टीका हॉंगकॉंग प्रशासनाने केली आहे. निर्बंध लादून चीनला तडजोडीसाठी भाग पाडता येईल असा जर अमेरिकेचा समज असेल तर त्यांनी चुकीची कारवाई केली आहे, अशा शब्दात हॉंगकॉंगमधील चीन लायजन ऑफिसचे प्रमुख लुओ यांनी अमेरिकेला फटकारले.

गेल्या महिन्यापासून हॉंगकॉंगसाठी तयार केलेल्या ‘नॅशनल सिक्युरिटी लॉ’ची अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती. या कायद्यानुसार, चीनच्या विरोधात करण्यात येणारे कोणतेही कृत्य बेकायदेशीर व राष्ट्रविरोधी ठरवण्यात आले असून, असे कृत्य करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याची तरतूद आहे. या कायद्यानुसार अटक केलेल्या हॉंगकॉंगच्या नागरिकांवर कोणतेही स्थानिक कायदे लागू होणार नाहीत. नव्या कायद्याअंतर्गत दाखल होणारे खटले गुप्त पद्धतीने चालविण्याची परवानगीही संबंधित यंत्रणांना देण्यात आली आहे. चीनने लादलेल्या या नव्या कायद्याविरोधात हॉंगकॉंगसह आंतरराष्ट्रीय स्तरावरुन तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info