भूमध्य सागरी क्षेत्रातील शांततेसाठी साम्राज्यवादी तुर्कीला रोखणे आवश्यक – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा इशारा

भूमध्य सागरी क्षेत्रातील शांततेसाठी साम्राज्यवादी तुर्कीला रोखणे आवश्यक – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा इशारा

पॅरिस/इस्तंबूल – भूमध्य सागरी क्षेत्रात शांतता नांदणे आवश्‍यक आहे आणि त्यासाठी तुर्कीसारख्या साम्राज्यवादी राजवटीला रोखणे आवश्यक असल्याचा खणखणीत इशारा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दिला. गेले काही महिने भूमध्य सागरी क्षेत्रातील अधिकारांवरुन ग्रीस व तुर्कीमध्ये वादाचा भडका उडाला असून, फ्रान्स ग्रीसच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. गेल्याच आठवड्यात फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी तुर्की विरोधात लष्करी कारवाईचा आक्रमक पवित्राही स्वीकारला होता. दरम्यान, फ्रान्ससह युरोपिय देशांकडून दडपण येत असतानाही, तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी आपला आक्रस्ताळी स्वभाव कायम ठेवून ग्रीसलाच धमकावले आहे. चर्चा करा नाहीतर, तीव्र वेदना अनुभवण्यास तयार राहा, अशी धमकी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी दिली.

भूमध्य सागरी क्षेत्रात

लिबियातील संघर्ष, नाटोतील भूमिका आणि भूमध्य समुद्रातील इंधन उत्खनन या मुद्द्यांवरून फ्रान्स व तुर्कीतील संबंध तणावपूर्ण बनले आहेत. ग्रीससह युरोपीय देशांनी केलेले आवाहन धुडकावून तुर्कीने भूमध्य समुद्रात जबरदस्तीने इंधन उत्खनन सुरू केले आहे. आपल्या या मोहिमेचे समर्थन करण्यासाठी तुर्कीने या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संरक्षणतैनाती केली असून, एकापाठोपाठ एक युद्धसराव आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी इतिहासाचे दाखले देत युरोपीय देशांना धमकावण्यासही सुरुवात केली आहे. या विरोधात फ्रान्सने अत्यंत आक्रमक भूमिका स्वीकारली असून, राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी तुर्कीचा साम्राज्यवादी राजवट असा थेट उल्लेख करणे त्याला दुजोरा देणारे ठरते.

भूमध्य सागरी क्षेत्रात

‘भूमध्य सागरी क्षेत्रात शांतता नांदणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या इतिहासातील अद्भुतरम्य गोष्टींचे दाखले देऊन धमकावणाऱ्या तुर्कीसारख्या प्रादेशिक साम्राज्यवादी राजवटीला रोखणे गरजेचे आहे. भूमध्य सागरी क्षेत्रातील सार्वभौमत्वाच्या मुद्द्यावर फ्रान्सने घेतलेली भूमिका व केलेली कृती यापुढेही कायम राहील. तुर्कीसारख्या देशाला फक्त हीच भाषा समजू शकते. तुर्कीने रेड लाईन ओलांडता कामा नये आणि हेच फ्रान्सचे धोरण आहे’, अशा घणाघाती शब्दात फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी तुर्कीला इशारा दिला. तुर्कीची कृती नाटो सदस्य देशांच्या धोरणांशी सुसंगत नसल्याच्या आरोपांचा पुनरुच्चारही राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी यावेळी केला. तुर्कीवर कडक निर्बंध लादावेत, अशी आग्रही मागणी फ्रान्सने यापूर्वीच युरोपियन महासंघाकडे केली आहे.

भूमध्य सागरी क्षेत्रात

फ्रान्ससह युरोपीय महासंघ ग्रीसच्या पाठीशी असल्याचे चित्र समोर असतानाही तुर्कीने पुन्हा एकदा ग्रीसला धमकावले आहे. ‘ग्रीसला राजनैतिक चर्चेची भाषा समजत असेल अशी आशा आहे. ही समज नसेल तर रणांगणावर तीव्र वेदना अनुभवण्यास तयार रहा. इतरांनी लादलेले बेकायदा नकाशे व करार फाडून टाकण्यासाठी आवश्यक असणारे राजकीय, आर्थिक आणि लष्करी सामर्थ्य तुर्कीकडे आहे. तुर्कीला विरोध करणाऱ्यांनाही लवकरच याची जाणीव होईल’,अशी धमकी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी दिली. त्यापूर्वी ‘नॉर्दर्न सायप्रस’ बरोबर तुर्की नवा लष्करी सराव आयोजित करीत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. या नव्या सरावामुळे भूमध्य सागरी क्षेत्रातील तणाव अधिक चिघळेल असे संकेत मिळत आहेत.

तुर्की नवा सराव आयोजित करीत असतानाच रशियन नौदलानेही भूमध्य सागरात एकापाठोपाठ एक दोन सराव आयोजित करीत असल्याचे जाहीर केले आहे. ८ ते २५ सप्टेंबर या कालावधीत रशियन नौदल सराव करणार असून त्यात युद्धनौका सहभागी होतील, अशी माहिती रशियन प्रवक्त्यांनी दिली. रशियाच्या या घोषणेवर तुर्कीकडून प्रतिक्रिया उमटली असून, रशियन युद्धनौकांनी तुर्कीच्या सागरी मोहिमेत हस्तक्षेप करू नये, असे तुर्कीकडून बजावण्यात आले आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info