इराणी राष्ट्राध्यक्षांच्या इशाऱ्यानंतर ’युएई’ने इराणच्या राजदूतांना समन्स बजावले

इराणी राष्ट्राध्यक्षांच्या इशाऱ्यानंतर ’युएई’ने इराणच्या राजदूतांना समन्स बजावले

अबू धाबी – ’संयुक्त अरब अमिरात’ने (युएई) इस्रायलबरोबर केलेला ऐतिहासिक शांतीकरार सर्वात मोठी चूक असून येणारा काळ ’युएई’साठी धोकादायक असेल, असा इशारा इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी दिला होता. राष्ट्राध्यक्ष रोहानी यांच्या या इशार्‍यावर संताप व्यक्त करुन ’युएई’ने इराणच्या राजदूतांना समन्स बजावले आहेत. सौदी अरेबियामध्ये मुख्यालय असलेल्या ’गल्फ कोऑपरेशन कौंसिल’ने (जीसीसी) देखील इराणने युएई’ला दिलेल्या धमकीवर आक्षेप घेऊन इराणने अरब देशांच्या कारभारात ढवळाढवळ करू नये, असे फटकारले.

समन्स बजावले

गेल्या आठवड्यात इस्रायल आणि युएई’मध्ये झालेल्या ऐतिहासिक कराराचे जगभरातून स्वागत केले जात आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून इस्रायलशी सहकार्य नसलेले अरब-इस्लामी देश देखील इस्रायलशी सहकार्य करण्यासाठी उत्सुक असल्याच्या प्रतिक्रिया देत आहेत. तर इराण, तुर्कीसारख्या देशांनी या करारावर टीका करुन युएईला बजावले होते. यापैकी इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी तसेच रिव्होल्युशनरी गार्डस आणि इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह खामेनी यांच्याशी संलग्न असलेल्या माध्यमांनी युएईला वेगळ्या शब्दात धमकावले होते. हा करार करुन युएई’ने मोठी चूक केली असून या विश्वासघातकी निर्णयानंतर युएईने सावध रहावे, असे रोहानी यांनी म्हटले होते. तर सदर शांतीकराराचे गंभीर परिणाम युएई’ला भोगावे लागतील, अशी धमकी रिव्होल्युशनरी गार्डसने दिली होती. या व्यतिरिक्त खामेनी यांच्याशी संलग्न असलेल्या ’कह्यान’ या इराणी वर्तमानपत्राने युएई आता सहज निशाण्यावर आल्याचा इशारा दिला होता.

समन्स बजावले

इराणने दिलेल्या या धमक्यांवर युएई’ने कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. ’इराणी राष्ट्राध्यक्षांनी दिलेली प्रतिक्रिया कदापि मान्य करता येणार नाही. या प्रक्षोभक प्रतिक्रियेमुळे आखातातील शांती व सुरक्षा धोक्यात येऊ शकते’, असे युएई’च्या परराष्ट्र मंत्रालयाने फटकारले. इस्रायलशी करार करण्याचा हा निर्णय युएईचा सार्वभौम अधिकार असून सदर करार इराणच्या विरोधात नसल्याचा दावा परराष्ट्र मंत्रालयाने केला. त्याचबरोबर तेहरानमधील ’युएई’च्या दूतावासाची सुरक्षा करणे, ही इराणची जबाबदारी ठरते, असेही स्पष्ट केले. दोन दिवसांपूर्वी तेहरानमधील युएई’च्या दूतावासासमोर इराणी कट्टरपंथियांनी आक्रमक निदर्शने केली होती. या पार्श्वभूमीवर युएईच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराणला जबाबदारीची जाणीव करुन दिली. तर ’जीसीसी’ने देखील इराणला संयुक्त राष्ट्रसंघाच्या नियमांची आठवण करुन देत, अरब देशांच्या कारभारात हस्तक्षेप करु नये, असे बजावले.

दरम्यान, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस आणि वर्तमानपत्रांनी दिलेले इशारे फार गंभीर असल्याचे अमेरिकेतील एका विश्लेषकाचे म्हणणे आहे. येमेनमधील आपल्या समर्थकांच्या सहाय्याने इराणने सौदी अरेबियात याआधी हल्ले चढविले होते. त्यामुळे इराण असा हल्ला युएईत चढवू शकतो, असा इशारा अमेरिकेतील ’गल्फ स्टेट एनालिटीक्स’ या अभ्यासगटाचे विश्लेषक डॉ. थिओडर कॅरासिक यांनी दिला. इराणची क्षेपणास्त्रे आठ मिनिटांत युएईवर कोसळू शकतात, असा दावा कॅरासिक यांनी दिला. त्यामुळे इराणच्या धमक्यांना हलके लेखू नये, असे कॅरासिक यांनी म्हटले आहे. काही महिन्यांपूर्वी युएईच्या सागरी क्षेत्रातच इराणने इंधनवाहू टँकर्सवर हल्ला केल्याचा आरोप झाला होता.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info